Nag Panchami 2023 : आपण नागपंचमी का साजरी करतो? जाणून घ्या पौराणिक संदर्भ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:00 AM2023-08-21T07:00:00+5:302023-08-21T07:00:02+5:30
Nag Panchami 2023: २१ ऑगस्ट रोजी आपण नागपंचमीचा सण साजरा करणार आहोत, तो साजरा करण्यामागचे कारणही जाणून घेऊ.
इतर जीवसृष्टी तसेच प्राणीसृष्टीबद्दल प्रेम, दया, कृतज्ञभाव दर्शवण्यासाठी गरुड, कोकिळा, राजहंस, मोर आदि पक्षी, तसेच वाघ, सिंह, गाय, वृषभ, महिष, घोडा, उंदिर, श्वान आदि प्राणी यांचे आपण कृतज्ञता भावाने पूजन व गुणगान करत आलो आहोत. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे हा याच परंपरेचा एक भाग आहे. यंदा २१ ऑगस्ट रोजी नागपंचमी (nag panchami 2023)आहे. जाणून घेऊया या सणाची सविस्तर माहिती...
नागाचा संदर्भ आपल्या धर्मग्रंथात अनेक ठिकाणी आलेला आहे. श्रीविष्णू हे शेष नागाची शय्या करून त्यावर आसनस्थ झाले आहेत. देव दानवांनी केलेल्या समुद्र मठनात वासुकी नावाचा दोरासारखा उपयोग करण्यात आला होता. नागलोक नावाची एक अद्भुत सृष्टी पाताळात आहे, असा धार्मिक कथांमधून उल्लेख आढळतो व त्या ठिकाणी नागदेवता राहतात असेही सांगितले जाते. माणसाच्या ठायी जी कुंडलिनी शक्ती आहे ती मणक्याच्या खाली सर्पकृती वेटोळे घालून बसलेली असते.
श्रीशंकराने आपल्या गळ्यातच नागाला धारण केले आहे. भगवान श्रीकृष्णाने लहानपणी यमुना नदीतील कालिया नावाच्या विषारी नागाला लोळवून गोकुळास भयमुक्त केले होते, अशी कथा आहे. हा कालिया मर्दनाचा प्रसंग श्रावण शुद्ध पंचमीला घडला होता असेही सांगितले जाते. या धारणेला अनुसरून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नाग किंवा साप हे खूप उपयुक्त ठरतात. शेतीचा नाश करणाऱ्या प्राण्यांना ते खाऊन टाकतात. त्यामुळे शेताचे आणि पिकांचे रक्षण होते. नागाला म्हणूनच क्षेत्रपाल म्हणून संबोधले जाते.
नागपंचमीच्या दिवशी मुख्यत: स्त्रिया नागाची पूजा करतात. जिवंत नागाऐवजी अलिकडे कागदावर किंवा पाटावर नऊ नागाचे चित्र रांगोळीने रेखाटून गंध, फुले वाहून त्याची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या नागांची पूजा केली जाते. दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी सर्पाकृती भाज्या भक्षण न करण्याची प्रथा आहे. तसेच विळी, चाकू, सुरी, तवा या साधनांचा उपयोग न करता अन्न केवळ शिजवून खाण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष वारुळाची पूजा केली जाते. पण ते ग्रामीण भागातच शक्य आहे. नागपूजेने नागदंशाचे भय नष्ट होते असे म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी नाग कुणालाही दंश करत नाहीत, हा मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे.