Mohini Ekadashi 2022: मोहिनी एकादशीच्या व्रताने सर्व दुःखं दूर होऊन संसाराची आसक्ती कमी होते!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:53 AM2022-05-11T11:53:04+5:302022-05-11T11:53:26+5:30
Mohini Ekadashi 2022: यंदा १२ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी.
हिंदू धर्मानुसार, मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाचे विधिने पूजन केले असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात एकादशी दोनदा येते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. यंदा १२ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दु: ख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधने व आसक्ती यापासून मुक्त होते.
भगवान विष्णूनी मोहिनीचे रूप धारण का केले, त्याची कथा-
हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, समुद्र मंथनानंतर बाहेर ;पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुक्ल एकादशीला घडली असे म्हणतात. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. व या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते.
पूजेची पद्धत
मोहिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी सकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर, पूजास्थळावर बसून भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा यांची पूजा करावी. भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळशी, फुले, फळे वहावीत. विष्णू सहस्त्र नाम म्हणावे किंवा ऐकावे. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा १०८ वेळा जप करावा. त्यानंतर विष्णूची किंवा विठ्ठलाची आरती करावी. पूर्ण दिवस उपास करावा. गरजूंना अन्नदान करावे. दुसर्या दिवशी देवपूजा करून उपास सोडावा.