नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
By देवेश फडके | Published: May 28, 2024 08:30 AM2024-05-28T08:30:41+5:302024-05-28T08:32:50+5:30
Navgrahanchi Kundali Katha: बुद्धी, ज्ञान, शिक्षण, तत्वज्ञान यांचा कारक मानल्या गेलेल्या बुधाचा गायत्री मंत्र कोणता? कुंडलीतील स्थानांनुसार कसा असतो प्रभाव? जाणून घ्या...
Navgrahanchi Kundali Katha: काही मान्यतांनुसार, बुध हा चंद्र देव आणि तारा यांचा पुत्र मानला गेला आहे. भारतीय ग्रंथांमध्ये देवता म्हणून पूज्य आहे. काही इतर हिंदू ग्रंथांमध्ये बुध रोहिणीपुत्र मानला गेला आहे. बुधाला भगवान विष्णूंसारखे सौंदर्य आणि प्रतिमा असल्यामुळे तिला विष्णुरूपी असेही म्हटले जाते. बुधाला दोन मुखे आहेत; जे द्वैत स्वरूप प्रदान करतात. एखाद्या बाबतीत तटस्थपणा, पण थोडी अधिकची मोकळीक मिळाल्यास वागण्यात अतिरेकीपणा अशी दोन रूपं पाहायला मिळू शकतात. बुधाला विद्वानांचा सहवास आवडतो. बुध हा सौम्य व कलाप्रेमी ग्रह आहे.
बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून त्यावर फारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या एक टक्का इतके चुंबकीय क्षेत्र तयार होते. बुधाच्या सूर्यासमोरील भागाचे तापमान सर्वांत जास्त, तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी तापमान असते. बुध हा ८८ दिवसात सूर्यप्रदक्षणा करतो. शुक्र, मंगळ व गुरू यांच्यानंतरचा बुध हा तेजस्वी ग्रह आहे, असे सांगितले जाते.
बुधाचे काही प्रभावी मंत्र आणि उपाय
बुद्धी, ज्ञान, शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्मिक ज्ञान, धार्मिक अभ्यास आणि शिक्षण यांचा कारक मानल्या गेलेल्या बुधाचे मंत्र लाभदायक ठरतात. ॥ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः॥, ॥ ॐ बुं बुधाय नम:॥, हे बुधाचे बीज मंत्र आहेत. तर, ॥ प्रियंगु कलिका श्यामं रूपेणाप्रतिमं बुधम। सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्॥, हा बुधाचा नवग्रह स्तोत्रामधील मंत्र आहे. याशिवाय, ॥ॐ सौम्य-रूपाय विद्महे वाणेशाय धीमहि तन्नो सौम्यः प्रचोदयात् ॥, हा बुधाचा गायत्री मंत्र आहे. कुंडलीत बुध कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. बुधवार हा गणपतीशी संबंधित वारदेखील मानला जातो. त्यामुळे या दिवशी गणपती मंदिरात जाऊन विशेष पूजा, बुधवारचे व्रत करावे. हिरव्या रंगांचा समावेश असलेल्या वस्तू तसेच बुधाशी संबंधित असलेल्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय शंकराचे पूजन लाभदायक मानले गेले आहे. तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनानंतर बुधाचे रत्न पाचू परिधान केले जाऊ शकते. पहिल्या भागात कुंडलीतील प्रथम ते सहाव्या स्थानी बुध असेल, तर कसा प्रभाव असतो, हे पाहिले होते. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर बुधाचा प्रभाव कसा असतो, याविषयी माहिती घेऊया...
