Nag Panchami 2024: नागपंचमीचा नैवेद्य न चिरता, न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:03 AM2024-08-08T09:03:24+5:302024-08-08T09:05:59+5:30

Nag Panchami 2024: ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे, त्यादिवशीच्या नैवेद्याचे विशिष्ट नियम आहेत, पण का? ते जाणून घेऊया.

Nag Panchami 2024: Know the Reason behind Non-Chopping, Non-Frying food making on Nagpanchami! | Nag Panchami 2024: नागपंचमीचा नैवेद्य न चिरता, न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या!

Nag Panchami 2024: नागपंचमीचा नैवेद्य न चिरता, न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या!

चातुर्मासात येणारे सगळेच सण वैशिष्ट्य पूर्ण असतात. त्यामागे कथाही रोचक असतात. श्रावण वद्य पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. नागपंचमीला चिरणे, तळणे, भाजणे इ. क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना? जाणून घ्या!नागपंचमीसंदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांतीस्थाने असतात. अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये, म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे. ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते. 

त्यादिवशी जशी शेतकामाला सुटी तशीच गृहीणीलाही रोजच्या रांधा, वाढा, उष्टी काढा या कामातून सुटी देण्याच्या हेतूने भाजू, चिरू नये असा नियम केला असावा. ती स्वत:साठी सुटी कधीच घेत नाही, अशा निमित्ताने तिला थोडा आराम, हा त्यामागील मूळ हेतू आहे. त्याला जोड दिली जाते पौराणिक कथेची. ती कथा पुढीलप्रमाणे आहे

एकदा एक शेतकरी जमीन नांगरीत असतना त्याच्या नांगराचा  फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी, तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वत: ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले. त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले. त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली. 

या कथांवरून कळते, की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते. यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे इ. कामे टाळली जातात. तरीदेखील हा सण असल्यामुळे मोदक, पुरणपोळी, दिंड , पातोळ्या यांसारखे पदार्थ त्यादिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.

गावातच नाही, तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते, परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता, त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाजजागृती झाली आहे. यानिमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबर खऱ्याखुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले, तर या सणाचा व्यापक दृष्टीकोन सार्थकी लागू शकेल.

Web Title: Nag Panchami 2024: Know the Reason behind Non-Chopping, Non-Frying food making on Nagpanchami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.