Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:41 AM2024-10-30T10:41:41+5:302024-10-30T10:43:13+5:30
Narak Chaturdashi 2024: दिवाळीची पहिली आंघोळ नरक चतुर्दशीला केली जाते, कारीटाचे फळ चिरडले जाते; त्यामागील कारण जाणून घ्या!
३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा (Diwali 2024) तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi 2024) ! अश्विन वद्य चतुर्दशीस 'नरक चतुर्दशी' म्हणतात. सर्वांना पीडणाऱ्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी संहार केला. म्हणून या तिथीला `नरक चतुर्दशी' हे नाव पडले. मरताना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की, `माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये!' कृष्णाने त्याला `तथास्तु' म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो.
या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगलस्नान व दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. तसेच नरकासुराच्या नि:पाताचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ चिरडतात आणि त्याचा रस कपाळाला लावतात. नरकासुराची शेणमातीची प्रतिमा करून त्यावर घरादारातील कचरा टाकून जणू काही दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करतात.
या दिवशी घरातील देवांनादेखील पंचामृतस्नान व अभिषेक करून अत्तर लावून उष्णोदकाने स्नान घालतात आणि देवपूजाही सूर्योदयाच्या आत करतात. गोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. पणत्याही पहाटेच लावतात. सर्वत्र सुख समृद्धी यावी म्हणून अंगणात दोन, तुळशीपुढे एक, पाण्याजवळ एक, देवाजवळ एक पणत्या लावतात.दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असल्याने साफसफाई करून घर लख्ख करतात.
नरक चतुर्दशीला नवे कपडे घालून आप्त स्वकीयांची गाठभेट घेतली जाते. फराळाला बोलावले जाते. पाहुणचार केला जातो. अलीकडे दिवाळी पहाट या निमित्ताने सुरेल गाण्यांची मैफल रंगते. फटाके, आतषबाजी, रंग रांगोळ्या, मिठाई, आनंद आणि थंडीची चाहूल या वातावरणामुळे दिवाळीची रंगत आणखीनच चढत जाते.
असा हा दिवाळीचा रंग, गंध, स्पर्श अनुभवूया आणि आपल्या आतील आणि बाहेरील नरकासूराच्या दुष्ट प्रवृत्तीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून प्रत्येक दिवस आनंदाचा, मांगल्याचा आणि चैतन्याचा साजरा करता येईल. नाही का?