Motivational Story: पंचवीस वर्षांचे आयुर्मान मिळालेला मनुष्य शतायुषी कसा झाला? वाचा त्यामागची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:43 PM2024-05-30T14:43:47+5:302024-05-30T14:44:13+5:30
Inspirational Story: किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे पाहणं महत्त्वाच आहे, त्यासाठी हे आयुष्य कसं आणि किती मिळालं आहे तेही जाणून घ्या.
एका साधुमहाराजांना एका सज्जनाने प्रश्न विचारला, `महाराज, माणसाचे आयुष्य सर्वसाधारण किती असते?'
महाराज म्हणाले, `पंचवीस वर्षे'
आश्चर्यचकित होत सगळे म्हणू लागले, `महाराज ते कसे काय?'
महाराज सांगू लागले, एक रुपक कथा आहे.
जेव्हा ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली, त्यावेळी ईश्वराने प्रत्येक प्राण्याचे आयुष्य निश्चित केले. प्रत्येकी पन्नास वर्षे. मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्याने मनुष्याला घडवायला देवाला अधिक वेळ लागला. म्हणून मग देवाने माणसाला आयुष्य दिले, फक्त पंचवीस वर्षे.
सगळ्या प्राण्यांना-पक्ष्यांना पन्नास वर्षे आयुष्य आणि आपल्याला फक्त पंचवीस वर्षे? मनुष्य बुद्धिवादी प्राणी असल्याने त्याला वाटू लागले की ईश्वराने आपल्यावर अन्याय केला आहे. त्याने ईश्वराजवळ तक्रार केली. `देवा, पंचवीस वर्षांच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही. थोडे अधिक आयुष्य वाढवून दिले असते तर...'
ईश्वराने सांगितले, `माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केले आहे़ जर तुला ते कमी वाटत असेल, तर त्या प्राण्याला आपले आयुष्य जास्त वाटत असेल, तर त्याच्याकडून तू खुशाल घेऊ शकतोस.'
थोड्या वेळाने बैल आला आणि ईश्वराला म्हणाला, `देवा पन्नास वर्षे आयुष्य माझ्यासाठी खूप जास्त होईल. त्यातले पंचवीस वर्षे कमी केले तर बरे होईल.'
ईश्वराने म्हटले, `ठीक आहे, तुला नको असलेले पंचवीस वर्षे मनुष्याला दे.'
माणसाने बैलाकडची पंचवीस वर्षे आयुष्य आनंदाने स्वीकारले.
थोड्या वेळाने कुत्रा आला, तोही तेच सांगू लागला.
`देवा, पन्नास वर्षे आयुष्य खूप होईल. मला पंचवीस वर्षेच पुरे!'
देवाने त्याच्या आयुष्यातील पंचवीस वर्षे कमी करून मनुष्याला दिली. पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य मिळूनही मनुष्य समाधानी नव्हता. त्याला पूर्ण १०० वर्षे आयुष्य हवे होते.
तेवढ्यात घुबड आले. त्यानेही पंचवीस वर्षे आयुष्य मागून वरची पंचवीस वर्षे मनुष्याला दान केली.
अशा रितीने मनुष्याचे आयुष्य १०० वर्षे पूर्ण झाले. मात्र, या शंभर वर्षात तो खऱ्या अर्थाने पहिली पंचवीस वर्षेच जगतो. वरची उसनी मिळालेली वर्षे ज्या प्राण्यांकडून दानात मिळाली, त्यांच्यासारखे जगतो. त्यानंतर पंचवीस वर्षे कुटुंबासाठी बैलासारखा राबतो. निवृत्ती जवळ येऊ लागली, की वृद्धापकाळ डोकावतो. मनुष्य शांत होण्याऐवजी कुत्र्यासारखा समोरच्यावर भुंकून आपलेच म्हणणे खरे करू पाहतो. पंचाहत्तर वर्षे कशी बशी जातात, परंतु शेवटची पंचवीस वर्षे ना जागता येत ना झोप लागत, अशी घुबडासारखी अवस्था होते आणि अशा अवस्थेत मनुष्य केवळ मृत्यूची वाट पाहू लागतो. कारण त्यावेळी त्याला आयुष्य नाही, तर जगण्यातून सुटका हवी असते. त्याला उसने आयुष्य मागितल्याचा पश्चात्ताप होऊ लागतो आणि देवाने दिलेली पंचवीस वर्षेच आनंदाची होती, याचा आठव होऊ लागतो.
ही रुपक कथा ऐकून झाल्यावर भाविक म्हणाले, महाराज, म्हणजे माणसाचे आयुष्य दु:खमयच आहे का? सुखी होण्याचा उपाय नाही का?'
महाराज म्हणाले, `आहे ना! जोपर्यंत धडधाकट आहात, तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या. म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळू हळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा. सतत सत्संग करा. ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका. म्हणजे उरलेले दु:खदायक आयुष्य तुम्हाला सुखदायक होईल. वास्तविक जेवढी वर्षे तुम्ही ईश्वराशी जोडून राहता तेवढेच तुमचे खरे आयुष्य!'