नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह

By देवेश फडके | Published: August 27, 2024 11:07 AM2024-08-27T11:07:35+5:302024-08-27T11:12:01+5:30

Navgrahanchi Kundali Katha: शनी हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो. शनीची वैशिष्ट्ये, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about significance of saturn planet in astrology and shani graha impact on janm patrika | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह

Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहातील अत्याधिक आणि विशेष महत्त्वाचा मानला गेलेला ग्रह म्हणजे शनी. पुराणात शनीबाबत अनेक मान्यता, कथा प्रचलित आहेत. काही मान्यतांनुसार, प्रभू श्रीरामांना शनीमुळे वनवासाला जावे लागले. महाभारत काळात पांडवांना वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागला. राजा विक्रमादित्यांना समस्यांचा सामना करावा लागला. राजा हरिश्चंद्रांना मोठ्या अडचणीतून जावे लागले. शनी हा सूर्यपूत्र असल्याचे सांगितले जाते. याबाबत काही कथाही पुराणात सांगितल्या जातात. शनी वडिलांचे विद्रोही, महादेव शिवशंकराचे परमभक्त व माता प्रिय असल्याचे म्हटले जाते. शंकराने शनीला नवग्रहांचा न्यायाधीश केले, असेही सांगितले जाते. जोपर्यंत शनीला लंकापती रावणाने उलटे पाडून आपल्या पायाखाली ठेवले होते, तोपर्यंत रावणाला साडेसातीची भीती नव्हती. हनुमानाने लंकादहनावेळी शनीला मुक्त केले. शनीची दृष्टी रावणावर पडली आणि रावणाची दुर्दशा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.

शनी हा सूर्यमालेतील सहावा ग्रह आहे. शनीला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यास १० तास १४ मिनिटे लागतात. शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ३० वर्षे लागतात. म्हणजेच शनी एका राशीत सुमारे २.५ वर्षे म्हणजे ३० महिने वास्तव्य करतो. शनी हा रविपुत्र व यमाचा मोठा भाऊ आहे. शनीला गतीमुळे मंद हे नाव प्राप्त झाले आहे. याशिवाय शनैश्चर, अर्की, सौर्य, कौण, रविपुत्र, यमाग्रज, अशी काही नावे शनीची आहेत. अरबी भाषेत त्याला जुहल व इंग्रजीत सॅटर्न म्हणतात.

पाप, क्रूर दैन्यकारक ग्रह शनी आणि साडेसाती

शनी हा दुःख, दैन्य कारक ग्रह मानला जातो. काळ्या रंगावर अंमल असून, शनी हा सेवक आहे. शनी हा पश्चिम दिशेचा स्वामी असून पाप, क्रूर ग्रह आहे. पापग्रहामध्ये शनी हा अग्रगण्य आहे. मकर व कुंभ या दोन राशींचा अधिपती शनी आहे. नीलम हे शनीचे रत्न असून ब्रह्मा ही याची देवता आहे. शनीची उपास्यदेवता हनुमान आहे. पुष्य, अनुराधा व उत्तराभाद्रपदा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व शनीकडे आहे. अंकशास्त्राप्रमाणे ८ या मूलांकाचे स्वामित्व शनीकडे आहे. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे मधले बोट व त्याखालील उंचवटा यावर शनीचे स्थान मानलेले आहे. आठवड्यातील शनिवार या दिवसावर शनीचा अंमल आहे. तूळ ही शनीची उच्च रास असून, मेष ही नीचेची रास आहे. शनी साडेसाती तर सर्वांनाच परिचित आहे. साडेसातीयोग हा शनीचा विशेष अधिकार आहे. 

शनी हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो

शनी हा जात्याच भित्रा व लाजाळू आहे. समाजापासून दूर राहणारा, विचारवंत, हट्टी दुराग्रही, खिन्न व निराश प्रवृत्तीचा आहे. धूर्त व फसवेगिरी करणारा आहे. स्वार्थाला जपणारा आहे. भारतीय आचार्यांनी शनीला तूळ, मकर, कुंभ व मीन राशी अत्यंत शुभ मानल्या आहेत. शनी हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा व कटू सत्य उगड करुन सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतात त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनीची ख्याती सांगितली जाते. शनी हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो. म्हणून गुरुच्या दृष्टीने व गुरुगृही त्याची फले सुधारतात. शनी व गुरुची व्ययस्थानावर संयुक्त दृष्टी संन्यास व मोक्षप्राप्तीस शुभ असते. उदा. आद्यशंकराचार्य. बुध, शुक्र, राहु हे शनीचे मित्र ग्रह आहेत. तर चंद्र, रवि, व मंगळ शत्रू आहेत. गुरुशी तो समत्वाने वागतो. याचा स्वभाव अत्यंत तीक्ष्ण असून हा ३६ ते ४२ या वर्षाच्या कालावधीत जातकाचा भाग्योदय करतो, असे सांगितले जाते. पहिल्या भागात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील एक ते सहा स्थानावर शनी असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात शनी ग्रहाशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर शनी असेल, तर त्याचा जातकावर कसा प्रभाव असतो, याची थोडक्यात माहिती घेणार आहोत...

