नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह

By देवेश फडके | Published: November 6, 2024 04:04 PM2024-11-06T16:04:50+5:302024-11-06T16:10:29+5:30

Navgrahanchi Kundali Katha: राहु ग्रह आकाशात दिसत नाही. पण छाया बिंदूंनी दाखवता येतो. राहु ग्रहाची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि प्रभाव याविषयी जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about significance of rahu planet in astrology and rahu graha impact on janm patrika | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह

Navgrahanchi Kundali Katha: ज्योतिषशास्त्रातील नवग्रहांमध्ये पहिले सात ग्रह हे रविवारपासून ते शनिवारपर्यंत प्रत्येक वारावर अंमल असलेले, प्रभाव असणारे तसेच त्या वाराचे नेतृत्व करणारे मानले जातात. तर दोन ग्रह असे आहेत, ज्यांची ओळख छाया ग्रह अशी आहे. ते म्हणजे राहु आणि केतु. राहु आणि केतु यांना नवग्रहांमध्ये स्थान असून, ते विशेष मानले जाते. कुंडलीतील राहु-केतु यांच्या स्थानांवरून व्यक्तींवरील प्रभाव पाहिला जातो. हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असतात. म्हणजेच एकमेकांपासून सातव्या समसप्तक स्थानी असतात. राहु आणि केतु यांचे चलन कायम वक्री असते. ते कधीही मार्गी होत नाहीत. या भागात केवळ राहु ग्रहाचा विचार केल्यास, वैशिष्ट्ये, गुणधर्म, अंमल यांसह अनेकविध गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत.

राहु-केतु हे आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणितसिद्ध बिंदू आहेत. यांना स्वतंत्र शरीरे नाहीत. हे छाया बिंदू आहेत. म्हणून यांना छाया ग्रह म्हणतात. चंद्राचे विक्षेपवृत्त क्रांतीवृत्ताला चार ठिकाणी छेदते. त्यापैकी उत्तरेकडील बिंदूस राहु व दक्षिणेकडील बिंदूस केतु म्हणतात. हे छेदनबिंदू असले तरी त्यांच्यामध्ये फलादेश देण्याचे सामर्थ्य आहे. या छेदनबिंदूमध्ये प्रचंड शक्ती असते. ते ज्या ग्रहांबरोबर असतात, त्या ग्रहांना आपली शक्ती देतात अथवा त्या ग्रहांप्रमाणे फल देतात, अशी मान्यता आहे. हे छायाग्रह रोज ०३ कला ११ विकला या ठरावीक गतीने राशीचक्रात उलट दिशेने फिरत असतात. राहु-केतुला ३६० अंश भ्रमण करण्यास साधारण १८ वर्षे लागतात. राहुला Ascending Node किंवा Dragon Head असे म्हणतात. राहु हा पापग्रह आहे. हा पुरुष, जल व वायू अशा दोन तत्त्वांचा, धुसर रंगाचा, मातीकारक तमोगुणी ग्रह आहे.

पितामह, गारुडीविद्या यांचा कारक राहु ग्रह 

कन्या राशी ही याचे स्वगृह आहे. वृषभ ही मूलत्रिकोणराशी आहे. मिथुन उच्चरास आणि धनु ही नीचरास आहे. हा संध्याबली ग्रह नैऋत्य दिशेचा स्वामी आहे. पाप ही याची देवता असून, गावाची वेस हे याचे स्थान आहे. याची उपास्यदेवता कालिका आहे. गोमेद हे याचे रत्न आहे. सत्तावीस नक्षत्रांपैकी आर्द्रा, स्वाती व शततारका या नक्षत्रांचे स्वामित्व राहुकडे आहे. या नक्षत्रपरत्वे येणाऱ्या विशोंत्तरी महादशेत राहु महादशेचा काल सुमारे १८ वर्षांचा आहे. बुध, शुक्र, शनी हे याचे मित्र आहेत तर रवि, चंद्र, मंगळ हे शत्रू आहेत. गुरुशी हा समत्वाने वागतो. काहींच्या मते अंकशास्त्राप्रमाणे राहुला अधिकृत असा कोणताही अंक नाही. परंतु, मूलांक ४ वर राहुचा अंमल असल्याचे मानले जाते. राहु शनीप्रमाणे फल देणारा आहे, असे मानले जाते. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे गुरु-शुक्र उंचवट्यादरम्यान असणाऱ्या मंगळ उंचवट्यानजिक आयुष्यरेषेजवळ राहु-केतुचे स्थान आहे. शिसे या धातुवर याचा अंमल आहे. राहु पितामह, गारुडीविद्या यांचा कारक ग्रह आहे. विशेषतः छायाचित्रणकला, चित्रपट व्यवसाय, एक्स-रे संबंधित व्यवसायात जातक यशस्वी होतो. राहुचा सर्पाशी संबंध असल्याने निरनिराळ्या प्रकारची विषे, मंत्र-तंत्र, भुते, पिशाच्चकरणी, जादुटोणा, मोहिनीविद्या या गोष्टींचा कारक आहे.

भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा राहु ग्रह 

राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. राहु अनुकूल असता जातक सत्ता, अधिकार व अनेक प्रकारचे ऐहिक सौख्य भोगणारा असतो. राहुचे स्वरुप हे डोक्यावर मुकुट व इतर राजचिन्हे धारण करून रथात बसलेला असे आहे. म्हणून बलवान राहु राजासारखे सुख देतो. राहु हा स्वतंत्र बुद्धिमत्ता देणारा ग्रह आहे. तीव्र स्मरणशक्ती व संशोधनवृत्ती देणारा असल्याने उच्चशिक्षण व संशोधन कार्यास चांगला मानला जातो. राहु कला कौशल्याचा कारकही आहे. गुरु-राहु युती हा चांडाळ योग होतो. या योगात राहुचे दोष सुधारतात पण गुरु दुषित होतो. पत्रिकेत सर्व ग्रह जर राहु-केतु मध्ये अडकले तर कालसर्पयोग होतो. पहिल्या भागात कुंडलीतील एक ते सहा स्थानावर राहु असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात राहुशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर राहु असेल, तर त्याचा जातकावर कसा अंमल असतो, याची माहिती घेणारे आहोत.

१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी राहु असेल तर त्याची चांगली वाईट दोन्हीं फले मिळतात. जातक क्रूर, निर्दयी, चारित्र्यभ्रष्ट, नास्तिक, अस्थिर, चंचल, धाडसी, कुसंगतीने युक्त, वाद-विवादपटु, वाचाळ असतो. शब्दाचा पक्का असतो. राहु लग्न स्थानी सिंह, मेष, वृषभ, कर्क किंवा मिथुन राशीचा राहु असेल तर तो शुभ फले देतो. जातक दयाळू, भाग्यवान, राजपुत्रासारखा वैभवशाली, प्रभावी, धनाढ्य, राजकृपापात्र असतो. कितीही अपराध केले तरी याचे राजकृपेमुळे रक्षण होते. पाश्चात्त्यांच्या मते, जातक प्रभावशाली, तळागाळातून शिखरावर पोहोचणारा, समाजात उच्चस्थान मिळवणारा, संस्कृतीचा अभिमानी व संरक्षक, वचनाचा पक्का व दुसऱ्यांची उपेक्षा करणारा असतो.

२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसौख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. द्वितीय स्थानी राहु असेल तर जातक बाताड्या असतो. इतरांचा सल्ला ऐकत नाही. बोलणे अस्पष्ट असते. पापग्रहाने युक्त राहु असेल तर, शत्रू असतात पण ते संपतात. शस्त्रभय असते. आर्थिक स्थिती चांगली असते. जन्मस्थानापासून इतरत्र प्रगती होते. काही आचार्यांच्या मते द्वितीयस्थ राहु जातक आस्तिक, व्यवहारकुशल व विश्वासपात्र असतो. 

३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. तृतीय स्थानी राहुचे एकच अशुभ फले बहुतांश आचार्यांनी सांगितले आहे. ते म्हणजे, भावंडांचे सुख न मिळणे. मात्र, तृतीयस्थ राहु असताही भावंडांचे सुख असल्याची काही उदाहरणे दिसून आली आहे. शुभ ग्रहाने युक्त राहु असेल तर जातकाची सर्व दुःखे नष्ट होतात. काही आचार्यांनी तृतीयस्थ राहुची शुभ फले सांगितली आहेत. पाश्चात्त्यांची मते सर्वस्वी भिन्न आहेत. जातक अस्थिर बुद्धीचा व चंचल विचारांचा असतो. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो. स्वप्ने फार पडतात. मंत्र-तंत्राच्या चमत्कारात विश्वास असतो.

४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थ स्थानात राहु असेल तर स्थावर संपत्ती, वाहनाचे सुख मिळते. भावंडे व मित्रांशी संबंध चांगले राहत नाही. सुखशांती कमी प्रमाणात मिळते. जन्मस्थानापासून इतरत्र राहावे लागते. आर्थिकदृष्ट्या जीवन संपन्न व सुखी असते. जातक विदेशी भाषेचा जाणकार असतो. काहींच्या मते जातक चिंतातूर, प्रवासी, भांडखोर, शत्रूंनी वेढलेला, दुःखी व अज्ञानी असतो. 

५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचमस्थानी राहु शिक्षणात अडथळा येतो. अन्य काही मतांनुसार, पंचमस्थ राहु असेल तर जातक हट्टी, दयाळू, भित्रा, मानसिकदृष्ट्या अशांत, पत्नीविषयी चिंतातूर, कमी मित्र असणारा, कमी बुद्धिचा व विद्याभ्यासात नियमितपणे यश न मिळवणारा असतो.

६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रुस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. षष्ठस्थानी राहु फारच चांगली फले देतो. जातकाला धनसुख मिळते. शत्रूनाश होतो. विजयी होतो. सर्व प्रकारची अनिष्टे दूर होतात. चंद्रयुक्त राहु असेल तर एखाद्या स्त्रीकडून पैसा मिळतो. जातक भाग्यवंत, उद्योगी, समाजात ख्यातिप्राप्त व सुखी असतो. काही विद्वानांच्या मते जीवन सुखी असते. धन कमी प्रमाणात स्थिर राहते. षष्ठस्थ राहु राजसन्मान मिळवून देतो.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

- देवेश फडके.

Web Title: navgrahanchi kundali katha know about significance of rahu planet in astrology and rahu graha impact on janm patrika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.