Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 02:50 PM2024-12-04T14:50:26+5:302024-12-04T14:51:14+5:30

Margashirsha Guruvar 2024: ५ डिसेंबर रोजी मार्गशीर्षातील पहिला गुरुवार; त्यानिमित्त वैभव, सुख, शांति देणारे महालक्ष्मी व्रत कसे करावे ते जाणून घ्या.

Margashirsha Guruvar 2024: Detailed Pooja Details for First Time Mahalakshmi Vrats! | Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!

Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!

मार्गशीर्ष महिना सुरू झाला की महाराष्ट्रात अनेक घरात गुरुवारी (Margashirsha Guruvar 2024) महालक्ष्मीचे व्रत (Mahalaxmi Vrat 2024) केले जाते. हे व्रत केले असता अनेक भाविकांना सुख, समृद्धी, सुबत्ता प्राप्त झाल्याचा अनुभव आला आहे. ते पाहता आपणही हे व्रत करावे अशी भाविकांची इच्छा होणे स्वाभाविक आहे. तुम्ही सुद्धा हे व्रत करू इच्छिता तर जाणून घ्या व्रतविधी. 

श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना

महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करुन घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे.

पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणे व दुर्वा घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवावं.

ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ॐ गोविंदाय नमः । असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी-कुंकू, फुलं वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी.

श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी माहात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन-अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल, ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी.

रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.

दुसर्‍या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्रीमहालक्ष्मीची पूजा करावी.

मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणार्‍या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दर वर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. श्री लक्ष्मीदेवीने पद्‍मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी, समाधानी राहील !

श्री महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी व्रत-नियम

  • हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने, मनाने निर्मळ होऊन पूजा-विधी करावा.
  • कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल, दर गुरुवारी श्री महालक्ष्मीव्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा व माहात्म्य वाचावे.
  • उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मीस्वरूप समजून त्यांना हळदी-कुंकू देऊन प्रसाद म्हणून एकेक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री-पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात.
  • व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे. पद्‌मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात.
  • हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली, तर पूजा-आरती दुसर्‍या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये.
  • एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा-आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल, त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा. फलाहार घ्यावा.
  • व्रत-पूजा व श्रीमहालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी-पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने माहात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथीवाचन चालू असताना श्रीमहालक्ष्मीचे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणार्‍यांनी बर्‍याचदा सुवासाची चांगलीच जाणीव जाणवेल.
  • व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे.
  • व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा.

Web Title: Margashirsha Guruvar 2024: Detailed Pooja Details for First Time Mahalakshmi Vrats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.