'ध्यान’ म्हणजे चिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 07:36 PM2021-06-23T19:36:35+5:302021-06-23T19:36:41+5:30
'Meditation' means contemplation : चित्ताची धारणा असेल तेथेच चित्त स्थिर होणे व ते दुसऱ्या विषयावर न जाणे याला ‘ध्यान’ असे म्हणतात.
'ध्यान’ म्हणजे चिंतन. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून (धातु = क्रियापदाचे मूळ रूप) निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’ असा आहे. चित्ताची धारणा असेल तेथेच चित्त स्थिर होणे व ते दुसऱ्या विषयावर न जाणे याला ‘ध्यान’ असे म्हणतात. “धारणेसाठी जो विषय निवडला असेल त्या विषयाचा अनेक क्षणांपर्यंत व्यत्ययरहित होणारा अनुभव म्हणजे ध्यान,” अशी पतंजलींनी ध्यानाची व्याख्या केली आहे (तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् योगसूत्र ३.२).
भोज व वाचस्पति मिश्र यांच्या मते धारणेचा जो आधारभूत विषय म्हणजे आलंबन त्यावर जाणीवेची एकतानता म्हणजे ध्यान होय (पातंजल योगसूत्र ३.२ वरील भोजवृत्ति व तत्त्ववैशारदी). “धारणेमुळे साध्य होते ते ध्यान,” असे विज्ञानभिक्षू यांनी म्हटले आहे (धारणासाध्यं ध्यानमाह पातंजल योगसूत्र ३.२ वरील योगवार्त्तिक). ध्यानामध्ये जाणीवेचा प्रवाह ध्यानासाठी निवडलेल्या विषयावर टिकून राहतो, तो प्रवाह एकाच विषयाचे ज्ञान अनेक क्षणांपर्यंत सातत्याने करून देणारा म्हणून धारावाही असतो.
सांख्यसूत्रात ध्यानाची व्याख्या “चित्तातून ध्येय विषयाव्यतिरिक्त इतर विषय नाहीसे होणे म्हणजे ध्यान” अशी केली आहे (ध्यानं निर्विषयं मन: सांख्यसूत्र ६.२५). तसेच सांसारिक विषयांच्या आसक्तीपासून विरक्त होणे याला ध्यान असे म्हटले आहे (रागोपहतिर्ध्यानम् सांख्यसूत्र ३.३०).
सैरभैर धावणारे मन ध्यानामुळे नियंत्रित होते. मनात विक्षेप उत्पन्न करणारे रजोगुण आणि तमोगुण दुर्बळ होतात व क्रमाक्रमाने चित्त शुद्ध होते.
ज्याप्रमाणे वस्त्रांचा स्थूल मळ आधी पाण्याने दूर करावा लागतो आणि सूक्ष्म मळ क्षारयुक्त साबण इत्यादीने नष्ट करावा लागतो, त्याप्रमाणे क्रियायोगाने अर्थात् तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानामुळे क्लेश क्षीण होतात. पुढे विवेकख्याती म्हणजे पुरुषाला ‘मी प्रकृतीपासून भिन्न आहे’ असे ज्ञान झाल्यावर ते क्लेश दग्धबीज होतात, म्हणजे भाजलेले बीज ज्याप्रमाणे वृक्षनिर्मितीस असमर्थ ठरते त्याप्रमाणे चित्तामध्ये सुप्त रूपाने असणारे हे क्लेश निष्क्रिय होतात आणि असंप्रज्ञात समाधीत चित्त लय झाल्यामुळे ते नामशेष होतात (व्यासभाष्य २.११, तत्त्ववैशारदी २.११).
ध्यानासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या पहिल्या सहा अंगांची पूर्वपीठिका नितांत आवश्यक आहे. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय ध्यान साध्य होत नाही (विष्णुपुराण ७.६.८९).
धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना एकत्रितपणे ‘संयम’ अशी संज्ञा आहे. सूर्य, चंद्र, ध्रुव या बाह्य देशांवरील संयमाचे फळ (योगसूत्र ३.२६, २७, २८). तसेच नाभिचक्र, कण्ठकूप, कूर्मनाडी, मूर्धास्थानातील ज्योत, हृदय या आध्यात्मिक देशांवरील संयमाचे फळ पतंजलींनी सूत्रात सांगितले आहे (योगसूत्र ३.२९, ३०, ३१, ३२, ३४). याचा अर्थ हे ध्यानाचे विषय आहेत असा योगसूत्रात प्रत्यक्ष निर्देश नसला तरी पतंजलींना हे ध्यानाचे विषय अभिप्रेत होते. व्यासांच्या मते परमेश्वरावरील धारणा व ध्यानामुळे योग्याला समाधी शीघ्र साध्य होते आणि समाधीचे फळही मिळते (व्यासभाष्य १.२३, वार्त्तिक १.२३). पतंजलींनी ईश्वराच्या ध्यानाने साधनेतील सर्व विघ्ने दूर होतात असे प्रतिपादन केले आहे (योगसूत्र १.२९); तर ‘यथाभिमतध्यानाद्वा ’(योगसूत्र १.३९) या सूत्रात योग्याला जे अभीष्ट असेल त्याचे त्याने ध्यान करावे त्यामुळे चित्ताला स्थिरता प्राप्त होते असे म्हटले आहे.
श्री ज्ञानेश्वर माऊली खंडागळे