नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
By देवेश फडके | Published: May 6, 2024 01:27 PM2024-05-06T13:27:10+5:302024-05-06T13:29:56+5:30
Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांचा राजकुमार असलेल्या बुधाचा कुंडलीतील प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जाणून घ्या...
Navgrahanchi Kundali Katha: आपल्याकडे वेद, उपनिषदे, पुराणे यांसह अनेक प्राचीन ग्रंथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अनेक कथा प्रचलित असल्याचे पाहायला मिळते. याचपैकी एक कथा बुध ग्रहाबद्दल सांगितली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा नवग्रहातील राजकुमार ग्रह मानला जातो. बुध राजकुमार असल्यामागे एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार, बुध हा चंद्र आणि तारा यांचा पुत्र असल्याची कथा सांगितली जाते. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास बुध ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह आहे. हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह असून, त्याचे सूर्यापासून अंतर सुमारे ०५ कोटी ७६ लक्ष किमी आहे. पृथ्वीपासून बुध ग्रहाचे अंतर ०९ कोटी १६ लक्ष ११ हजार किमी आहे. बुध ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ८८ दिवस लागतात. बुधावरील एक दिवस हा पृथ्वीवरील ५९ दिवसांएवढा असतो. रंगाने हिरवट निळा असलेल्या बुध ग्रहाला सौम्य, सोमपुत्र, चांद्र, रोहिणेय, राकेशसुत अशी नावे आहेत. इंग्रजीत मर्क्युरी म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाबाबतच्या मान्यता
मिथुन आणि कन्या राशीचे स्वामित्व बुधाकडे आहे. कन्या ही बुधाची उच्च रास, मूलत्रिकोणी रास व स्वगृह मानले गेले आहे. याचाच अर्थ बुध कन्या राशीत सर्वाधिक, सर्वोत्तम फले देऊ शकतो, असे म्हटले जाते. तर मीन ही बुधाची नीचरास आहे. म्हणजेच या राशीत बुध कमी बलवान, कमी फले देणारा ठरतो, असे म्हटले जाते. बुध हा शुभ ग्रह मानला गेला आहे. एका राशीत सुमारे महिनाभर बुध विराजमान असतो. बुध वाणी व जडता यांचा कारक मानला गेला आहे. हिरव्या रंगावर याचा प्रभाव आहे. बुध उत्तर दिशेचा स्वामी आहे. बुधाचे रत्न पाचू असून, केशव म्हणजेच विष्णू याची देवता आहे. आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती या तीन नक्षत्रांचे स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. अंकशास्त्रात ५ या संख्येवर बुधाचे प्रभुत्व आहे. आठवड्यातील बुधवार या दिवसावर बुधाचा अंमल असून, भैरवनाथ ही बुधाची उपास्य देवता आहे.
आनंदी व अस्थिर बुद्धीचा ग्रह बुध
बुध ग्रह आनंदी व अस्थिर बुद्धीचा ग्रह मानला गेला आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा, स्वतःतील कमीपणा झाकण्यासाठी कावेबाजपणा आणि चातुर्य हे गुण बुधाने पत्करल्याचे म्हटले जाते. बुधाची तुलना पाऱ्याशी केली जाते. पारा हा द्रवपदार्थ आहे. हा हातात धरता येत नाही. चपळ धातू असल्याने पारा एके ठिकाणी राहण्यासाठी युक्ती योजावी लागते. तसेच बुधाकडून कामे करुन घेण्यासाठी इतर ग्रहांशी संयोग होणे आवश्यक आहे, असे शास्त्र सांगते. कुंडलीत रवि हा आत्मा, चंद्र हा मन असून, त्या खालोखाल बुद्धीला प्राधान्य आहे. बुद्धीवर बुधाचे प्रभुत्व आहे. रवि आणि चंद्रामुळे व्यक्तिमत्त्व कळते, तर बुधामुळे बुद्धिमत्ता व तिचे पैलू कळतात, असे म्हटले जाते. शास्त्री, पुराणिक, रसायनशास्त्रज्ञ, छापखाना, मुद्रण व्यवसाय, हिशोबनीस, व्यापारी, पोस्ट-तार खाते, राज्यमंत्री, सल्लागार, बँक कर्मचारी, लेखन साहित्य, शेअर बाजारातील दलाल यांवर बुधाचा अंमल असल्याचे म्हटले जाते. बुधामुळे भद्र नावाचा पंचमहापुरुष योग जुळून येतो. यामुळे जातक विद्वान व धनवान होतो, असे म्हटले जाते. पहिल्या भागात कुंडलीतील एक ते सहा स्थानावर बुध असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात बुधाशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर बुध असेल, तर त्याचा जातकावर कसा अंमल असतो, याची माहिती घेणारे आहोत.
१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी बुध असेल तर जातक व्यवहारकुशल, संभाषणचतुर, विद्वान, विद्याव्यासंगी, सुंदर, स्वच्छतेचा भोक्ता, सौम्य स्वभावाचा, संगीत, कला-कौशल्य, गणित, चिकित्सा, ज्योतिष इत्यादि ज्ञान-विज्ञानाची आवड असणारा असतो. जातक ज्ञानी व उदार स्वभावाचा असतो. कधी आप्तस्वकियाशी पटत नाही. बहुधा विदेशात वास्तव्य करतो. अध्यापन, लेखन या सारख्या बौद्धिक कार्याद्वारे उदरनिर्वाह करावा लागतो. या जातकाचे एक वैशिष्ट्य असते की तो वयाने कितीही मोठा झाला तरी नेहमी तरूण दिसतो. जातक अनेक विषयांचा विद्वान व तंत्रमंत्र जाणणारा असतो. बुधपापग्रहाने युक्त किंवा पापग्रहांच्या स्थानी असेल तर नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. बुधाबरोबर शनी असेल किंवा शनीची युती किंवा दृष्टी असेल तर बुधाच्या शुभ फलात न्यूनता येते.