बुध ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. सप्तमस्थानी बुध असेल तर वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तो शुभ फले देतो. अशा जातकाचा जोडीदार संपन्न घराण्यातील व शील-स्वभावाचा असतो. शिल्पकला व हास्यविनोदात कुशल, रूपवान, सौम्य स्वभावी, भित्रा, चंचल बुद्धीचा असतो. माता-पित्याचे सुख चांगले लाभते. व्यापारांत फायदा होतो. देश-देशांतरी यश मिळते. २४ व्या वर्षी भाग्योदय होतो. वाहनप्राप्ती होते. जातक पत्नीच्या आज्ञेत राहणारा असतो. काही आचार्यांच्या मते पत्नी गुणी व संपन्न असते. काहींच्या मते जातक संपन्न, सत्यवादी व चारित्र्यसंपन्न असतो. जातकाचा आपल्या सहकाऱ्यांवर किंवा भागीदारांवर विश्वास नसतो. जन्मस्थानापासून दूर राहून उदरनिर्वाह करावा लागतो.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. अष्टमस्थानातील बुध आयुष्याच्या दृष्टीने चांगला असतो तो जातकाला दीर्घायू बनवतो. जातक विद्वान, गुणी, अधिकारसंपन्न, राजमान्य, आर्थिकदृष्ट्या संपन्न, परोपकारी असतो. देशांतरी कीर्ति पसरते. व्यापारात चांगला फायदा होतो. विरोधक फार असतात. भूमिलाभ होतो. २५ व्या वर्षी भाग्योदय होतो. पाश्चात्त्यांच्या मते जातकाला अध्यात्माचे ज्ञान असते. गूढविद्यांचाही जाणकार असतो.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. नवमस्थानी बुध शुभ असतो. असा जातक बुद्धिमान, विद्वान, प्रखर वक्ता, सदाचारी, लेखक, धार्मिक व संपन्न असतो. बुध निर्बल किंवा पीडीत असेल तर जातकाला आपल्या बुद्धीचा अभिमान असतो व तो नास्तिक असतो. जातक समाजात प्रख्यात, राजमान्य व यशस्वी असतो. सत्कार्यामुळे नाव चिरकाल राहते. काही आचार्यांच्या मते, अशा जातकात चारित्र्यदोष व व्यभिचारी वृत्ती आढळते. संगीत, ललित कलेत जातक दक्ष व कलाप्रेमी असतो. ३२ व्या वर्षी भाग्योदय होतो. काही आचार्यांच्या मते असा जातक अतिश्वरवादी, कर्मवादी असतो.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. बुध निश्चितपणे चांगली फले देतो. असा जातक सुखी, संपन्न, बुद्धिवान, धैर्यवान, विनोदी स्वभावाचा पण वाचाळ नसतो. कमी बोलणारा, आस्तिक, धार्मिक व समाजात प्रतिष्ठित असतो. वडिलोपार्जित परंपरेप्रमाणे सन्मान मिळतो. दशमस्थानातील बुधाचा संबंध न्याय व दंडशास्त्राशी असतो, असा जातक न्यायशास्त्री किंवा वकील होतो. संशोधक, लेखक, शिक्षक, मॅकेनिकल इंजिनिअर व व्यवसायी असे जातक असतात. पाश्चात्त्यांच्या मते जातक गणितशास्त्र, भाषाशास्त्र, व व्यापारशास्त्राचा जाणकार व पारंगत असतो. स्मरणशक्ती चांगली असते. वेळ-काळ पाहून बोलण्यात चतुर असतो. दलाली व बँकिंगच्या व्यवसायात जातक यशस्वी होतात. आयुष्य संपन्न व सुखी असते.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तू, महिलांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. एकादशस्थानी बुध असेल तर जातक संपन्न, बुद्धिवान, सुखी, नोकर-चाकरांनी युक्त, दीर्घायू, सौम्य स्वभावी, विवेकी, ज्ञानी, भाग्यवंत, बुद्धिवान. व लोकप्रिय असतो. डोळे सुंदर असतात. शिल्प, लेखन किंवा अन्य साहित्यसंबंधी कार्य किंवा व्यापार करून आजीविका चालवावी लागते. जातक संगीत व गणिताचा तज्ज्ञ असतो. राजसन्मान मिळतो. शेती व्यवसायांतून फायदा होतो. १८ व्या वर्षी भाग्योदय होतो. अनेक विषयांचा जाणकार व विद्वान असतो. संतती कर्तबगार असते. ४५ वे वर्ष लाभदायक व महत्त्वपूर्ण असते.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. द्वादश म्हणजे बाराव्यास्थानी बुध असेल तर जातक खर्चिक असतो. एकटा बुध या स्थानात असेल व तो शुभक्षेत्री किंवा शुभग्रहाबरोबर असेल तर पैसा परोपकार व शुभकार्यासाठी खर्च होतो. याविरूद्ध बुध पापग्रहाने युक्त किंवा पापक्षेत्री असेल तर जातक व्यसनी व दुराचारी होऊ शकतो. पुरातन आचार्यांनी व्ययस्थ बुधाची अशी फले सांगितलेली आहेत. सामाजिक दृष्टीने जातकाचे जीवन अयशस्वी असते. बोलण्यात चतुर परंतु स्वभावाने उतावळा असल्याने त्याचा धूर्तपणा उघडकीस येतो. शत्रूची संख्या वाढते. असे असले तरी वाक्चातुर्याने शत्रूवर मात करण्यात यशस्वी होतो. पाश्चात्त्यांच्या मते, व्ययस्थ बुध शत्रूक्षेत्री शुभग्रहाने युक्त असेल तर जातक सत्कर्मी, धार्मिक, परोपकारी व यशस्वी होतो. परंतु पापग्रहयुक्त किंवा पापग्रहाने पीडित असेल तर अपव्ययी, शत्रूभय, राजभय असते.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.