Navratra 2020: घटस्थापना कशी करतात? नवरात्रीत कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, ते जाणून घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 08:55 PM2020-10-13T20:55:03+5:302020-10-13T21:08:02+5:30
Navratra 2020: नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा 'त्रिगुणात्मक' देवींची उपासना केली जाते.
नवरात्र म्हणजे जागरण, गोंधळ, देवी उपासना, गरबा नृत्य अशी आपली साधारण समजूत असते. मात्र, बऱ्याचदा पूजेचा विधी माहित नसतो आणि ऐकीव माहितीनुसार नवरात्रीचे व्रत केले जाते. यासाठीच, घटस्थापनेचा विधी कसा करावा आणि सोबतच अन्य धार्मिक गोष्टी काय करता येतील, याची माहिती करून घेऊया.
'नवरात्र' म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा, असे सर्वत्र गृहित धरले जाते. परंतु, प्रत्यक्षात तसे नसून तिथीचा क्षय किंवा वृद्धीमुळे कधी आठ किंवा दहा दिवस नवरात्र असते. नऊ दिवस किंवा नऊ रात्रीचा कुलाचार असा, या शब्दाचा अर्थ नाही, तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करण्याचे कर्म म्हणजे 'नवरात्र' होय.
शारदीय नवरात्रात `घटस्थापना' हा मुख्य विधी असतो. जिथे घट स्थापन करणार, ती जागा स्वच्छ करून सारवली जाते. त्यावर मातीचा ओटा तयार केला जातो. त्यावर घटस्थापना करून त्या घटाखालील मातीत नऊ धान्ये पेरली जातात. त्या घटावरील पात्रात आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवतात. नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडशोपचारे पूजा करतात. तिच्यावर रोज एक याप्रमाणे नऊ झेंडूच्या किा तिळाच्या फुलांच्या माळा सोडतात. काही ठिकाणी मातीचा ओटा न करता, ताम्हनात हळकुंड, सुपारी मांडून त्याची पूजा करतात आणि त्यावर दररोज एक याप्रमाणे नऊ दिवस फुलांच्या माळा सोडतात.
घटावरील पात्रात स्थापन केलेल्या कुलदेवतेचे पूजन केले जाते. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ, अष्टमी किंवा नवमीला हवन, उपवास, एकभुक्त किंवा पूर्णवेळ उपास, सुवासिनी तसेच कुमारिका पूजन, भोजन इ. धार्मिक कृत्ये केली जातात. नवरात्राचे नऊ दिवस अखंड दीपाची स्थापना करतात व तो सतत तेवत राहील, अशी दक्षता घेतात.
अश्विन शुद्ध पंचमीला 'ललिता व्रत' नावाचे व्रत करतात. हे काम्यव्रत असून स्त्री-पुरुष दोघांनाही ते करता येण्यासारखे आहे. 'ललिता पंचमी'ची पूजा म्हणून ती प्रसिद्ध आहे.
नवरात्रात ज्या देवीचे पूजन केले जाते, ती देवी ही महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी 'त्रिगुणात्मिका' आहे. सहाजिकच नवरात्रीत सरस्वती पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे. मूळ नक्षत्री देवीची स्थापना, पूर्वाषाढा नक्षत्री पूजन, बलिदान व श्रवण नक्षत्री विसर्जन केले जाते. हा काळ सरस्वती पूजनाचा म्हणजे सरस्वती देवीविषयी कृतज्ञता प्रकट करण्याचा काळ आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत विशेषत: अष्टमीला काही घरात 'जोगवा' मागण्याचा कुळाचार आहे. देवीच्या नावाने कोरड्या धान्याची भिक्षा मागायची व त्या धान्याचे भोजन प्रसाद म्हणून घ्यायचे. यात गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो. सांपत्तिक स्थिती उत्तम असणाऱ्या श्रीमंत घरातील स्त्रियासुद्धा 'जोगवा' मागण्यासाठी आवर्जून जातात. देवीचा प्रसाद मिळवणे, ही त्यामागील भावना असते, अशी माहिती अभ्यासक आनंद साने देतात.
याशिवाय नवरात्रीत नवचंडी, पुण्याहवाचन, सप्तशतीचे पाठ इ. धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते. अशाप्रकारे आपणही घटस्थापना करून नवरात्रीत देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन करूया आणि तिची यथासांग पूजा करून पाहुणचार करूया. जगदंबsss उदयोस्तु!
हेही वाचा: दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!