नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांचा सेनापती, करेल सुखी; मंगळ असेल ‘या’ स्थानी, भीती मग कशाची?
By देवेश फडके | Published: March 21, 2024 06:46 PM2024-03-21T18:46:05+5:302024-03-21T18:50:37+5:30
Navgrahanchi Kundali Katha: पृथ्वीवरून उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या मंगळ ग्रहाचा कुंडलीतील प्रभाव अतिशय महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. जाणून घ्या...
- देवेश फडके.
Navgrahanchi Kundali Katha: अवकाशातील तारे वेगवान गतीने प्रवास करत असतात. ते पृथ्वीपासून कोट्यवधी प्रकाशवर्ष दूर असल्यामुळे त्यांचे भ्रमण आपल्याला पृथ्वीवरून जाणवत नाही. जगभरातील अनेक देश ग्रह-तारे, आकाशगंगा यांचा अभ्यास करत आहेत. संशोधन करत आहे. भारतही यात मागे नाही. भारतानेही आतापर्यंत अनेक मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. यातील एक म्हणजे मंगळयान मोहिम. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. या एकमेवाद्वितीय, यशस्वी मंगळ अंतराळ यानाचे चित्र भारताच्या २ हजार रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूवर आहे. २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. या दिवशी अश्विन अमावास्या होती.
पृथ्वीवरून उघड्या डोळ्याने मंगळ ग्रह पाहता येतो. काही कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर भला मोठा उल्का आदळला आणि पृथ्वीचा एक भाग वेगळा झाला, यातून मंगळ ग्रह तयार झाला, असे सांगितले जाते. धार्मिकदृष्ट्या पुराणांमध्ये मंगळ ग्रहाचा उल्लेख भूमीपुत्र म्हणून आलेला दिसतो. पुराणात मंगळ देवाला भूमीपुत्र मानले गेले आहे. मंगळ ग्रहाला शिवाचा अंशही मानले गेले आहे. अनेक ठिकाणी मंगळाला ब्रह्मचारी मानले गेले आहे. मंगळाचे वाहन मेंढी असून, हातात त्रिशूल, गदा, पद्म आणि भाला किंवा शूल धारण केले आहे. याशिवाय, मंगळवारी अंगारक योग जुळून आला की, ती संकष्ट चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती मानले गेले आहे. मंगळ हा अग्नितत्त्वाचा ग्रह आहे. सूर्य हाही अग्नितत्त्वाचा ग्रह आहे. पण या दोन्ही अग्नितत्त्वांच्या ग्रहांमध्ये मूलभूत फरक असा आहे की, मंगळ हा सेनापती असल्यामुळे त्याचा अग्नी घातक आहे. तर सूर्याचा अग्नी विधायक आहे. म्हणजेच घराला, जंगलाला लागलेली आग ही घातक, विनाशक मानली जाते. पण, चुलीचा अग्नी, पणतीची ज्योत ही विधायक म्हणजे चांगली कामे करण्यासाठी पेटवलेला अग्नी असतो. खगोलीय दृष्टीने विचार केल्यास मंगळ ग्रह सूर्यापासून १४ कोटी १० लक्ष मैल दूर आहे. मंगळ पृथ्वीपेक्षा आकाराने लहान ग्रह आहे. याला दोन उपग्रह आहेत. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास मंगळाला ६८७ दिवस लागतात. मंगळावरील एक दिवस हा पृथ्वीवरील २५ तासांएवढा असतो. मंगळाचे निरीक्षण केले असता, त्याचा काही भाग तांबूस आणि काही भाग हिरवा दिसतो.
आक्रमक, धाडसी असलेला नवग्रहांचा सेनापती मंगळ
मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला गेला आहे. मृग, धनिष्ठा, चित्रा ही मंगळाची नक्षत्रे आहेत. तर अंकशास्त्राप्रमाणे ९ मूलांकाचे स्वामित्व मंगळाकडे आहे. मंगळाचे रत्न पोवळे आहे. मकर राशीत मंगळ उच्च होतो. म्हणजेच या राशीत मंगळ शुभ फले देऊ शकतो. तर, कर्क रास ही मंगळाची नीचरास आहे. म्हणजेच या राशीत तो प्रभावहीन ठरू शकतो. रवि आणि चंद्र हे दोन ग्रह असे आहेत, जे कधीही वक्री होत नाहीत. राहु-केतू सोडून उर्वरित सर्व ग्रह वक्री, मार्गी, अस्तंगत, उदय, स्तंभी होतात. मंगळ ग्रह एका राशीत साधारणपणे दीड महिना राहतो. मंगळ वक्री झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी मार्गी होतो. मंगळाला भौम, क्षितीज, भूमीसूत, भूमीपुत्र, अंगारक अशी काही नावे आहेत.
मंगळ हा सेनापती आहे. आठवड्यातील मंगळवार या दिवसावर मंगळाचा अंमल आहे. मंगळाची देवता अग्नी आणि कार्तिकेय आहे. मंगळाचा सर्वसाधारण स्वभाव धाडसी, कुणाचे न मानणारा, हेकेखोर, स्वतंत्र वृत्तीचा, हट्टी व महत्त्वाकांक्षी असा आहे. तेज, राष्ट्रहित, धैर्य, सहनशक्ती, दुःख निवारण, आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्त्व, शास्त्रीय विषयांचे शोध, पुढारीपणा हे मंगळाचे गुणधर्म मानले गेले आहेत. मंगळ दक्षिण दिशेस बलवान असतो. रवि, चंद्र व गुरु ग्रह मंगळाचे मित्र ग्रह मानले गेले आहेत. तर, बुध शत्रू असून, शुक्र आणि शनी यांच्याशी त्याचे समभावाचे संबंध आहेत. मंगळ गुरुला बिघडवतो, अशी मान्यता आहे. म्हणजेच गुरु धनकारक ग्रह आहे. मात्र, मंगळाच्या दृष्टीयोगामुळे अफाट खर्च करण्याची प्रवृत्ती येऊ शकते, असे म्हटले जाते. पहिल्या भागात कुंडलीतील एक ते सहा स्थानावर मंगळ असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात मंगळाशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर मंगळ असेल, तर त्याचा जातकावर कसा अंमल असतो, याची माहिती घेणारे आहोत.
१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. लग्न स्थानातील मंगळाची साधारण फले मिळतात. मंगळ मूलतः उग्र असल्याने लग्नी मंगळ असलेला जातक उग्र स्वभावाचा व रागीट असतो. कुणाच्या आज्ञेत किंवा अनुशासनाखाली राहत नाही. मंगळाला आठवी दृष्टी आहे. त्यामुळे विविध प्रकारचे रोग, व्याधी, आजार होऊ शकतात. अग्नी, शस्त्रादींपासून जातकाने सावध राहणे आवश्यक आहे. या स्थानी मंगळ असेल तर जताकाला 'मंगळीक' म्हणतात. लग्नी मंगळाची दृष्टी सप्तमस्थानवार पडते. असा जातक धाडसी, अवघडातील अवघड कामे पूर्ण करणारा असतो. शारीरिकदृष्ट्या असा जातक धष्टपुष्ट असतो. पाश्चात्य ज्योतिर्विदांच्या मते ५ वे वर्ष त्रासदायक ठरू शकते.
२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसांख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. द्वितीय स्थानी मंगळ असणे विशेष शौर्याचे चिन्ह मानले जाते. तोंडी व शारीरिक वाद-विवादाच्या बाबतीत अशा लोकांपासून दूर रहाणे श्रेयस्कर! असा जातक निष्ठूर, क्रोधी, कटू बोलणारा, लढाऊ वृत्तीचा, भांडखोर प्रवृत्तीचा, असतो. लहानपणी कुसंगतीत पडल्याने विद्याभ्यासात अडथळे येतात. जन्मस्थानापासून दूर रहावे लागते. बहुधा कृषी कार्यात लाभ होतो. घरात व बाहेरही शत्रू फार असतात. आर्थिक बाबतीत कंजूष असतात, जवळ पैसा असूनही कोणाला मदत करीत नाहीत. तरी पैशाचा मोठा संचय नसतो. पाश्चात्य ज्योतिर्विदांच्या मतानुसार ९वे वर्ष शारीरिक कष्टाचे व १२वे वर्ष आर्थिक नुकसानीचे जाते.
