जुलै महिन्यात शनी देवांपासून 'या' तीन राशींनी बाळगावी विशेष सावधगिरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:43 AM2021-07-07T11:43:13+5:302021-07-07T11:43:30+5:30
शनी ग्रहाचे वक्र परिवर्तन म्हणजे परीक्षेत परीक्षा असे मानण्यास हरकत नाही.
शनी हा ग्रह अत्यंत कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी दशेचा आपल्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडत असतो. आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीव्यतिरिक्त दर मासाला नभोमंडलात बदलणारी ग्रहदशादेखील आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकत असते. त्यातही जेव्हा शनीचे भ्रमण सुरु होते, त्यावेळेस बाराही राशींवर त्याचे कमी अधिक परिणाम दिसून येतात. परंतु जुलै महिन्यात शनी वक्र दिशेने भ्रमण करत असल्यामुळे तीन राशींनी सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा काळ ठरू शकतो. या तीन राशी कोणत्या ते पाहू...
धनु, मकर आणि कुंभ राशीवर साडेसाती सुरु आहे. धनु राशीसाठी साडेसातीचा अंतिम टप्पा आहे, मकर राशीचा मध्यम टप्पा आहे आणि कुंभ राशीसाठी साडेसातीचा सुरुवातीचा काळ आहे. साडेसाती या शब्दाने भयभीत होण्याचे कारण नाही. परीक्षेला घाबरून चालत नाही. आपण अभ्यास केला असेल तर परीक्षेची भीती वाटत नाही आणि केला नसेल तर नापास होण्याची भीती वाटते. त्याचप्रमाणे साडेसातीच्या काळात आपला प्रामाणिकपणा, इतरांना मदत, संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता, चांगल्या वाईट लोकांची ओळख अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत कस लागतो. हा काळ अपयश देणारा नसून आपल्या आयुष्यातील वास्तवाचे दर्शन घडवणारा असतो. त्यामुळे शनी ग्रहाचे वक्र परिवर्तन म्हणजे परीक्षेत परीक्षा असे मानण्यास हरकत नाही.
या काळात कोणत्या गोष्टी घडू शकतात?
आपण सगळेच जण दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या संकटांना सामोरे जातो. पण काही वेळेस संकट एकटे येत नाही, तर ते संकटांची शृंखलाच सोबत घेऊन येते. अशा वेळेस न डगमगता त्याला सामोरे जाणे ही आहे परीक्षेत परीक्षा!
अनेकदा आपल्या संयमाचा कस लागतो, त्यावेळेस आपला शारीरिक, मानसिक, आर्थिक तोल ढासळू न देता, मनाचा संयम कायम ठेवला पाहिजे.
आजारपणात किंवा आर्थिक अडचणींमध्ये मनुष्य पूर्ण खचून जातो. त्यावेळेस उमेद सोडून न देता, इच्छा शक्ती वाढवून त्या संकटाना तोंड देता आले पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी जिथे आपल्याला आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहणे गरजेचे असते, ती तत्त्व सोडून न देता परिस्थितीला सामोरे जाणे अभिप्रेत असते. हीच आहे साडेसाती!
त्यात पुढील उपाय केले असता, मानसिक बळ मिळून शनीदशेचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकेल.
- हनुमान आणि शंकराची पूजा करावी.
- पिंपळाच्या झाडाशी दर शनिवारी राईच्या तेलाचा दिवा लावावा.
- अज्ञात लोकांशी परिचय करताना किंवा त्यांच्यासोबत काम करताना सावधगिरी बाळगावी.
- दर शनिवारी काळे उडीद, काळे तीळ, तेल आणि रुईच्या पानांचा हार शनी देवाला वहावा.
- शक्य असल्यास पूर्ण महिनाभर मांसाहार आणि मद्यपान टाळावे. विशेषतः शनिवारी तरी नक्कीच व्यर्ज्य करावे.
- चिमण्यांना दाणा पाणी आणि मुंग्यांना साखर टाकायला विसरू नका.