नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘छाया’ग्रहाची वेगळीच ‘माया’; ९व्या स्थानी प्रगती, ७व्या स्थानी अशांती
By देवेश फडके | Published: November 9, 2024 01:48 PM2024-11-09T13:48:06+5:302024-11-09T13:48:45+5:30
Navgrahanchi Kundali Katha: राहु हा क्रूर छाया ग्रह मानला जातो. अमरत्व प्राप्त झालेल्या राहुचे प्रभावी मंत्र आणि काही ज्योतिषीय उपाय जाणून घ्या...
Navgrahanchi Kundali Katha: राहु आणि केतु यांच्याबाबत पुराणात काही कथांचा उल्लेख आढळून येतो. पैकी एक कथा समुद्रमंथनाची सांगितली जाते. समुद्रमंथनातून अमृत कलश बाहेर पडतो. राहु आणि केतु मुळात हा एकच पुरुष. कश्यप व दनू यांचा हा मुलगा असाही उल्लेख भागवतात आहे. मोहिनी रूप घेतलेले श्रीविष्णू देवांना अमृताचे वाटप करीत असताना, राक्षसांच्या गटात असलेला मुलगा देवांच्या पंगतीत बसला होता. त्याची ही लबाडी सूर्य आणि चंद्रानी विष्णूंच्या निदर्शनास आणली. त्याबरोबर विष्णूंनी सुदर्शनचक्राने त्याचे डोके उडविले म्हणून हे दोन झाले. अमृताचे काही थेंब प्राशन केले असल्याने यांना अमरत्व प्राप्त झाले, अशी एक कथा सांगितली जाते.
राहु असेल किंवा केतु असेल ते भौतिक स्वरुपात दाखवता येत नाहीत. म्हणून याला छाया ग्रह मानले गेले आहे. अमरत्वामुळे ब्रह्मांडात यांना स्थान दिल्याचेही म्हटले जाते. अन्य ग्रहांप्रमाणे राहु आणि केतुचे काही प्रभावी मंत्र आणि उपाय सांगितले जातात. या भागात आपण राहु मंत्र, उपाय पाहणार आहोत.
राहुचे प्रभावी मंत्र आणि काही उपाय
ॐ अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम्। सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील राहुचा श्लोक आहे. ॥ॐ नागध्वजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो राहुः प्रचोदयात्॥ हा राहुचा गायत्री मंत्र असल्याचे म्हटले जाते. ॥ॐ राहवे देवाय शांतिम, राहवे कृपाए करोति। राहवे क्षमाए अभिलाषत्, ॐ राहवे नमो: नम:॥, असा राहुचा शांती मंत्र असल्याचे म्हटले जाते. याशिवाय, ॥ ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः ॥, हा राहुचा बीज मंत्र आहे. कुंडलीत राहु कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी गोमेद रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न शनिवारी धारण करावे. असे केल्याने उत्तम लाभ मिळू शकतात. मात्र, तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन अवश्य घ्यावे, असे सांगितले जाते. तसेच राहुच्या संबंधित गोष्टींचे यथाशक्ती दान करावे. आता कुंडलीतील सप्तमस्थान ते द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानावर राहुचा प्रभाव कसा असू शकतो, याविषयी माहिती घेऊया...
राहु ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...
७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. सप्तमस्थानी राहु असेल तर जातक अभिमानी असतो. तापट, भांडखोर, चारित्र्यहीन, कुटील कारस्थानी असतो. वैवाहिक जीवनात सुख लाभत नाही. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान होते. पाश्चात्त्य ज्योतिर्विदांची मते अशीच आहेत. काहींच्या मते जातकाला मानसिक अशांती भोगावी लागते. वेड्यासारखे भटकावे लागते. जातक वाईट चालीचा असतो. काही आचार्यांच्या मते सप्तमस्थ राहु जातकाला अधिकार व वैभव देतो. राहु बलवान असेल तरच हे शक्य आहे.
८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. अष्टम स्थानातील राहु अनिष्ट मानला जातो. आयुष्य अडचणींमुळे पूर्ण कष्टात जाते. आयुष्याला धोका उत्पन्न होतो. सामाजिक क्षेत्रात निंदा ऐकावी लागते. जातक प्रत्येक कामात आळशी असतो. आर्थिक चढ-उतार पाहावे लागतात. काही आचार्यांच्या मते, असा जातक राजमान्य, प्रख्यात, पशुधनामुळे समृद्ध होतो. म्हातारपण सुखात जाते. काहींच्या मते, अष्टमस्थ राहुमुळे जातक पैशाचा अपव्यय करणारा, भावंडांशी मतभेद असणारा, दूरवर प्रवास करणारा व पत्नीमुळे दुःखी असतो. पाश्चात्त्यांच्या मते, आर्थिकदृष्ट्या अष्टमातील राहु शुभ असतो. एखाद्या स्त्रीकडून किंवा वारसाहक्काने जातकाला धनप्राप्ती होते. उच्च राहु असेल तर हे फल निश्चित मिळते. काहींच्या मते अष्टमस्थ राहुची मिश्र फले मिळतात. जातक विद्वान असतो व राजद्वारी त्याला सन्मान मिळतो.
९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. कुंडलीत नवम स्थानी राहु असेल तर जातक दुराचारी असतो. कौटुंबिक सुख व आर्थिक स्थिती साधारण असते. भावंडांशी संबंध नसतात. शत्रू फार असतात. जातक चहाडीखोर असतो. आरोग्य साधारण असते. अनेक ज्योतिषाचार्यांनी नवमस्थ राहुची शुभ फले सांगितली आहेत. असा जातक समाजात प्रतिष्ठित, दयाळु, विनोदी, धर्मजिज्ञासु, लोकनेता, शब्दाला जागणारा असा असतो. कर्तव्यनिष्ठ, आस्तिक, नोकरा-चाकरांची रेलचेल असणारा, सुखी, संपन्न, अधिकारसंपन्न, असतो. पाश्चात्त्यांच्या मते स्वदेशात जातकाची प्रगती होते. विदेशात व विदेशाशी संबंधित व्यवसायात लाभ होतो. नवमस्थ राहु परदेशभ्रमण करायला लावतो, असे म्हणतात.
१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगडण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. दशमस्थ राहु जातकाची सर्वांगीण प्रगती करतो. राहु, वृषभ, मिथुन किंवा कन्या राशीचा असेल तर अथवा बलवान असेल तर जातक अधिकारसंपन्न, समाजप्रतिष्ठित, धाडसी, बुद्धिवंत, काव्यरसिक, वाचाळ, विदेशांशी संबंध येऊन त्यात लाभ मिळविणारा, स्वाभिमानी, कविताप्रेमी, निर्भय, विद्वान, प्रवासी, धार्मिक असतो. दशमस्थ राहु निर्बल असेल तर, पापपीडित असेल तर जातकाची पापकृत्त्याकडे प्रवृत्ती असते. जातक विवादास्पद, चारित्र्यहीन, दुःखी, मित्र व समाजाचे सहकार्य नसलेला, निर्दयी, व्यसनी, नेहमी आकस्मिक अडचणीना तोंड द्यावे लागणारा असा असतो. काहींनी दशमस्थ राहुची शुभ फले सांगितली आहेत. जातक अजातशत्रु, बलवान, मित्रांनी सुखी, संपन्न व समाजात प्रतिष्ठित असतो. पण, मानसिक स्वाथ्य लाभत नाही. पाश्चात्त्य ज्योतिषी दशमस्थ राहूला शुभ मानतात. जातक निरंतर प्रगती करतो, यशस्वी जीवन जगतो. यश पायाशी लोळण घेते.
११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तु, मित्र, महिलांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. एकादशस्थानी राहु शुभ फले देतो असे सर्व ज्योतिर्विदांचे मत आहे. असा जातक संपन्न, धष्टपुष्ट, शूरवीर, विद्वान काव्यरसिक, योग्य-अयोग्य मार्गांनी पैसा मिळविणारा असतो. विदेशी लोकांकडून व गुप्तमार्गांनी भरपूर संपत्ती प्राप्त होते. जातक वाचाळ, शत्रुहंता व देश-देशांतरी हिंडणारा असतो. राजद्वारी सन्मानही मिळतो. पाश्चात्त्य ज्योतिषाचार्यांनी एकादशस्थ राहु शुभ मानला आहे. जातक इतरांवर अवलंबून असलेल्या व्यापारात व भागीदारीत चांगला नफा कमवितो. जुगार, सट्टा, लॉटरीत फायदा होत नाही.
१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. व्ययस्थानी राहुची फले प्रतिकूलच मिळतात. असा जातक पापी, कपटी, कुलहीन, खर्चिक, निर्धन, पत्नीचे सुख कमी असणारा, कारस्थानी, कुसंगतीतत असणारा असतो. काही आचार्यांनी व्ययस्थ राहुची शुभफले सांगितली आहेत. असा जातक सुंदर, देखणा, सुखी, श्रीमंत व साधुस्वभावाचा सज्जन असतो. पाश्चात्त्यांच्या मते व्ययस्थ राहुची शुभ फले मिळत नाहीत. आध्यात्मिक दृष्टीने हा राहु चांगली फले देतो. सार्वजनिक संस्थाकडून जातकाला फायदा मिळतो.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.