Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:09 AM2023-08-21T11:09:06+5:302023-08-21T11:19:02+5:30
Nag Panchami 2023: श्रावण मासात महाकालेश्वराची पूजा ठरलेली असते, नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या तिसऱ्या दारामागचे रहस्यही जाणून घेऊ.
उज्जयिनीचे महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्रिपुरासुर माजला होता. त्याचा वध शिवशंकरांनी केला. याचाच अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळवला. म्हणून या ठिकाणाचे नाव उज्जयिनी आहे. तिथे शिव शंकरांची आपल्या परिवारासह शेषावर विराजमान झालेली अद्भुत मूर्ती आहे. अशा मूर्तीचे दर्शन अन्यत्र कोठेही घडत नाही. हे मंदिर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे . परंतु या मंदिराच्या तीन भागांपैकी सर्वात वरचा भाग तो म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिराचा भाग हा केवळ नागपंचमीच्या (Nag Panchami 2023) दिवशी २४ तास खुला असतो आणि त्याच दिवशी या सुंदर मूर्तीचे दर्शन घेता येते.
महाकालेश्वर मंदिर तीन भागात विभागले आहे. गर्भगृहात अर्थात तळ घरात महाकालेश्वर विराजित आहेत. मधल्या भागात ओंकारेश्वर विराजित आहेत आणि वरच्या भागात नाग चंद्रेश्वर विराजित आहेत. या मंदिरात माता सतीचे कोपर गळून पडले होते म्हणून हे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक मानले जाते व तिथे देवीच्या कोपराची पूजा केली जाते. गर्भ गृह आणि मध्य गृह दर्शनासाठी नेहमी खुले असतात, परंतु नाग चंद्रेश्वराचा भाग दर्शनासाठी केवळ नागपंचमीलाच खुला केला जातो.
नाग चंद्रेश्वर मंदिरात असलेली मूर्ती अकराव्या शतकातली आहे असे म्हटले जाते. ही मूर्ती नेपाळवरून आणली असल्याचे पुरावे आहेत. आपण नेहमी विष्णूंना शेष शय्येवर विराजमान झालेले पाहतो, परंतु याठिकाणी समस्त शंकर कुटुंबीय शेष शय्येवर विश्रांती घेत असलेले दिसतात. ही प्रतिमा केवळ अद्भुत आहे. या मंदिरात असलेल्या नागमूर्तींच्या दर्शनाने सर्व प्रकारचे सर्पदोष नष्ट होतात अशी श्रद्धा आहे, म्हणून नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात तिथे दर्शनासाठी गर्दी करतात.
कोव्हीड मुळे सलग दोन वर्षे भाविकांना दर्शन घेता आले नाही, परंतु प्रथेमध्ये आजतागायत खंड पडलेला नाही. नागपंचमीच्या दिवशी तिथे त्रिकाल पूजा केली जाते. पहिली पूजा नागपंचमीची तिथी सुरु होते तेव्हा, दुसरी सूर्योदयाला आणि तिसरी सूर्यास्ताला केली जाते. आज नागपंचमीच्या निमित्ताने आणि श्रावण मासाच्या निमित्ताने आपणही नाग चंद्रेश्वराचे आणि महाकालेश्वर तसेच ओंकारेश्वराचे चित्रमय दर्शन घेऊन पावन होऊया. हर हर महादेव!