Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला करा पिवळ्या रंगाचा हरतर्‍हेने वापर; होईल लाभाच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:40 PM2024-10-30T15:40:43+5:302024-10-30T15:41:43+5:30

Narak Chatudashi 2024: यंदा नरक चतुर्दशी गुरुवारी येत आहे आणि गुरुवारी पिवळ्या रंगाचा वापर करणे शुभ सांगितले जाते; त्याबद्दल जाणून घेऊ.

Narak Chaturdashi 2024: On Narak Chaturdashi, use yellow color sparingly; Will benefit! | Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला करा पिवळ्या रंगाचा हरतर्‍हेने वापर; होईल लाभाच लाभ!

Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला करा पिवळ्या रंगाचा हरतर्‍हेने वापर; होईल लाभाच लाभ!

३१ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024) आहे. हा सण गुरुवारी आल्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. नरक चतुर्दशीची सुरुवात पहिल्या अंघोळीने होते. कारण त्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान व पूजा करायची असते. दुसर्‍या दिवशी अमावास्या असल्याने, नरक चतुर्दशीची सकाळ सर्वार्थाने दिवाळी पहाट ठरते. ती आपल्याही आयुष्यात व्हावी म्हणून नियम आखून दिला आहे आणि या दिवशी शुभ अशा पिवळ्या रंगाचा अधिकाधिक वापर करा असे संगितले आहे. त्यामागचे कारण सविस्तर पणे जाणून घेऊ. 

हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. मग ती लग्नाची हळद असो, नवऱ्या मुलीची पिवळी साडी असो, नाहीतर सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या कुंकवाला हळदीची जोड असो, या रंगाशिवाय त्या संकल्पनांना पूर्णत्त्व नाही. जाणून घेऊया या रंगाची महती!

सूर्यकिरणांसारखा स्वच्छ आणि प्रभावी रंग असतो पिवळा! या रंगाच्या कोणत्याही छटा बघा, त्या आल्हाददायकच वाटतात. म्हणून आपल्या संस्कृतीत, अध्यात्मात, आयुर्वेदात, विज्ञानात सर्वत्र या रंगाचा वापर दिसून येतो. ज्योतिष शास्त्राने देखील हा रंग शुभ रंग ठरवला आहे. हा रंग बृहस्पती अर्थात गुरु या ग्रहाचे प्रतीक मानला जातो. म्हणून ज्यांची ग्रहदशा ठीक नसते त्यांना पिवळ्या कपड्यांचा वापर करून गुरुबळ वाढवण्याचा सल्ला दिला जातो. 

पिवळा रंग अतिशय शुभ आहे आणि गुणकारीसुद्धा! म्हणून दिवसाची सुरुवात सूर्यदर्शनाने करा असे सांगतात. कारण त्या स्वच्छ पिवळ्या रंगाने व्यक्तीच्या पचनसंस्थेवर, रक्ताभिसरणावर आणि डोळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो.

असेही म्हटले जाते की पिवळ्या रंगात नैराश्यावर मात करण्याची क्षमता असते. ज्योतिष शास्त्रानुसार हा रंग नकारात्मक विचार दूर ठेवतो. मन शांत करतो. म्हणून वास्तु शास्त्रानेदेखील आपल्या शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये भिंतींना पिवळा रंग किंवा पिवळे पडदे, चादर किंवा पिवळ्या रंगाचे निसर्गचित्र लावावे असे सांगितले आहे. 

पूजेत पिवळ्या रंगाचा विशेष वापर केला जातो. पितळी उपकरणी घासून लक्ख केली की सोन्यासारखी पिवळी दिसू लागतात. घराच्या मुख्य द्वारावर हळद कुंकवाने गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे उमटवले जातात. त्यामुळे नकारात्मक उर्जेला प्रतिबंध होतो. हळद गुणकारी आहेच शिवाय भगवान विष्णूंनाही तिचा रंग प्रिय आहे. म्हणून अनेक लोक दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवदर्शनाला जातात. तसेच महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळ्या रंगाचे कपडे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवतात आणि काम होण्यास हातभार लावतात. 

मात्र हा रंग प्रमाणापेक्षा जास्त वापरणेही चांगले नाही. अन्यथा कावीळ झाल्यासारखे डोळ्यांना सगळे काही पिवळेच दिसू लागेल आणि पिवळ्या रंगाचा तिटकारा येईल. म्हणून पिवळ्या रंगात हलका पिवळसर रंग निवडा आणि तुमच्या स्थगित कामांना चालना द्या!

(सदर माहिती ज्योतिष शास्त्रावरील प्राथमिक माहितीच्या आधारे दिली आहे.)

Web Title: Narak Chaturdashi 2024: On Narak Chaturdashi, use yellow color sparingly; Will benefit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.