कैलास – गूढत्वाचा परीस स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:28 PM2020-05-04T15:28:51+5:302020-05-04T15:29:03+5:30

फार पूर्वीपासून कैलास पर्वताकडे एक पवित्र पर्वत म्हणून पाहिले गेले आहे. सद्गुरु समजावून सांगतात की प्रत्यक्षात तो एक गूढ असे ग्रंथालयच आहे, आणि या स्थानाचे तसेच येथील तीर्थयात्रेच्या अनुभवाचे महत्व सांगतात.

mysterious kailash mountain | कैलास – गूढत्वाचा परीस स्पर्श

कैलास – गूढत्वाचा परीस स्पर्श

Next

प्रश्नकर्ता: मी 2012 साली कैलास पर्वतावर गेलो होतो आणि तुम्ही आम्हा सर्वांना तिथे दीक्षा दिली होती. आजपर्यंत माझ्या आयुष्यातला हा सर्वात महत्वाचा अनुभव आहे. तुम्ही कृपया याविषयी थोडे अधिक सांगू शकाल का?

सद्गुरु: साधारणपणे, एका विशिष्ट कारणासाठी दीक्षा दिली जाते. आम्ही जर तुम्हाला शून्याची दीक्षा दिली, तर त्यामुळे तुम्ही ध्यानधारक बनु शकता, तुमच्यात पुरेशी ऊर्जा असेल, आणि तुमच्या मानसिक प्रक्रियेपासून स्वतःला जाणीवपूर्वक विभक्त करण्यासाठी तुम्ही पुरेसे सक्षम बनु शकाल. त्याचप्रमाणे, अनेक वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा असतात. पण, जेव्हा आम्ही कैलासावर असतो तेंव्हा साधारणपणे आम्ही जे काही करतो ते एखादा विशिष्ट अनुभव प्रदान करण्यासाठी नसून त्याठिकाणी उपलब्ध असणार्‍या प्रचंड शक्यतांना तुम्ही ग्रहणशील व्हावे यासाठी असते– ही सर्वात महत्वाची बाब आहे. यासारखी दीक्षा म्हणजे दार उघडून तुम्ही त्यातून किती आत्मसात करून घेऊ शकता हे पाहण्यासाठी असते कारण ती संपूर्ण जागा म्हणजे एक अदभूत आणि विस्मयकारक रचना आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला या दिक्षेचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे येईल. तुम्ही जर उत्सुक असाल आणि मोकळ्या मनाने पाहिलेत, तर तुम्हाला तुमच्यासाठी एखादी प्रचंड संधी गवसेल.

प्रश्नकर्ता: सद्गुरु, तुम्ही कैलासाचे वर्णन एक गूढ ग्रंथालय असे केले आहे. नक्की कोणत्या ठिकाणी ही माहिती साठवून ठेवलेली आहे? एखाद्या विशिष्ट तत्वात, कदाचित ते आकाश असू शकेल, का ती संपूर्ण पर्वतात साठवून ठेवली आहे?

सद्गुरु: ज्ञान साठवून ठेवण्याच्या दृष्टीने, आकाश महत्वाचे आहे, पण माहिती ही केवळ मूलभूत निसर्गाच्या आकाशिक स्वरुपात संग्रहीत केली गेली, तर ती अतिशय नाजुक बनेल. पाचही तत्वांसह, संपूर्ण भौतिक वस्तुमानाचा वापर ही माहिती संग्रहीत ठेवण्यासाठी केलेला आहे. आणि त्याहीपेक्षा, -भौतिक नाही असे एक परिमाण आहे, पंचतत्वांशी कोणताही संबंध नसलेल्या एका उर्जेचा वापर साठवणूक करण्याची एक कायमस्वरूपी जागा म्हणून केला गेला आहे – कैलास प्रामुख्याने तेच आहे. आणि तसे असल्याने, सर्व तत्वेदेखील एका विशिष्ट प्रकारे उलगडत आहेत. या अ-भौतिक परिमाणामुळे ही तत्वे त्याठिकाणी त्यांच्या सर्वोच्च स्तरावर कार्यरत आहेत.

