Navratri 2020 :नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : सातवी माळ: कालरात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:30 AM2020-10-23T07:30:00+5:302020-10-23T07:30:02+5:30
Navratri 2020 :जो चुकीचे वागतो, त्याला शिक्षा होण्याची भीती असते. कर नाही, त्याला डर कशाला? शुद्ध चारित्र्य आणि शुद्ध आचरण असलेल्या भक्तांना देवी अभय देते. संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभी राहते.
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिाता
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी
वामपादोल्लसल्लोहलताकण्टभूषणा
वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी।।
आई दुगेचे सातवे रूप कालरात्री या नावाने परिचित आहे. तिचा रंग गडद काळ्या अंधारासारखा आहे. केस अस्ताव्यस्त पसरले आहेत. गळ्यात विद्युल्लतेची चकाकणारी माळ घातली आहे. ती त्रिनेत्रा आहे. हे तीन डोळे ब्रह्मांडाप्रमाणे गोल आहेत. देवीच्या तेजासमोर वीजेचे तेज फिके पडते. देवीच्या श्वासोच्छासातून अग्नीचे लोळ निघताना दिसतात. देवीने गाढवाला आपले वाहन निवडले आहे. देवी एका हाताने आशीर्वाद तर एका हाताने अभय देत आहे. आणखी दोन हातापैकी एका हाता लोखंडी अवजार आणि दुसऱ्या हातात रक्ताने माखलेले खड्ग आहे.
हेही वाचा : Navratri 2020 : नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : सहावी माळ: कात्यायनी
कालरात्रिचे स्वरून दिसायला अतिशय भयंकर असले, तरी त्यात पुरेपूर आवेश आहे. देवी दुष्टांचा नायनाट करते, सृजनांना भरभरून आशीर्वाद देते. कालरात्रि भक्तांचे प्रत्येक कार्य शुभ करणारी आहे, म्हणून तिला शुभंकरी देखील म्हटले आहे. देवीच्या उग्र रूपाने भक्तांना भय वाटण्याचे कारण नाही, भय वाटले पाहिजे, ते दृष्कृत्य करणाऱ्या राक्षसांना, दुष्ट लोकांना.
दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माता कालरात्रिकीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन `सहस्रार' चक्रात स्थित होते. त्या स्थितीत मन पोहोचल्यावर समस्त ब्रह्माण्डाची द्वारे खुली झाल्यासारखे वाटते. मनुष्य पाप-पुण्याच्या पलीकडे जातो. अहम् ब्रह्मास्मि, चा शोध लागला, की मनुष्याच्या हातून दुष्कृत्ये घडत नाहीत, कारण तो परमानंदात रममाण झालेला असतो.
माता कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. दानव, दैत्य, राक्षस, भूत, प्रेत यांच्या नुसत्या स्मरणाने आपला थरकाप होतो. मात्र देवी त्यांच्यामुळे आपल्या लागलेली पीडा नष्ट करते. देवीच्या उपासकांना अग्नि, जल, जंतु, शत्रू, रात्री इ. कोणत्याही गोष्टींचे भय राहत नाही. देवीला आदर्श मानून तेही शक्तीउपासक होतात आणि अंतर्गत भीतीवर मात करतात.
जो चुकीचे वागतो, त्याला शिक्षा होण्याची भीती असते. कर नाही, त्याला डर कशाला? देवी शुद्ध चारित्र्य आणि शुद्ध आचरण असलेल्या भक्तांना अभय देते. संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभी राहते. आपल्यालाही तिची कृपादृष्टी व्हावी वाटत असेल, तर आपणही यम, नियम, संयमाचे पालन केले पाहिजे. काया, वाचा, मन पवित्र ठेवले पाहिजे. आपले प्रत्येक कार्य तिच्या साक्षीने केले पाहिजे आणि तिलाच समर्पित केले पाहिजे. देवीचे आपल्यावर लक्ष आहे, या आदरयुक्त भीतीने आपली पावले वाममार्गावर पडणार नाहीत आणि शुभंकरी देवी सदैव आपले कल्याण करेल.
कालरात्रि देवी की जऽऽऽय!
हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : पाचवी माळ: स्कंदमाता