मार्गशीर्ष पौर्णिमा: अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी ‘ही’ ३ कामे अवश्य करा; भरभराट होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:13 IST2024-12-12T14:12:49+5:302024-12-12T14:13:35+5:30
Margashirsha Purnima 2024: यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा नेमकी कधी आहे? सन २०२४ च्या शेवटच्या पौर्णिमेला जुळून आलेले शुभ योग कोणते? जाणून घ्या...

मार्गशीर्ष पौर्णिमा: अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी ‘ही’ ३ कामे अवश्य करा; भरभराट होईल!
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना म्हणूनही सांगितला जातो. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
यंदा २०२४ मध्ये दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा वेगवेगळ्या दिवशी आहे. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पौर्णिमा सुरु होते. दत्त जन्मोत्सवाची वेळ प्रदोष काळची असल्यामुळे शनिवार, १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रताचरण, लक्ष्मी देवीचे पूजन आणि पौर्णिमेसंबंधातील गोष्टी रविवार, १५ डिसेंबर रोजी कराव्यात, असे सांगितले जात आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेला जुळून येत असलेले शुभ योग
१५ डिसेंबर रोजी असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा ही या २०२४ वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना केली आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला रवी मृग हा खास योग जुळून येणार आहे. हा अतिशय शुभ योग मानला जातो. या योगात चंद्र पूजनाची परंपरा असल्याचे सांगितले. चंद्रोदयानंतर मध घातलेले दूध चंद्राला अर्पण करावे. चंद्राच्या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने धन-धान्याची कमी भासणार नाही. कुंडलीतील चंद्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकेल, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
मार्गशीर्ष पौर्णिमेचे लक्ष्मी पूजन
मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी स्नानादि कार्ये उरकल्यानंतर आपापले कुळधर्म, कुळाचार आणि कुळपंरपरेनुसार देवीची पूजा करावी. शास्त्रशुद्ध पूजा करणे शक्य नसेल तर केवळ पंचोपचार पूजा करावी, असे सांगितले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी-नारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे आवर्जून म्हणावीत. शक्य असेल तर विष्णूसहस्रनाम म्हणावे, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.