Nag Diwali 2024: आज आहे नागदिवाळी; ती कशी करायची साजरी? काय असतो विशेष नैवेद्य? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 04:38 PM2024-12-06T16:38:10+5:302024-12-06T16:38:30+5:30

Nag Diwali 2024: विशेषतः विदर्भात नागदिवाळी साजरी केली जाते; तिचे महत्त्व, पूजा, नैवेद्य आणि आशीर्वाद याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

Nag Diwali 2024: Today is Nag Diwali; How to celebrate it? What is a special menu? Read on! | Nag Diwali 2024: आज आहे नागदिवाळी; ती कशी करायची साजरी? काय असतो विशेष नैवेद्य? वाचा!

Nag Diwali 2024: आज आहे नागदिवाळी; ती कशी करायची साजरी? काय असतो विशेष नैवेद्य? वाचा!

यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी संपली. पुढे कार्तिकी एकादशी, तुळशीचे लग्न आणि आप्तेष्टांकडे सुरु झालेली लग्नसराई यातच डिसेंबर उजाडला. दिवाळी लवकर संपल्याचे दुःख भरून काढण्यासाठी मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी आपण साजरी केली आणि आता मार्गशीर्ष पंचमीला अर्थात आज ६ डिसेंबर रोजी आपण नाग दिवाळी (Nag Diwali 2024) साजरी करणार आहोत. 

हा सण विदर्भात साजरा केला जात असला, तरी त्या औचित्याने आपल्यालाही घरी गोडधोड करता येणार असेल, देवाचा आशीर्वाद मिळणार असेल तर आपल्यालाही नागदिवाळी साजरी करायला काय हरकत आहे? नाही का...!

मार्गशीर्ष पंचमी हा दिवस विवाह पंचमी म्हणूनही ओळखला जातो. कारण, आजच्या तिथीला श्रीराम-जानकीचा विवाह झाला होता. यंदा अयोध्येत राम मंदिर झाल्याने मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आला आहे. देशभर राम मंदिरात विवाह पंचमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आपण भारतीय उत्सव प्रिय असल्याने आपण केवळ निमित्त शोधत असतो असे म्हटले तरी चालेल! हे निमित्त आपल्या संस्कृतीने पुरेपूर मिळवून दिले आहे. जसे की आज विवाह पंचमी, नाग दिवाळी आणि उद्या ७ डिसेम्बर रोजी चंपाषष्ठी (Champa Shashthi 2024) अर्थात खंडोबाची षडरात्रोत्सव समाप्ती!

तर नागदिवाळी हा नागपंचमी सारखाच सण आहे. निसर्गाप्रती कृतज्ञतेचा! नागपूरचे शिरीष पटवर्धन सांगतात, 'या काळात खरिपाची पिके निघालेली असतात. याच नव्या धान्याचा उपयोग करून या सणाचा स्वयंपाक केला जातो. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. या सर्व पदार्थांच्यावर पुरणाचा अथवा कणकेचा दिवा लावून त्याद्वारे देवाची कुलदैवताची पूजा केली जाते. नागपूर जिल्ह्यात व विदर्भात या सणाला पुरणपोळी करण्याची परंपरा आहे.' 

काही ठिकाणी कणकेचे नागदिवे लावून नागदिवाळी साजरी केली जाते. अर्थात कणकेच्या दिव्यांना नागाचा आकार देत ते प्रज्वलित केले जातात. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र, म्हणून त्याचे पूजन केले जाते. नागदेव हे अनेकांचे कुलदैवतही असते. त्यानिमित्ताने कुलपुरुषाची, कुलदेवीची पूजा करून, स्मरण करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच घरात जेवढे सदस्य आहेत तेवढे गोड पदार्थ करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा आहे. अलीकडे सगळ्यांनाच गोड पदार्थाचे वावडे असल्याने एखादा पदार्थ करून सगळ्यांचे तोंड गोड करता येईल. 

आपल्याकडे दिवाळी, देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून, यात महत्वाचे म्हणजे दिवे आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे.

नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो.

Web Title: Nag Diwali 2024: Today is Nag Diwali; How to celebrate it? What is a special menu? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.