शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 22, 2021 09:00 AM2021-01-22T09:00:00+5:302021-01-22T09:00:02+5:30
महिषासुर मर्दिनी स्तोत्र आपण आजवर बऱ्याचदा ऐकले असेल. त्याची लयबद्ध रचना आपल्याला भुरळ पाडते. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला, तर स्तोत्र ऐकण्याचा आनंदही द्विगुणीत होईल. शाकंभरी नवरात्रीनिमित्त येत्या आठ दिवसात रोज तीन प्रमाणे चोवीस श्लोकांचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
महिषासुर मर्दीनी स्तोत्राच्या तीन कडव्यांचा अनुवाद काल पाहिला, आता पुढील तीन श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया.
अयी शतखंड विखंडित रुण्ड वितुंडीत शूण्ड गजाधिपते,
रिपुगज दगण्ड विदारण चंड पराक्रम शण्ड मृगाधिपते |
निजभुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते,
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||४||
हे चंडिके माते, तू युद्धात शत्रूंच्या अवाढव्य हत्तींचे शिर व धड व सोंडेचे सहजपणे तुकडे तुकडे करतेस, त्यामुळे तू प्रचंड पराक्रमी आहेस हे दिसून येते, तसेच महाविक्राळ अशा सिंहावर बसून सवारी करत असतेस, एक वेळ तर अशी आली की तू तुझ्या बलशाली बाहूंनी चंड राक्षसाची मुंडीच आवळलीस व मुंड राक्षसालाही दुसर्या हाताने सहज पराजित केलेस. त्यामुळे ह्या अचाट पराक्रमाला दिपून मी तुझा भक्त, अनन्यभावे हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जयजयकार असो.
अयी रण दुर्मद शत्रू वधोद्यत दुर्धर निर्जर शक्तिभृते,
चतुर विचार धुरीण महा हव दूत कृत प्रमथाधिपते |
दुरित दुरीह गुहाशय दुर्मति दानव दूत दूरस्तगते,
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||५||
युद्धात तू तुझ्या अनेक रूपांची जागृत अशा तेजस्वी स्त्री देवींचे संघटन करून शक्ति एकवटून त्या शक्तीशाली दुर्मद राक्षसाचा वध केलास. किती चतुरता आहे ही तुझ्यात, हे चतुरस्त्र अष्टवधानि सदा सावध अशी गिरिजे, शिवालाही महायुद्धात तू तुझे सहकारी पद देऊन त्यांचीहि मदत घेतलीस, आणि अत्यंत वाईट अशा स्वभावाचे, वाईट कर्तुत्वाने भरलेले, वाईट आशा व हेतु धरून, कायम दुसर्यांच्या नाशाचीच इच्छा धरणारे असे राक्षसी वृत्तीच्या लोकांचे शिरोमणि राजे शुंभ जे तुला कायम यमदूत समजतात, अशा हे महिषासुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो.
आई शरणागत वैरि वधूवर वीरवरा भयदायी करे,
त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरो धी कृतमाळ शूल करे |
दुमी दुभितामर दुंदुमी नाद महो मुखरि क्रूत तिग्म करे,
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||६||
हे आई तू दयाळू आहेस, पराजित राक्षसांच्या बायका मुलांनाही कोणतेही कपट मनात न धरता,शत्रुत्व कायमचे न धरता त्यांचेही रक्षण,पालन पोषण करतेस व त्यांना अभय देतेस, खरोखरीच तू धन्य आहेस. कायम कोणी शत्रू नसतो व कायम कोणी मित्र नसतो हे खरे आहे. त्रैलोक्याला सत्ता व संपत्ति च्या आधाराने हैराण केलेल्या राक्षसी वृत्तींच्या राज्यकर्त्याना तू आपल्या त्रिशूळाने घायल करून शरण यावयास भाग पाडलेस, त्यावेळेचे ते युद्ध भूमीवरचे डमरू नाद व दुदुंभी आम्हाला आनंदित करते व युद्धास प्रवृत्त करते,''विनाशायच दुष्कृताम” हा संदेश खरा ठरतो. ह्या लढवय्या गुणी महिषर्सुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो.
आई जगदंबे, शाकंभरी देवी, आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद कायम ठेव, नमोस्तुते.
शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग १)