पैशाने सुख कमवता येईलही, पण उपभोगता येईलच असे नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:00 AM2021-04-07T08:00:00+5:302021-04-07T08:00:02+5:30
प्रत्येक क्षण जगून घ्या आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या.
गेल्या वर्षभरात आपण मृत्यूच्या एवढ्या छटा आणि एवढ्या प्रकारे लोकांचे वियोग पाहत आहोत, की अकारण मनाला भीती लागून राहते, की आपल्या मृत्यूसमयी आपल्याजवळ कोण असेल? ज्या गोष्टी आपण आयुष्यभर जपतो, आयुष्यभर जी माणसे जोडतो, पै-पै जोडून एवढा बँक बॅलेन्स गोळा करतो, शेवटच्या क्षणी यापैकी काहीच कामी येणार नसेल, तर काय उपयोग? साखर कंपनीचा मालक मधुमेही असेल, तर त्याला गोडवा कधी चाखता येणार? हॉस्पिटलचा मालक दुर्धर आजाराने ग्रस्त असेल, तर एवढी आरोग्य व्यवस्था हाताशी असून काय उपयोग? म्हणूनच तर म्हणतात ना, प्रत्येक क्षण जगून घ्या आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या.
एक राजा होता. त्याने प्रजेचा खूप छळ करून बराच पैसा अडका गोळा केला होता. आपली संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून त्याने दूर जंगलात एका गुहेत आपला खजिना लपवून ठेवला होता. व त्या गुहेला दार बसवून त्याच्या कुलपाच्या दोनच चाव्या करवून घेतल्या. एक राजाकडे आणि दुसरी त्याच्या विश्वासू मंत्र्याकडे!
मंत्री प्रामाणिकपणे गुहेची पाहणी आणि राखण करत असे. अधून मधून फेरफटका मारत असे. एकदा राजाला हुक्की आली आणि तो खजिन्यात मनसोक्त डुंबण्यासाठी गुहेत गेला. तिथल्या हिरे माणकांमध्ये रमून गेला. त्याच वेळेस मंत्री बाहेरून जात होता. गुहेचे दार त्याला खुले दिसले. त्याला वाटले आपल्याकडून दार चुकून उघडे राहिले की काय? म्हणून त्याने कुलूप लावले आणि तो तिथून निघाला.
परंतु, राज्यात परतल्यावर राजा बेपत्ता असल्याचे त्याला कळले. तो आपले सैन्य घेऊन राजाच्या शोधात निघाला आणि इथे गुहेत अडकलेला राजा हातात चावी असून, हाताशी भरपूर संपत्ती असूनही बाहेर येण्यासाठी तडफडू लागला. त्याला भूक लागली, तहान लागली. पण त्या पैशांचा त्याला काहीच उपयोग होईना. त्याचे प्राण कंठाशी आले. आयुष्यभर केलेली पापं त्याला दिसू लागली. परंतु आता उशीर झाला होता. मृत्यूपूर्वी त्याने दुसऱ्यांना संदेश मिळावा म्हणून त्यातल्यात एका अणकुचीदार हिऱ्याने बोटावर घाव केला आणि रक्ताने एक संदेश लिहून ठेवला, `संपत्तीचा हव्यास धरू नका. मृत्यूसमयी संपत्ती जवळ असूनही ती आपल्याला अन्नाचा घास आणि पाण्याचा घोट देऊ शकत नाही. त्यासाठी माणसे जोडा, तीच खरी संपत्ती आहे.'
अनेक दिवसांनी मंत्री तिथे आला, त्याने हा संदेश वाचला आणि राजाला पापातून मुक्तता मिळण्यासाठी त्याने ती संपत्ती जनतेत वाटून दिली.