Narmada Yatra: नर्मदा परिक्रमेच्या नावावर सुरू असलेल्या पिकनिक अन् तमाशे थांबवा!; यात्रेकरूचा पोटतिडकीने लिहिलेला लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:43 PM2022-11-24T12:43:05+5:302022-11-24T12:43:53+5:30

Narmada Yatra: नर्मदा परिक्रमा कोणी करावी आणि त्याचे पावित्र्य कसे जपायला हवे, यावर स्पष्ट भाष्य करणारा लेख जरूर वाचा!

Narmada Yatra: Stop the ongoing picnics and spectacles in the name of Narmada Parikrama!; An article written by a pilgrim | Narmada Yatra: नर्मदा परिक्रमेच्या नावावर सुरू असलेल्या पिकनिक अन् तमाशे थांबवा!; यात्रेकरूचा पोटतिडकीने लिहिलेला लेख

Narmada Yatra: नर्मदा परिक्रमेच्या नावावर सुरू असलेल्या पिकनिक अन् तमाशे थांबवा!; यात्रेकरूचा पोटतिडकीने लिहिलेला लेख

googlenewsNext

>> किशोर पौनीकर नर्मदापुरकर, नागपूर

सध्या नर्मदा परिक्रमेत नाही मनाची तर जनांची लाज तरी ठेवा असे मराठी परिक्रमावासींना सांगण्याची नामुश्की आलेली आहे.नर्मदा परिक्रमा ही आमची सांस्कृतिक साधना आहे. केवळ गुरु आज्ञेनेच त्या व्हाव्यात असे विधान आहे. नर्मदा परिक्रमा ही क्षेत्रयात्रा, तिर्थयात्रा वा चारधामयात्रा नाही. ही विरक्तीप्रत पोहचवणारी साधना आहे. पहिले केवळ गुरूआज्ञेने या होत असल्याने अगदी सत्त्वगुणाने परिपूर्ण मुमुक्षू वा साधू या यात्रेत दिसत होता.

मधल्याकाळात यात हौशी मंडळी घुसली. यात व्यवहार व फायदा शोधू लागली. जागोजागी व्याख्याने आयोजित करून लोकांना नर्मदेचे अफाट चमत्कार ऐकवलेत. साधू व्हायची, संत व्हायची घाई झालेल्या या लोकांनी नर्मदाक्षेत्रात आश्रमंही उघडलेत. काहींनी ट्रॅव्हल कंपन्या काढून जनश्रद्धेचे व्यापारीकरण करत वाहन परिक्रमा सुरू केल्यात. जी परिक्रमा साधनरुपाने सात्त्विकतेने सुरू होती, या बाजारूकरणाने त्यात नफा नुकसान शोधणारा रजोगुण घुसला. जे नर्मदा क्षेत्र एकांतवासी साधनेसाठी प्रसिद्ध होते, ते आता कोलाहलाने गजबजू लागले...

मराठी माणूस हा सध्या संस्कृतीविहीन व्हायला अगदी एका पायावर तयार झालेला आहे. थोरपुरुषांची नावे आम्ही फक्त आमची "जात" दाखवायला घेत असतो. एरवी त्या महापुरुषाच्या वचनांशी व कर्तबगारीशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. देवघरातील देव दिवाणखान्यात सजावटीला बसवायची जणू आम्ही अहमहमिका लावलेली आहे. घरातील परंपरने चालत आलेले संस्कार ओसरीवरील खुंटीवर टांगूनच  आमचे  बेबंद व्यवहार चालत आहेत. घरांमधील ही वागणूक चार लोकांमध्येही कायम ठेवायला आम्हाला जराही संकोचत नाही.

मोबाईल कॅमेऱ्यांमुळे आजकाल सेल्फीयुग आलेले आहे. खिशात खुळखुळणाऱ्या पैशांमुळे या सेल्फ्या प्रसिद्ध ठिकाणांवरून काढायला जी धावाधाव सुरू होते, तीला आजकाल यात्रा म्हटल्या जात आहे. याच सेल्फ्या आपली प्रोफाईल बनवायला तिर्थयात्रांकडेही कुच होत आहे. 

नर्मदा परिक्रमेतही असेच आपली पारंपरिक सभ्यता खुंटीवर टांगलेले सेल्फ्याघेऊ टगे घुसलेले दिसत आहेत. आपण आपल्या वागणुकीने किमान दुसऱ्याला त्रास होणार नाही, येवढी काळजी घेण्याचे संस्कार, मॅनर्स यांच्यात दिसत नाही. यामुळे सरसकट मराठी माणूस बाहेरील प्रांतात बदनाम होतोय, हे ही हे महाभाग लक्षात घेत नाहीत.

