Navratri 2020: नवरात्रीत अनवाणी का चालतात, जाणून घ्या!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 17, 2020 21:35 IST2020-10-17T21:20:57+5:302020-10-17T21:35:30+5:30
Navratri 2020: स्वत:च्या शरीराला थोडेफार कष्ट देऊन ईश्वरी चिंतन मनात ठेवणे, हा त्यामागचा मूळ विचार आहे.

Navratri 2020: नवरात्रीत अनवाणी का चालतात, जाणून घ्या!
ज्योत्स्ना गाडगीळ
अनवाणी चालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना आपण चपला बाहेर काढून ठेवतो. चपलेबरोबर मनाला चिकटलेले विकारही मंदिराच्या पायरीशी ठेवून मंदिरात प्रवेश करणे, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. शिवाय, आपल्यामुळे स्वच्छ परिसर घाण होऊ नये, ही देखील सद्भावना असते. तसेच, तिथल्या वातावरणाशी समरस होताना अनवाणी चालल्याचा खूप फायदा होतो.
आपल्या पायाचे तळवे अतिशय संवेदनशील असतात. संपूर्ण देहाचे अॅक्युपंक्चर पॉईंटस पायाच्या तळव्यात असतात. अनवाणी चालल्यामुळे जमिनीची विद्युत शक्ती पायाच्या तळव्यातून शरीरात शिरकाव करते. रक्त संक्रमण सुधारते. अनेक प्रकारच्या आजारातून सुटका होते. उच्च रक्तदाब कमी होतो. तणाव दूर होतो. डोकेदुखी कमी होते. उत्साह वाढतो. हृदयविकाराची शक्यता कमी होते. वजन नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत होतात. म्हणून डॉक्टरदेखील आपल्या रुग्णांना रोज पंधरा मिनीटे बागेत, मैदानी परिसरात अनवाणी चालण्याचा सल्ला देतात. त्यामुळे केवळ नवरात्रीतच नाही, तर दररोज दिवसातील काही वेळ तरी अनवाणी चालणे हितावह ठरते.
हेही वाचा: दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!
...मग नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कधी सुरू झाली?
ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते माहित नाही, मात्र कशी सुरू झाली असेल, हा तर्क आपण नक्कीच लावू शकतो. नवरात्रीत आपण घटस्थापना करतो. घटाभोवती मातीचा ओटा तयार करून त्यात धान्याची रुजवण घालतो. एकार्थी मातीच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या संपर्कात येतो. मातीशी नाळ जोडली जावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा, या हेतून भाविक नवरात्रीत वहाणा घालत नाहीत.
नवरात्रीत नऊ दिवस भाविक, कांदा-लसूण खात नाहीत, मांसाहार करत नाहीत, एकभुक्त राहतात, फलाहार करतात. या गोष्टी शारीरिकदृष्ट्या फायदेशीर असतातच, शिवाय भावनिकदृष्ट्या देखील त्यागाचे महत्त्व शिकवतात. अनवाणी चालण्याचा पर्यायही त्याचाच एक भाग. स्वत:च्या शरीराला थोडेफार कष्ट देऊन ईश्वरी चिंतन मनात ठेवणे, हा त्यामागचा मूळ विचार आहे.
उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावे, हा शुद्ध हेतू असतो.
परंतु, अलीकडे विचार लक्षात न घेता केवळ ट्रेंड म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. कुणी विचारले, तर त्यामागचे कारणही सांगता येत नाही. त्यामुळे व्यक्तीचे हसे होतेच, परंतु धर्म संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाते. म्हणून एखाद्या गोष्टीचे अनुसरण करायचे असेल, तर आधी त्याची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच त्यानुसार कृती करावी.
हेही वाचा: माजो लवतय डावा डोळा, काय शकुन गो सांगताय माका!