Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:21 AM2024-04-30T11:21:53+5:302024-04-30T11:22:13+5:30
Narmada Puskaram 2024: दर बारा वर्षांनी नर्मदा पुष्करम पर्व येते. यंदा १ ते १२ मे रोजी या उत्सवाचा कालावधी असेल, या काळात नर्मदेचे पूजन अन्यथा स्मरण अवश्य करा; कारण...
१ मे रोजी नर्मदा पुष्करम पर्व सुरू होत आहे. हे पर्व दर बारा वर्षांनी येते. वृषभ राशीत गुरु संक्रमण झाले की हे पर्व सुरू होते व या पर्वात नर्मदा स्नानाला महत्त्व असते! हे पर्व बारा दिवसांचे असते. यंदा १ ते १२ मे रोजी हे पर्व असणार आहे, यानिमित्ताने नर्मदा मैय्याचे दर्शन घेता आले तर उत्तमच; अन्यथा तिचे स्मरण नक्कीच करा! त्यासाठी जाणून घ्या नर्मदा स्नानाचे तथा दर्शनाचे वा स्मरणाचे महत्त्व!
१) आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात.
१५ ) आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
नर्मदे हर...नर्मदे हर...नर्मदे हर...!
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!