Navaratri 2022: नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरतात ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 04:21 PM2022-10-01T16:21:35+5:302022-10-01T16:22:33+5:30

Navratri 2022: संतती व सौभाग्याचे दान सुवासिनीच्या पदरात पडावे म्हणून ओटी भरली जाते. पण देवीची ओटी भरण्यामागे काय कारण असते, तेही जाणून घ्या!

Navaratri 2022: Know Why and How Goddess Oti is Filled on Maha Ashtami in Navratri! | Navaratri 2022: नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरतात ते जाणून घ्या!

Navaratri 2022: नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरतात ते जाणून घ्या!

googlenewsNext

पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. 'संततीप्राप्ती'च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भारतात ते पाहू. तत्पूर्वी ओटी का भारतात हे जाणून घेऊ. 

ओटी का भरतात?

अशोक लिंबेकर यांनी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, 'ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटी-पोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. (म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही.) स्त्रीजीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिचा ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभीष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते. 

मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतीकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते. नवविवाहिता असेल, तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. पाच सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संततीप्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतीकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाजजीवनात पाळली जाते यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते.

देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र :

देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी.

Web Title: Navaratri 2022: Know Why and How Goddess Oti is Filled on Maha Ashtami in Navratri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.