संगीत आपल्याला सर्व प्रकारचे दु:खं विसरायला लावते; सूर ज्योत्स्ना सोहळ्यात गौर गोपालदासांशी मराठीतून संवाद!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 17, 2021 09:33 PM2021-02-17T21:33:05+5:302021-02-17T21:33:42+5:30

दैनंदिन लोकमत आयोजित सूर ज्योत्स्ना या पुरस्कार सोहळ्यात गौर गोपाल दास प्रभू यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांच्याशी निगडित अनेक चांगल्या गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टी मराठी मातीशी निगडित असल्यामुळे त्या ऐकून चाहत्यांनाही आनंद झाला.   

Music makes us forget all kinds of sorrow; Conversation in Marathi with Gaur Gopaldas at Sur Jyotsna ceremony! | संगीत आपल्याला सर्व प्रकारचे दु:खं विसरायला लावते; सूर ज्योत्स्ना सोहळ्यात गौर गोपालदासांशी मराठीतून संवाद!

संगीत आपल्याला सर्व प्रकारचे दु:खं विसरायला लावते; सूर ज्योत्स्ना सोहळ्यात गौर गोपालदासांशी मराठीतून संवाद!

Next

पूर्वीचे लोक प्रेरणादायी विचार मिळवण्यासाठी पुस्तकांचा, व्याख्यानांचा, कीर्तन-प्रवचनातून श्रवणभक्तीचा आधार घेत असत. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. लोकांकडे पुरेसा वेळ नाही. परंतु आताच्या आव्हानात्मक काळातही प्रेरणादायी विचारांची गरज कमी झालेली नाही, तर अधिकच  वाढलेली आहे. लोक एकमेकांपासून दुरावले जात आहेत, नात्यांमध्ये विसंवाद निर्माण होत आहे, प्रेमाची जागा अहंकार घेत आहे. अशा वेळी लोकांना आधार आहे, तो समाज माध्यमांवरील प्रेरणादायी वक्त्यांचा! अशा वक्त्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते, गौर गोपालदास प्रभू यांचे. इंग्रजी भाषेत परंतु सहज सोप्या शब्दात मांडलेले विचार, प्रेरक कथा, दैनंदिन समस्यांवरील तोडगे, यांमुळे गौर गोपाल दास यांचे अनेक व्हिडिओ ऐकले व शेअर केले जातात.

दैनंदिन लोकमत आयोजित सूर ज्योत्स्ना या पुरस्कार सोहळ्यात गौर गोपाल दास प्रभू यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांच्याशी निगडित अनेक चांगल्या गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टी मराठी मातीशी निगडित असल्यामुळे त्या ऐकून चाहत्यांनाही आनंद झाला.   
गौर गोपालदास प्रभू यांचा जन्म पुण्यात देहू रोड परिसरात झाला. त्यांचे शिक्षणही पुण्यात झाले. त्यांचा मित्रपरिवारदेखील मराठमोळा असल्याने त्यांना छान मराठी बोलता येते. एवढेच नाही, तर त्यांनी बरेचसे मराठी साहित्यदेखील वाचले आहे. आपल्या सर्वांचे लाडके पु.ल.देशपांडे आणि व.पु.काळे हे त्यांचे आवडते लेखक आहेत. गौर गोपालदास यांच्या `लाईफ अमेझिंग सिक्रेट' या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. तसेच लवकरच मराठीत प्रेरणादायी विचारांचे व्हिडिओ करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
 
सूर ज्योत्स्नाच्या निमित्ताने संगीताबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. ते म्हणतात, 'संगीतामुळे अवघड परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळते, तसेच गाण्यातील शब्द आपल्या मानसिक आघातांवर संजीवनीसारखे काम करतात. म्हणून संगीताला आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त स्थान द्या, असे ते सुचवतात. त्यांचे आवडते मराठी गायक कोण, असे विचारले असता क्षणाचाही विलंब न करता ते सांगतात, `मला बाबुजींचे गीतरामायण आणि सुरेश वाडकरांचे ऊँकार स्वरूपा अतिशय आवडते.'

सूर ज्योत्स्ना या कार्यक्रमाप्रसंगी गौर गोपालदास प्रभू यांनी मराठीतून साधलेल्या संवादामुळे त्यांची भेट श्रोत्यांसाठी आणखीनच सुरेल ठरली. लवकरच त्यांच्या मधुर वाणीतून मराठी व्हिडिओ ऐकायला आणि पहायला मिळतील अशी अपेक्षा करूया.

Web Title: Music makes us forget all kinds of sorrow; Conversation in Marathi with Gaur Gopaldas at Sur Jyotsna ceremony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.