१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी शनि नीच राशीत, शत्रुक्षेत्री किंवा दुर्बल असेल तर शुभ फले देत नाही. जातक आळशी व अस्वच्छ असतो. जातक अहंकारी असतो. लोभी असतो. पराधीन होतो. शनि बलवान, उच्चीचा किंवा धनु, मीन, तुळ, मकर, कुंभ यांपैकी राशीचा असेल तर शुभ फले देतो. असा जातक, प्रभावी शत्रूहंता, संपन्न, राजमान्य, धनसंपत्तीने युक्त प्रतिष्ठित व संपन्न पित्याचा पुत्र असतो. विद्वान, सुंदर, समाजअग्रणी, गंभीर वृत्तीचा असतो. पाश्चात्त्यांच्या मते, लग्री शनि पापी किंवा दुर्बल असेल तर तो शुभफले देत नाही. जर हा शनि बलवान व शुभ असेल तर बालपण कष्टात गेले तरी पुढील आयुष्य चांगले जाते.

२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसांख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. द्वितीयस्थानी शनि असेल तर आर्थिक दृष्टीने जातक संपन्न असतो. आयुष्य सुखात जाते. परंतु फसवणूक किंवा धनक्षय होऊ शकतो. जातक स्पष्टवक्ता व न्यायप्रिय असतो. चापलुसी करणे आवडत नाही. मित्र कमी असतात. कौटुंबिकजनांशी संबंध चांगले नसतात. जन्मस्थानापासून लांब इतर ठिकाणी राहून उदरनिर्वाह करावा लागतो. जन्मस्थानी भाग्योदय होत नाही. शनी जर नीचीचा अथवा दुर्बल किंवा पापयुक्त असेल तर जातक खोटारडा, चोर व ठग होऊ शकतो. लोखंड, लाकूड, कोळसा, इत्यादिंच्या व्यापारात त्याला चांगला फायदा होतो. शेतीमुळे फायदा होत नाही. मंदिर किंवा धार्मिक संस्थेचा संचालक होऊ शकतो. पाश्चात्त्यांच्या मते शनीची शुभाशुभ फले कुंडलीतील शनीच्या स्थितीवर अवलंबून असतात. 

३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. तृतीयस्थानी क्रूरग्रह शुभ फले देतात, या ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे तृतीयस्थानी शनी शुभफलदायक आहे. जातक पराक्रमी, शूर, दानशूर, ज्ञानी, मिताहारी, परोपकारी व मित्रवेल्हाळ असतो. जन्मस्थानापासून इतरत्र राहून उपजीविका चालवावी लागते. समाजात स्थान असते. राजमान्यताही मिळते. यवन ज्योतिर्विदांच्या मते शनि बलवान व शुभ असेल तर जातकाला विवेक, विचारशक्ती, मननशीलता व शांत चित्तवृत्ती देतो. अनेक विषयांचे ज्ञान, व्यावहारिक चातुर्य, लेखन व प्रकाशनाच्या कार्यातून लाभ देतो व गूढशास्त्रात रूचि उत्पन्न करतो. प्रवास सुखकर होतात. या उलट शनि दुर्बल व पापयुक्त असेल तर भावंडे व मित्रांशी संबंध नीट राहत नाहीत, त्यांच्याकडून त्रास होतो. शिक्षणात बाधा उत्पन्न होते. 

४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थ स्थानातील शनी जातकाला मानसिक तणाव, चिंता व दुःख देतो. उच्च शनी चतुर्थस्थानी असेल तर, शुभफले देतो. शनी वक्री असेल तर जन्मस्थानापासून दूर राहावे लागते. वक्री शनी त्याला वाईट फले देतो. शत्रू अधिक असतात. वडिलोपार्जित संपत्तीचा भोग कमी प्रमाणात मिळतो. 

५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. काही ज्योतिषाचार्यांच्या  मते, सामान्यपणे पंचमातील शनि उच्च किंवा स्वगृहीचा असेल तर तो उत्तम फलदायक ठरतो. आर्थिक दृष्टीने जातक विशेष संपन्न नसतो. नेहमी त्रासलेला, चिंतातूर असतो. बुद्धी व विवेक योग्य दिशेत काम करीत नाहीत. मित्र कमी असतात. जातक कुटनीतिज्ञ, शत्रूहंता असतो. मंत्र-तंत्रात जातकाचा विश्वास असतो.  महर्षि पाराशर यांची मते सर्वांपेक्षा वेगळी आहेत. शनि संतती सुख, व्यापारात यश, कुटनीतित यश अशी शुभ फले देतो. पाश्चात्त्यांच्या मते, पंचमस्थ शनी, गुरु किंवा रवि बरोबर शुभ दृष्टीत किंवा युतीत असणे, शुभ मानले जाते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात जातक यशस्वी होतो. शनी दुर्बल किंवा पापपीडित असेल तर प्रतिकूल फले देऊ शकतो.

६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रुस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. षष्ठस्थानी शनी असेल तर जातक शूरवीर, भोजनवीर, संपन्न व शत्रुहंता असतो. शत्रू भरपूर असतात पण जातक त्यांच्यावर मात करतो. शनी जर पापपीडित किंवा नीच असेल तर मात्र शत्रूकडून त्रास होतो. स्वराशीचा शनि षष्ठस्थानी चांगली फले देतो. जातक प्रतिष्ठित, काव्यरसिक असतो. राजद्वारीही सन्मान मिळतो. शनी अष्टमेश असून षष्ठात असेल तर अनिष्टकारक योग होतो.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

- देवेश फडके.

 

Web Title: navgrahanchi kundali katha know about significance of saturn planet in astrology and shani graha impact on janm patrika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.