Nag Panchami 2024: नागपंचमी साजरी करण्याआधी नागाशी संमबंधित 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:19 AM2024-08-08T10:19:29+5:302024-08-08T10:19:58+5:30
Nag Panchami 2024: नागाची पुजा केली म्हणजे नागपंचमी साजरी झाली असे नाही, तर या विषारी पण महत्त्वपूर्ण घटकाबद्दल विशिष्ट गोष्टी जाणून घेणेही महत्त्वाचे!
यंदा ९ ऑगस्ट रोजी नाग पंचमी आहे. नागपंचमीला आपण नागाच्या प्रतिमेची पूजा करतो, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतो. काही ठिकाणी खऱ्या नागाची पूजादेखील केली जाते. मात्र नागाचे पूजन करण्याबरोबरच काही महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असणे गरजेचे असते. त्याबद्द्दल माहिती देत आहेत ॐकार सुहास काणे...
>> नाग/ साप दूध पीत नाही, तो पूर्णतः मांसाहारी जीव आहे.
>> नागमणी, नागाच्या डोक्यावर केस इ. अंधश्रद्धा आहेत.
>> नाग डूख धरून, व्यक्ती लक्षात ठेवून पाठलाग करू शकत नाही.
>> साप अमर नसतात. सापाची कात विषारी नसते.
>> सामान्य नागरिकांनी साप बंदिस्त ठेवणे हा गुन्हा आहे. ती परवानगी संबंधित औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधन संस्थांना असते.
४ विषारी प्रजाती - नाग, मण्यार, घोणस, फुरसे सोडून महाराष्ट्रात अपवादानेच आग्या मण्यार इ. विषारी जात पूर्वेकडच्या जिल्ह्यांमधे आढळते. इतर सर्व जाती बिनविषारी किंवा निमविषारी असतात. त्यांच्या दंशाने माणसाचा मृत्यू होत नाही.
>> महाराष्ट्रातील सजग शेतकरी शक्यतो धामण, दिवड, नानेटी इ. सहज ओळखता येणारे बिनविषारी साप ओळखून मारत नाही.
साप हाताळण्यामध्ये कुठलंही शौर्य नाही, आपण प्रमाणित सर्पमित्र नसल्यास साप हाताळू नयेत. दृष्टीस पडल्यास सर्पमित्रांना बोलवावे व सापाच्या हालचालीकडे फक्त लक्ष ठेवावे.
>> साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला सरळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जावे, शक्य असल्यास त्या सापाचा फोटो किंवा स्वसंरक्षणार्थ त्याला मारला असल्यास तो साप काठी इ. उपकरणांनी हाताळून काळजीपूर्वक घेऊन जावा. कुठल्याही मंत्र तंत्राने विष उतरत नाही.
साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत. हजारो किलो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना ते फस्त करतात, म्हणूनच हिंदू संस्कृतीत नागपंचमी हा सण त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो.
>> सापांना शक्यतो न मारता सर्पमित्रांच्या ताब्यात देणे, सापांच्या नैसर्गिक अधिवासात अकारण ढवळाढवळ न करणे, उंदीर मारण्यासाठी चिकट पॅडचा वापर टाळणे, वापर केल्यास ते उघड्यावर न टाकणे, थंड वातावरणात साप उबेसाठी डांबरी रस्त्यांवर येतात तेव्हा वाहने जपून चालवणे इ. मार्गाने आपण त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतो.