नवग्रहांची ‘कुंडली’कथा: दिसायला ओबडधोबड, कामातही कच्चा; पण त्यागी-परमार्थी केतुचा स्वभाव सच्चा
By देवेश फडके | Updated: December 20, 2024 12:38 IST2024-12-20T12:33:36+5:302024-12-20T12:38:06+5:30
Navgrahanchi Kundali Katha: केतुच्या महादशेचा कालावधी किती असतो? केतुचे रत्न कोणते? जाणून घ्या...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: दिसायला ओबडधोबड, कामातही कच्चा; पण त्यागी-परमार्थी केतुचा स्वभाव सच्चा
Navgrahanchi Kundali Katha: ज्योतिषशास्त्रात राहुप्रमाणे केतु हाही छायाग्रह मानला गेला आहे. राहु आणि केतुबाबत काही मान्यता प्रचलित आहेत. राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांचा संबंध सूर्य आणि चंद्र यांच्या ग्रहणाशी असतो. प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावास्येला ग्रहण होत नाही. तर, राहु आणि केतु यांच्या स्थितीवर ग्रहण अवलंबून असते. कुंडलीत राहुप्रमाणे केतुचे स्थानही महत्त्वाचे मानले गेले आहे. या भागात राहु-केतु जोडीतील केतु ग्रहाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
केतु हा राहुपासून बरोबर १८० अंशावर असतो. याचे खगोलीय गुणधर्म म्हणजेच गती व भ्रमणमार्ग राहुप्रमाणेच असतात. केतुला Decending Node किंवा Dragon Tail असेही म्हणतात. केतु हा चित्रविचित्र रंगाचा, स्थिरकारक, पापस्वभावी ग्रह आहे. हा आकाश व तेजतत्वाचा, किंचित तमोगुणी ग्रह आहे. राहुप्रमाणे केतु ही वक्रगतीने भ्रमण करतो. केतु हा अंगाने आडवा व ओबडधोबड आहे. राहुप्रमाणे ऐटबाज किंवा मोहकपणा नसून विद्रुप दिसतो. शारीरीक शक्ती, जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती तसेच कष्ट व दगदग सहन करण्याची शक्ती चांगली असते. केतुकडे औषधी गुणधर्म असल्यामुळे काही अंशी डॉक्टरवर्ग ही केतुच्या अंमलाखाली येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
संन्यास व गुप्तविद्येचा कारक ग्रह केतु
मीन रास हे याचे स्वगृह आहे. वृश्चिक ही मूलत्रिकोणराशी आहे. धनु राशीत तो उच्च होतो आणि मिथुन राशीत नीच होतो. हा नैऋत्य दिशेचा स्वामी असून, आकाश ही याची देवता आहे. याची उपास्यदेवता कालिका आहे. सत्तावीस नक्षत्रांपैकी अश्विनी, मघा व मूळ या तीन नक्षत्रांचे अधिपत्य केतुकडे आहे. विशोंत्तरी महादशेत केतुमहादशेचा काल ७ वर्षे इतका आहे. याचे रत्न लसण्या/cat's eye आहे. बुध, शुक्र व शनी हे याचे मित्रग्रह आहेत, रवि, चंद्र हे शत्रू आहेत. मंगळ, गुरुशी हा समत्वाने वागतो. काहींच्या मते, अंकशास्त्राप्रमाणे केतुला अधिकृत अंक नाही. मात्र, मूलांक ७ वर केतुचा अंमल किंवा स्वामित्व असल्याचे मानले जाते. केतु मंगळाप्रमाणे फल देतो, असे सांगितले जाते. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे राहुच्या जवळच पण आयुष्य व मस्तकरेषेच्या संधीजवळ केतुचे स्थान आहे. हा प्रातः समयी बलवान असतो. हा मातामह, संन्यास व गुप्तविद्येचा कारक आहे. स्मशानभूमी हे याचे निवासस्थान आहे. कांसे या धातूवर याचा अंमल आहे.
स्वतंत्रबुद्धी, स्वतंत्रवृत्ती, सडेतोड बोलणे वा मानीपणा नाही
सरळमार्गी, मनात काहीही न ठेवणारा, न बोलता काम करणारा, परोपकारी, त्यागी, उदार, एकनिष्ठ व स्वामीनिष्ठ आहे. मात्र राहुप्रमाणे त्याच्या कामात व्यवस्थितपणा नाही. केतु सरळमार्गी असल्याने मुत्सद्दीपणा अथवा दुसऱ्यावर छाप पाडून गोडीगुलाबीने कार्य करून घेणे साधत नाही. विचारपूर्वक कामे जमत नाहीत. सांगकाम्या आहे. स्वतंत्रबुद्धी, स्वतंत्रवृत्ती, सडेतोड बोलणे वा मानीपणा नाही. राहुप्रमाणे केतु ऐहिक सुख देणारा नाही. राहु भोगी तर केतु त्यागी, राहु स्वार्थी तर केतु परमार्थी, राहु संसारी तर केतु संन्यासी, राहु ऐश्वर्य भोगणारा तर केतु दारिद्र्य भोगणारा आहे. राहु हा अतिशीत आहे तर केतु हा अतिउष्ण आहे. राहुप्रमाणे केतुकडे अलौकिक बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती नसल्याने त्याचा शिक्षणाकरीता काहीच उपयोग नाही, असे म्हटले जाते. राहुप्रमाणे तो अधिकार देणारा नाही. केतु हा सेवावृत्तीचा ग्रह आहे. केतु ज्या राशीत, ज्या ग्रहाबरोबर असेल त्याप्रमाणे अशुभ फले प्रकर्षाने देतो. केतु कोणत्याही ग्रहाबरोबर युती करीत असेल तर त्या ग्रहाच्या कारकत्व व स्थानाप्रमाणे दोष निर्माण करतो, असे मानले जाते. पहिल्या भागात कुंडलीतील एक ते सहा स्थानावर केतु असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात केतुशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर केतु असेल, तर त्याचा जातकावर कसा अंमल असतो, याची माहिती घेणार आहोत.
१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. प्रथमस्थानी म्हणजे लग्न स्थानी केतु असेल तर जातकाचे मन अस्थिर असते. जन्मापासून दोन महिने बालकाला त्रास होऊ शकतो. पत्नीसुखात न्यूनता असते. भावंडांशी व मामांशी संबंध चांगले नसतात. जातक खोटारडा, प्रभावशून्य, दुःखी, कृतघ्न व वाईट संगतीचा असतो. काही आचार्यांच्या मते लग्न स्थानी मकर किंवा कुंभ राशीचा केतु असेल तर जातकाला स्थावर संपत्ती व संततीचे सुख चांगले मिळते.
२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसौख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. द्वितीयस्थानी केतु असेल तर जातकाचा आर्थिक अपराधाकडे कल असतो, असे काहींचे मत आहे. मनात निरंतर भ्रम असतो. जातक सुखपत्तीने रहित, कुसंगतीने युक्त, कौटुंबिक विरोध असणारा असा असतो. प्रत्येक कार्यात विघ्नबाधा असते. धननाश होतो. मीन राशीचा केतु या स्थानी असेल तर अशुभ फले मिळत नाहीत, शुभ फले मिळतात.
३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. तृतीयस्थानातील केतुची शुभ फले मिळतात. असा जातक संपन्न, गुणवान, दीर्घायू, कीर्तिवंत, धाडसी, पराक्रमी, धष्टपुष्ट असतो. कौटुंबिक सुख चांगले मिळते. भावंडांचे सुख कमी मिळते. शत्रू फार असतात. मित्र धोकेबाज असतात. परंतु परिणाम शुभ मिळतो. समाजात व घराण्यात वाद-विवादाचे प्रसंग येतात. मानसिक शांती कमी मिळते.
४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थस्थानी केतु असेल तर चिंता, कष्ट, माता-पिता व मित्रसुखाचे नुकसान, स्थावरात कायदेशीर कटकटी, वडिलोपार्जित संपत्तीच्या सुख-लाभात व्यत्यय येणे, जन्मस्थानापासून दूर रहावे लागणे अशी अशुभ फले मिळतात. उच्च धनुराशीचा किंवा शुभ राशीतील केतु चतुर्थस्थानात असेल तर चतुर्थस्थ केतुची उत्तम फले मिळतात. जातक आर्थिकदृष्टीने सुखी व संपन्न होतो. काही आचार्यांनी अशा जातकाला सत्यवादी व गोडबोल्या म्हटले आहे. दुसरीकडे, नोकर-चाकरांमुळे नुकसान सोसावे लागते. पापयुक्त किंवा पापराशीत केतु असेल तर जातक चहाडीखोर व परनिंदक असतो. स्थावरात फसवणूक होणे, आईचे सुख न मिळणे, अशी फले केतु देतो.
५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचमस्थानी केतु असेल तर राजभय असते. अपमान सहन करावा लागतो. शत्रुवृद्धी, विवादभय, अशी प्रतिकूल फले मिळतात, असे म्हटले जाते. जातक चिंतातूर, अशांत असतो. शिक्षणात व्यत्यय येतो. विवेक काम करीत नाही. अशा जातकाला मानसिक आजार त्रस्त करतात. तंत्र-मंत्र इत्यादी गूढ विद्यांत रुची असते.
६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. कुंडलीत षष्ठस्थानी केतु असेल तर केतुची शुभफले मिळतात. असा जातक प्रतिष्ठित, संपन्न व यशस्वी होतो. पशुसुख चांगले मिळते. आरोग्य चांगले रहाते. मामाचे सुख कमी मिळते. शत्रूचा पराभव होतो.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.