आत्ताच मला तीन व्हिडिओ प्राप्त झालेत. अंदाजे बारासिटर गाड्यांचा सहा ते सात गाड्यांचा ताफा नर्मदा परिक्रमेला निघालेला आहे. पुणे व मुंबई भागातील हे लोक आहेत. जागोजागी दर्शनाला थांबल्यावर गाडीतील डेकवर सिनेमाची झिंगाट गाणी वाजवत हे देवळासमोर व रस्त्यात चहा पाण्याला जिथेही थांबतील, तिथे हिणकस अंगविक्षेप करत नाचत आहेत. विकृतीची परिसीमा म्हणजे या अंगविक्षेपींमध्ये स्त्रीयाच पुढे आहेत.

बायांनो, बोर्डावर नाचायची गाणी अलग असतात व तिर्थयात्रेत नाचायची गाणी अलग असतात, हे ही तुम्हाला कळू नये? शहरातील पब व डिस्को बंद पडलित की काय? आजकाल अनेक घरांमध्ये देवघराला वा स्वयंपाकघराला लागूनच शौचालय असते. पण या दोन्हीहीमध्ये सीमारेषा म्हणून दरवाजा असतो. विशेष प्रसंगीच तो उघडला जातो व तत्काळ बंद केला जातो. आम्ही मात्र आमच्या मनाची शौचालयं सतत उघडी ठेवून त्यातला नको तो दर्प सर्वत्र पसरवत आहोत की काय?

जे तीन व्हिडीओ माझ्याकडे आलेत, एरवी ते एखाद्या सामुहिक सहलीचे असते तर मी त्याकडे लक्षही नसते दिले. परंतू हे हिणकस अंगविक्षेपी व्हिडीओ नर्मदा परिक्रमेतील आहेत हे कळल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली. नर्मदा परिक्रमेत फायद्या तोट्याचे गणित मांडतांना आपण समाजाचे कोणते सांस्कृतिक नुकसान करत आहोत, हे कोणीच ध्यानात घेत नाहीये. सात्त्विक, राजसी परिक्रमांपलिकडे आता तामसी, राक्षसी परिक्रमा सुरू झाल्यात की काय?

आम्ही नित्यनेमाने शेगाव व शिर्डीला जात असू, पण आम्ही गजाजननाचे, साई चे , शंकर महाराजांचे भक्त आहोत, हे आमच्या छातीवरील बिल्ल्याने नव्हे, आमच्या आचरणावरून ध्वनित व्हायला हवे. एरवी आमची तमासखोर वागणूक या दैवतांनाच बट्टा लावत आहे.

नर्मदा परिक्रमा ही, मी शरीरा पलिकडे कोणीतरी (कदाचित आत्मतत्त्व वगैरे) आहे, याचि अनुभुती घ्यायला करायची असते. पण आम्ही शौचालयात बसल्या सारखेच या दिव्यक्षेत्रात वावरत असू तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच.

खरं म्हणजे मला या व्हिडीओंवर लिहायचीही किळस येत आहे. पण घाणीला घाण म्हटले नाही तर उद्या तिचेही गौरविकरण (Glorification) होईल. आपण आज वाईटाला वाईट म्हणायला टाळले तर भविष्यात तीच संस्कृती बनून आपल्या घरात पोहचेल.
हे होऊ नये म्हणून हा लिखाणाचा खटाटोप!

नर्मदाप्रेमी बंधु भगिनींनो, खऱ्या परिक्रमा या पायीच होतात. पण आपण स्वतःच्या वाहनाने व टुरिस्ट कंपन्यांसोबत जात असाल तरीही आपली मनोभूमिका मी साधनारत आहे , व्रतस्थ आहे, अशीच असायला हवी. साधना मुख्य, साधन गौण असले;  तर अशा प्रकारची हिणकस वृत्ती आम्हाला स्पर्शही करु शकणार नाही.

मी ते व्हिडीओ व्हायरल करत नाहीये, पण बहुदा एव्हाना ते आपल्या पर्यंत पोहचलेले असू शकतील...लिखाणात विषादापोटी काही कमीजास्त शब्द आलेला असू शकेल. त्याबद्दल नर्मदामैय्याची माफी मागतो!

नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!

संपर्क : 9850352424

Web Title: Narmada Yatra: Stop the ongoing picnics and spectacles in the name of Narmada Parikrama!; An article written by a pilgrim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.