आधुनिक जगात आणि आधुनिक विज्ञानात, ज्याला ज्ञान समजले जाते ते निष्कर्षांचा एक संच आहे जे निसर्गाच्या एका विशिष्ट परिमाणाचे किंवा पैलूंचे निरीक्षण करून काढले जातात. त्या विरुद्ध, या ठिकाणी असलेले ज्ञान म्हणजे निष्कर्षांचा संच नाही – ते एखाद्या शक्तीशाली उत्तेजकासारखे आहे. तुम्ही त्याला स्पर्श केलात, तर ते तुमच्यामधील आणि तुमच्या भोवताली असलेली परिमाणे खुली करते. हे एक निर्णायक ज्ञान नाही, तर एक उत्तेजक आहे. तुम्ही त्याला स्पर्श केलात, तर तुम्ही आतमधून पेटून उठाल आणि ते आत्मसात करणे तुमच्यावरच अवलंबून असेल.

प्रश्नकर्ता: आपण म्हणालात, की सामान्य माणसांच्या अनुभवात न येणार्‍या परिमाणाचे ओझे बाळगण्याचा आणि सुदैव लाभलेल्या योगींनी त्यांच्याकडे असलेले ज्ञान हिमालयात जमा केले आहे. म्हणूनच तुम्ही दरवर्षी कैलासाचा प्रवास करता का?

सद्गुरु: तुम्ही कैलासावर तुमची स्वाक्षरी करण्यासाठी जात नाही. तसे मी कदापि करणार नाही. तुम्ही कैलासावर अशासाठी जाता कारण ती एक अशी प्रचंड गोष्ट आहे की तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य जरी तिथे घालवलेत, तरीसुद्धा तो तुम्हाला पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करेल. मी जरी यात्रेकरू नसलो, तरी माझ्यासाठी ही कैलासावर जाण्याची दहावी वेळ आहे. एक गोष्ट म्हणजे, मी जर माझे डोळे मिटले, मी अगदी कोठेही असलो तरी काही हरकत नाही – तर मला कोठेही जाण्याची गरज नाही. मी अस्वस्थ होऊन तिथे जात नाही. मी शंकराचा शोध घेण्यासाठी तिथे जात नाही. मी स्वतःचा शोध घेण्यासाठी तिथे जात नाही. पण कैलासाची प्रचंड विशालताच मला त्याच्याकडे आकर्षित करून घेते. तुम्ही त्याकडे कितीही वेळा आणि कोणत्याही मार्गाने पाहिले, तरीसुद्धा त्याच्याकडे पाहण्याचे इतर असंख्य मार्ग असतातच. तिथे पुन्हा न जाण्याचे एकमेव कारण म्हणजे पाय आणि फुफुस्से हेच असू शकेल.

नक्कीच, योगींचे प्रभाव अनेक ठिकाणी दिसून येतात, उदाहरणार्थ दक्षिण भारतातील वेलियांगिरी पर्वत, कैलास आणि हिमालयातील अनेक भाग. काळ आणि घटनांच्या संदर्भात बरेच काही घडून गेले असले, तरीसुद्धा हा प्रभाव त्याठिकाणी ठळकपणे जाणवतो. ज्यांनी केवळ तन आणि मनच नव्हे तर त्यांच्या मूळ गाभ्यासह काम केले आहे त्यांचे ठसे इथे कायमच उमटलेले राहतील. या ठशांचे जतन करून ठेवले जाईल, पण त्याच वेळेस, इतर लोकांना त्याचा अनुभव घेता येण्यासाठी वातावरणाचे जतन करणे सुद्धा महत्वाचे आहे. आज तेथे असणार्‍या लोकांची ही जबाबदारी आहे. असे समजा की ध्यानलिंगाच्या जागी तुम्ही एक बाजारपेठ वसवली आहे, ध्यानलिंगाचे प्रतिध्वनी उमटत राहतीलच पण लोकांना त्याचा अनुभव घेता येणार नाही. कैलास आणि यासारख्या इतर कोणत्याही जागेसाठी एक विशिष्ट वातावरण कायम ठेवणे महत्वाचे आहे.

Web Title: mysterious kailash mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.