२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसौख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. या स्थानीचा बुध अधिकांश चांगली फले देतो. असा जातक गोडबोल्या, खाण्या-पिण्याचा शौकिन, संपन्न, सुखी, बुद्धीने पैसा मिळवणारा, शीलवान, गुणवान, नम्र स्वभावी, अधिकारसंपन्न राजमान्य असतो. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. विनोदी लेखक, व्यंगकार होऊ शकतो. ३६ वे वर्ष लाभदायक व आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष असते. जातक कोट्यधीश होऊ शकतो. जातक सौम्य, बुद्धिजीवी किंवा व्यापारी, धनाढ्य व अकस्मात धन मिळविणारा असतो.
३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. तृतीयस्थानी बुध असेल तर जातक कपटी व दुर्जन असतो. असे बहुतेक सर्व ज्योतिषाचार्यांचे मत आहे. असा जातक स्वतंत्र विचारांचा असतो. त्यामुळे तो आपलेच खरे करतो. अशा जातकाला वश करणे फार अवघड असते. व्यवहारात नम्र असतो पण कुटनीतिज्ञ व बहुरूपी असतो. मित्र फार असतात. जातक विद्वान व चतुर असतो. भावाबहिणींची कर्तव्ये जातक पूर्ण करतो. जातक धार्मिक, भावंडात प्रख्यात, यशस्वी असतो. काहींच्या मते, अशा जातकाचे मन व आचरण शुद्ध नसते, जातक चतुर असतो. साहित्य, गुप्तविद्या, न्यायशास्त्र, भूगर्भशास्त्र व लेखन-वाचनात कुशल असतो. परोपकारी असतो. व्यापार केला तर त्यात चांगले यश मिळते.
४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तू, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थस्थानात बुध शुभ फले देतो. असा जातक विद्वान, भाग्यवान, मित्र व कौटुंबिक सुखाने परिपूर्ण असा असतो. स्थावर-संपत्तीचे व वाहनसुख चांगले मिळते. लेखन-व्यवसायाच्या माध्यमांतून उदरनिर्वाह होतो. मुनीम, कारकून, लेखक, संपादक इत्यादींच्या कुंडलीत चतुर्थस्थानी बुध असतो. ज्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक लेखन करतात अशा संस्थेचा प्रमुख जातक बनतो. काहींच्या मते या स्थानाचा बुध पापग्रहाने युक्त नसेल तर अतिउत्तम फले देतो. वचनाचा पक्का असतो. नोकरचाकरांचे सुख मिळते. जातक सत्यवादी, ललित कलेत रुची असणारा, गणितज्ज्ञ, गोडबोल्या असतो. पाश्चात्त्य विद्वानांच्या मते अशा जातकाची स्मरणशक्ती चांगली असते. दिव्य ज्ञानप्राप्ती संभवते. बुध स्वक्षेत्री असेल तरी जीवन अत्यंत सुखात जाते. शनी योगात बुध असेल किंवा शनि दृष्टीत असेल तर फसवणुकीमुळे नुकसान होऊ शकते.
५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचम स्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचमस्थानी बुध असेल तर जातक चांगला सल्लागार किंवा मंत्री बनतो. तंत्र-मंत्र चमत्कारासंबंधीचे ज्ञान त्याला असते. विद्वान व सुखी असतो. मित्रांचे सुख चांगले मिळते. मामाकडून सुख कमी मिळते. पैसा मिळवण्यात वाकबगार असतो. अनेक युक्त्या प्रयुक्त्यांचा जाणकार असतो. राजमान्य, दांभिक व कपड्यालत्त्यांचा शौकिन असतो. चारित्र्यशील, सदाचारी, धैर्यवान, संतोषी, चतुर व यशस्वी असतो. पाश्चात्य विद्वानांच्या मते जातक विद्यावंत, संततीवान, श्रीमंत व गुप्त विद्यांचा जाणकार असतो. चंद्राची दृष्टी या बुधावर असेल तर जातक श्रीमंत परंतु चारित्र्यभ्रष्ट ठरू शकतो.
६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी बुध असेल तर जातक परोपकारी दयाळू असतो. याला शत्रू नसतात. परंतु, काही आचार्यांचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते जातकाला विरोधक-शत्रू फार असतात. पण शेवटी मित्र बनतात. बुध वक्री किंवा नीचीचा असेल तर शत्रूकडून नुकसान होते. जातक कठोर वचनी असतो. पण रागीट नसतो. काहींच्या मते जातकांचे बाहेरच्या लोकांची चांगले जमते. भावंडांशी पटत नाही. अध्यात्मात स्वाभाविक रुची असते. जातक राजमान्य, संपन्न व सुखी असतो. स्थावर संपत्ती भरपूर असते. जातक प्रसिद्ध लेखक होतो. पाश्चात्त्यांच्या मते बुधाबरोबर मंगळ असेल किंवा बुध मंगळदृष्ट असेल तर जातक विक्षिप्त असतो. शिक्षण, साहित्य व रसायन शास्त्रांशी आयुष्यात संबंध येतो.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.