३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. बहुधा तृतीयस्थानातील मंगळ अनिष्ट निवारक असतो. उत्साह व धाडसाचे मूर्तिमंत प्रतीक असतो. असा जातक उद्योगी, धाडसी व स्वप्रयत्नावर पुढे येणारा असतो. याचे भावंडांशी पटत नाही. जातक चांगला वागला, तरी त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. जातक राजमान्य, समाजात प्रतिष्ठित, निर्भीड, सुखी व संपन्न असतो. अतुलनीय धाडस व बेडरपणा देतो. जातक अनेक धाडसी कामे करतो. अग्निभय, विषभय, जखम, हाडे मोडण्याची भिती असते. मंगळ वक्री असेल तर ही फले प्रकर्षाने जाणवतात. सगे-सोयरे व शेजारी-पाजारी यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जातकाचे जीवन संघर्षमय पण संपन्न व सुखी असते.
४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानातील मंगळ कमी प्रमाणात शुभ फले देतो. असा जातक संपन्न व राजमान्य असू शकतो. परंतु, कौटुंबिक व स्थावरविषयक सुख कमी प्रमाणात मिळते. मानसिक सुख-शांतता कमी मिळते. शेती किंवा जमीनविषयक कामकाजात यश मिळते. शत्रू अधिक असतात. जन्मस्थानापासून दूर राहावे लागते. चांगल्या कपड्यांचा शौक असतो. युद्धात विजय मिळतो. स्वभाव निर्दयी असतो. मेष, मकर, वृश्चिक, सिंह, धनु किंवा मीन राशीचा मंगळ चतुर्थ स्थानी असेल तर वाईट फले कमी प्रमाणात मिळतात. आईचे सुख यथेच्छ मिळते. कर्क राशीचा मंगळ चतुर्थात चांगली फले देत नाही.
५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचमस्थांनी मंगळ असेल तर जातकाच्या जठराग्नी प्रज्वलित असतो. त्याला भूक खूप लागते. मंगळ स्वगृही असेल तर संततीसुख कमी असते वा संतती ऐकण्यात नसते. जातकाला प्रवासाची आवड असते. स्वभाव क्रूर असतो. सूड घेण्याची भावना असते. धाडसी असतो. पंचमस्थानी मंगळ वृश्चिक किंवा धनु राशीत असेल तर त्याची फले चांगली मिळतात. इतर राशीत पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट मंगळ शत्रू क्षेत्री असेल किंवा नीचीचा असेल तर वाईट फले मिळतात. जातक कमी बोलणारा असतो. मानसिक अशांती असते. वयाच्या ५व्या वर्षी वडील व चुलत्यांना त्रास होतो. मंगळ पापग्रहाने दृष्ट किंवा नीच असेल तर व्यसनात गुरफटतो. सट्टा-जुगारामुळे नुकसान होते. या उलट वृश्चिक किंवा धनु राशीचा मंगळ असेल तर जातक चारित्र्यवान असतो. लॉटरी-सट्ट्यात पैसा मिळतो. महर्षि पाराशर यांच्यामते पंचमस्थानातील मंगळ भावांचे सुख कमी देतो.
६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. कुंडलीतील षष्ठस्थान रोग व शत्रूचे स्थान आहे. या स्थानी मंगळ प्रबळ शत्रूनाशक व रोगनाशक फले देतो. अशा जातकाचे वर्चस्व भल्याभल्यांना मान्य करावे लागते. शत्रू फार असतात पण त्यांचा पराभव होतो. जातक प्रभावशाली व अधिकारसंपन्न असतो. हाताखाली अनेक लोक काम करतात. जातक खर्चिक असूनही आर्थिकस्थिती चांगली राहते. संपन्न व सुखी जीवन जगतो. मित्रांशी संबंध चांगले राहतात. जठराग्नि व कामवासना तीव्र असतात. मामांचे सुख कमी मिळते. शेळ्या-मेंढ्या, उंट, इत्यादींपासून फायदा होतो.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.