मना सज्जना एक जीवी धरावे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 08:02 PM2020-11-05T20:02:55+5:302020-11-05T20:06:58+5:30

ज्याची फोड करता येत नाही असे जे एक अखंड तत्व आहे. ज्याच्यात सर्व परिमाणं, सर्व संदर्भ सामावलेले आहेत अशी जी एकात्मता आहे, भक्ती आहे, जिथे कुठलाही पक्ष विपक्ष नाही, अशी जी एकात्मता आहे, त्या 'एका' ला जीवी धरावयाचा आहे आणि त्याला जीवी धरणाराच खऱ्या अर्थाने आपले हित साधतो..!

Mind should have a life. | मना सज्जना एक जीवी धरावे ।

मना सज्जना एक जीवी धरावे ।

Next

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

मना सज्जना एक जीवी धरावे ।
जनी आपुले हित तुवा करावे ॥
रघुनायकावीण बोलो नको हो ।
सदामानसी तो निजध्यास राहो ॥


प्रत्येक माणूस आयुष्यभर आपले हित साधण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहतो. जीवाचा आटापिटा करून तो आपल्या हितासाठी अनंत वस्तू मिळवित असतो. प्रत्येक माणूस आपल्या शक्तीनुसार, मिळालेल्या संधीनुसार, आपल्या संग्रही अनंत गोष्टी जमवतो. काही माणसांपाशी तर वस्तुसंग्रहाचा ढीग जमा होतो पण तरीही त्यांच्या ठिकाणी शांतता, स्वस्थता, समाधान ह्या गोष्टी आपल्याला पहावयास मिळत नाहीत.

याचा अर्थच असा की, अजून आपले हित साधलेले नाही. आपण जी समृद्धी मिळविलेली आहे, जे काही मिळविलेले आहे, ते परिपूर्ण नसून अपूर्ण आहे. ज्या प्रमाणात वस्तुसंग्रह वाढतो त्या प्रमाणात त्या वस्तूवरील मालकी वाढते, त्या प्रमाणात जीवनात अस्वस्थता येत राहते.

या मालकीबरोबर अनंत अडचणी, अनंत प्रश्न येत राहतात. बाहेरून पाहणारास जरी वाटत असेल की, याला काय कमी आहे..? पद, प्रतिष्ठा, पैसा, घरदार, बायकामुलं, सत्ता, अधिकार या सर्वार्थाने याने तर हित साधले आहे पण त्याच्या अंतरंगाचा वेध घेतला तर कमीपणाचा प्रत्यय आपल्याला येईल..!

भलेही मग तो कमीपणा पैशाचा, प्रकृतीचा, प्रेमाचा अथवा ज्ञानाचा कशाचाही असो..! हे प्रत्येकाच्या जीवनात आहे म्हणून खरे हित कसे साधायचे..? हे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपल्या मनोबोधात सांगतात -

मना सज्जना एक जीवी धरावे ।

हे भल्या माणसा..! तुला आयुष्यात स्वस्थता, शांतता, सुख हवे असेल तर तूं जीवाभावाचे ठिकाणी 'एक' धर..! हा 'एक' काय.? हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. हेच तत्त्व समजावून देण्यासाठी तर अनेक शास्त्रं निर्माण झाली, ग्रंथ निर्माण झाले पण तरीही आपण समजू शकलो नाहीत.

जिझस ख्राईस्टला (येशूला) लहानपणी या 'एका' च्याच जिज्ञासेमुळे शाळेला मुकावे लागले. जिझसला (येशूला) शाळेत घातले. तो वर्गात बसला. शिक्षक शिकवू लागले.

१+१=२, २+१=३.

बे एक बे, बे दुणे चार वगैरे वगैरे आणि जिझस (येशू ख्रिस्त) एकदम उठून उभा राहिला. गुरुजी १+१=२ हे समजले पण सर्वप्रथम हा 'एक' कसा..? हे समजावून द्या..! एकचा धडा शिकवल्याशिवाय दोनचा कसा शिकवता..? एकचा धडा शिकवल्याखेरीज मी दोनचा पाढा म्हणणार नाही.

लाख, करोड समजून देता येतील पण 'एका' ची व्याख्या, 'एका' चे विश्लेषण अवघड आहे. ज्याची फोड करता येत नाही असे जे एक अखंड तत्व आहे. ज्यात सर्व परिमाणं, सर्व संदर्भ सामावलेले आहेत अशी जी एकात्मता आहे, भक्ती आहे, जिथे कुठलाही पक्ष विपक्ष नाही, अशी जी एकात्मता आहे, त्या 'एका' ला जीवी धरावयाचा आहे आणि त्याला जीवी धरणाराच खऱ्या अर्थाने आपले हित साधतो..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: Mind should have a life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.