नाथ महाराज रुपकात्मक पदातून घेत आहेत आत्मारामाचा शोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 07:20 AM2020-12-16T07:20:00+5:302020-12-16T07:20:02+5:30
नाथ महाराज म्हणतात, हरवलेले आत्मरूप मोती शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. स्व-स्वरूपी सती जाण्याचा म्हणजे जीवभाव हरवून आत्मरूपी लीन होण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण धुणे धूत असताना खोल पाण्यात पडलेला मोती मला सापडला नाही. मी त्याच्या शोधात आहे.
आपण आपल्या प्रपंचात व व्यवसायात नेहमीच गुंतलेले असतो. अखंड धावपळ सुरु असते. थांबावे कोठे, हे आपणास समजत नाही. भौतिक सुखांच्या मागे आपण धावत असतो. या धावपळीत आपण कोण आहोत? कोठून आलो? कोठे जाणार? याची आपणास चौकशी करण्यास वेळ मिळत नाही. या नादात आत्मविचाराची आठवणसुद्धा आपणास होत नाही आणि त्याची खंतही आपणास वाटत नाही. या संर्दात संत एकनाथांनी एक सुंदर रुपकात्मक पद लिहिले आहे. ते म्हणतात-
धुताच मोती जळी हरपले सखोल मोठे पाणी,
चला जाऊ पाहू चार सहा अठराजणी।
प्रचंड धोंडा मृगजळ पाणी आपटित होते चोळी,
विसरले सुख घसरले तळी,
सखे मायेने मोती दडविले भवसिंधूच्या जळी,
होती एक गडे भ्रांति बहिण जवळी।
एकनाथांच्या पदातील या मोजक्याच ओळी आहेत. त्यांनी या पदात आत्मारामावर सुंदर रूपक केले आहे. ते म्हणतात, की मायानदीच्या काठी प्रपंचाच्या धोंड्यावर देहबुद्धीची चोळी आपटत असताना मोती निसटले व खोल पाण्यात दिसेनासे झाले. याचा शोध मी खूप घेतला. चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे यांच्या मदतीने मी स्व-स्वरूपाचा शोध घेतला. भ्रांतिरूपी बहिणीने मला प्रपंचाच्या नादी लावले. त्यामुळे मी फारच घोटाळ्यात पडले.
कुल, शील, धन, यौवन, रूप, विद्या, तप, राज्य या आठ प्रकारच्या मदांनी मी धुंद झाले. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चार अवस्था सतरावी अमृतकला, ब्रह्मस्थानाचे अमृतसरोवर इडा व पिंगला या नाड्यांचे ऐक्य, अनाहत ध्वनीचा गजर, या गोष्टींचा मला विसर पडला. हरवलेले आत्मरूप मोती शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. स्व-स्वरूपी सती जाण्याचा म्हणजे जीवभाव हरवून आत्मरूपी लीन होण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण धुणे धूत असताना खोल पाण्यात पडलेला मोती मला सापडला नाही. मी त्याच्या शोधात आहे.