Navratri 2021 : महानवमीच्या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे दिलेल्या विधिवत पद्धतीने करा उत्थापन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 01:16 PM2021-10-13T13:16:47+5:302021-10-13T13:17:25+5:30
Navratri 2021: महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते.
अश्विन शुद्ध नवमी या तिथीला 'महानवमी' म्हणतात. तसेच 'दुर्गानवमी' असेही एक नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी महानवमी आहे. शास्त्रानुसार या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे विधिवत उत्थापन केले जाते. अनेकांकडे नवरात्रीच्या दहाव्या दिवशी अर्थात दसऱ्याला घट हलवण्याची प्रथा आहे. आपल्या कुळाचारानुसार उत्थापनाचा दिवस निश्चित करून पुढे दिलेल्या माहितीनुसार उपचार करावेत.
व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन भगवती देवीची पूजा करावी. तत्पूर्वी देवीचे पूजास्थान ध्वज, पताका, फुलमाळा, तोरण लावून सुशोभित करावे. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार देवीची पंचदशोपचारी, षोडशोपचारी, षट्त्रिंशोपचारी किंवा राजोपचारी पूजा करावी. देवीला पक्वान्नांसहित भोजनाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. याच दिवशी घटाची पूजा करून आरती झाल्यावर घटावर अक्षता वाहून घट विधिपूर्वक हलवले जातात. तसेच घटाभोवती उगवलेले धान्य कुंडीत पेरून तसेच लक्ष्मी स्वरूपात त्यातील काही धान्य तिजोरीत ठेवले जाते.
इतरही अनेक पूजाविधी अश्विन शुक्ल नवमीला करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये देवीच्या पूजेबरोबर कुमारीकापूजन केले जाते. देवी मानून कुमारिकेचे पूजन करण्यासाठी ही कुमारिका दोन वर्षे ते दहा वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक असते. दोन वर्षांच्या मुलीला 'कुमारी' आणि नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गास्वरूप मानतात.
महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच महानवमीला तिच्यासाठी होम करून कोहळ्याचे बलिदान दिले जाते. मात्र तरीही महाअष्टमीला 'महालक्ष्मीव्रत' केले जाते, तर महानवमीला 'दुर्गानवमी' संबोधले जाते. कारण मुळात आदिमायेने महालक्ष्मीचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणून संबोधले जाते.
महाराष्ट्रात घराघरात आणि देवीच्या सर्व मंदिरांमध्ये नवरात्रात घटस्थापना करून प्रत्येक तिथीची विहित पूजा श्रद्धापूर्वक केली जाते. या महानवमीत देवीला कोहळ्याचे बलिदान दिले जाते. मात्र हे बलिदान फक्त मंदिरातून दिले जाते.
अशा रितीने देवीचे नवरात्र साजरे होऊन दसऱ्याच्या आगमनाची घरोघरी तयारी केली जाते.