मन हेची परमेश्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 01:06 PM2020-10-02T13:06:46+5:302020-10-02T13:17:24+5:30

Spirituality मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते.

The mind is the God | मन हेची परमेश्वर!

मन हेची परमेश्वर!

Next

आपल्याला जर परमेश्वर हवा असेल तर त्यासाठी ज्ञान हवे नि भक्ती हवी. त्या करिता या मनाला शांत करण्याची गरज आहे. नुसते शांत नाही तर त्याची ओढ़ भक्ती मार्गाकडे कशी लागेल यासाठी प्रयत्न करावा लागेल. मनाची एकाग्रता वाढवावी लागेल. कारण एकाग्रता ही सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे.
मन गोरख, मन गोविंद, मन ही औघड होय
जो मन राखै जतन करि, आपै करता होय ।।
मन हे योगी गोरखनाथ आहे. मन हेच ईश्वर आहे. अर्थात मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते. मन एकाग्र करून जो मनुष्य साधना करतो तो स्वत:च आपला करता (स्वामी) होतो.
मनाबद्दल संत कबीर म्हणतात...
मन मोटा, मन पातरा, मन पानी, मन लाय
मनके जैसी उपजै, तैसी ही हवै जाय ।।
हा मनरूपी भवरा कधी खूपच बलवान बनतो तर कधी अत्यंत नाजुक बनतो. कधी पाण्याच्या समान शीतल तर, कधी अग्निसारखा क्रोधी बनतो. अर्थात जशी आपल्या मनाची इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणे ते मन परिवर्तित होते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा ते सल्ला देतात. म्हणून ते म्हणतात,
मना मानसी दुख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे।।
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।।
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, प्रत्येक वस्तुचा एक स्वभाव असतो. जसे की वाºयाचे घोंगावणे, अग्नीचे पेट घेणे, पाण्याचे अवखळ वाहणे तसाच मनाचा देखील स्वभाव आहे जसे की इच्छा धरणे, चिंता करणे, स्वप्न पाहणे, एखादी गोष्ट घडली की उत्तेजित होणे किंवा अस्वस्थ होणे. मन हे कोबीच्या भाजीसारखे आहे. आपण जर कोबीचा एक एक पदर काढत गेलो तर शेवटी कोबी म्हणून काहीच राहत नाही. तसेच मानवी मनाचे आहे, आपण जर आपले सगळे विचार काढून टाकले तर मन नावाचे स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. परंतु असे कधीच होऊ शकत नाही, कारण विचार करणे हा मनाचा स्थायी भाव आहे. संत बहिणाबाईंनी आपल्या लिखानात मनाला उपमा दिली आहे.
मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर
किती हाकल हाकल तरी येत पिकावर ।।
याही पलिकडे  जाऊन रामकृष्ण परमहंस असे म्हणतात की, मन म्हणजे माकडाचा खोडकरपणा आणि मस्तवाल हत्तीची चाल आहे. मनाचा स्वभाव हा कधी एकच नसतो. ते ज्या शरीरात असते त्याप्रमाणे आपला व्यवहार करीत असते. तीळामध्ये ज्याप्रमाणे तेल सामावलेले असते, त्याचप्रमाणे मन आपल्या शरीरामध्ये वास करीत असते. ज्यावेळी मन योग्य व अयोग्य गोष्टींचा विचार करून योग्य अशा निर्णयावर येऊन पोचते त्यास बुद्धी म्हणतात. मन जेव्हा एकरूप होऊन विचारांची मांडणी करते व ती साठवते त्यास चित्त असे म्हणतात. जेव्हा मन मदमस्त अवस्थेत येऊन मी मी करते तेव्हा त्याला अहंकार म्हणतात.

 समर्थांनी एका मनाच्या श्लोकात हा इलाज सांगून ठेवलाय. ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी, नकोरे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगिकारू, नकोरे मना मत्सरू दंभ भारू !!
याउलट, बहिणाबाईंनी आईच्या मायेने सोप्या भाषेत मनाचे वर्णन करून सावधगिरीचा सल्ला दिला. त्या म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याच्या ठायी ठायी वाटा, जशा वाºयानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. त्या म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू त्याचि काय सांगू मात, आता वहात भुईवर, गेलं गेलं आभायात.‘ स्वच्छंद मन क्षणात चंद्रावर जाते, तर बुद्धीला तेथे जाण्यासाठी ‘यान’ बनवावे लागते. मन आणि बुद्धीतला हा फरक चांगल्या जीवनाकडे नेतो. मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते.

- शून्यानंद भारती
खामगाव

Web Title: The mind is the God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.