Navratri 2021 : शरीर व मन कणखर, खंबीर करायचे असेल, तर 'अशी' करा देवी शैलपुत्रीची साधना!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:42 PM2021-10-07T17:42:57+5:302021-10-07T17:43:20+5:30
Navratri 2021 : देवी ऊर्जा रूपाने आपल्या शरीरामधे कुठे आहे, त्याची तत्त्व, स्थान काय आणि त्याची साधना, त्याच्या मंत्रासकट कशी करावी, हे आपण या लेखमालेमधून ज्ञात करून घेणार आहोत.
>> आचार्य विदुला शेंडे
नऊ दुर्गेची रूपे, तिने धारण केलेले शस्त्र, वस्त्र, त्याचा रंग व त्या पाठीमागचे शास्त्र, ही देवीची सगुण आराधना आपण करतो. तीच ऊर्जा रूपाने आपल्या शरीरामधे कुठे आहे, त्याची तत्त्व, स्थान काय आणि त्याची साधना, त्याच्या मंत्रासकट कशी करावी, हे आपण या लेखमालेमधून ज्ञात करून घेणार आहोत. चंद्र जसा अमावस्येपासून कलेकलेने पौर्णिमेपर्यंत वाढत जातो, त्या प्रमाणेच पहिले नऊ दिवस हे स्त्री तत्त्व शक्ती वाढत जाते व शारदीय नवरात्रात ते १००० पटीने वाढते. पहिली माळ म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा हा दिवस. देवीचे पहिले रूप म्हणजे 'शैलपुत्री!'
शैलपुत्री- मूलस्थित बीजमंत्र साधना-
शैल म्हणजे पाषाण आणि त्याची पुत्री म्हणजे मुलगी ही शैलपुत्री, ही हिमालयाची कन्या. पाषाण तत्त्व म्हणजेच मूळापासून धरेपासून आभाळाकडे जाणारे स्थिर तत्त्व म्हणजेच देवीच्या या रूपाची आराधना केली तर पाषाणासारखी अढळता आपल्या शरीरात व मनात येते आणि शरीर व मन कणखर, खंबीर, नीडर, शांत होते.
शैलपुत्रीचे वाहन वृषभ म्हणजेच शंकरासमोरील नंदी आहे. वृषभ जसा बलवान, कारण तो जमीन नांगरून तिला शतपट उपजाऊ करतो, तसेच ही शैलपुत्री ची साधना आपल्याला शतपटीने कार्यरत करते.
मूलाधार चक्र हे शैलपुत्री तत्त्वाचे आराध्य स्थान, जिथे ही शक्ती आपल्याला साधनेने आत्मविश्वास, सृदृढपणा, आरोग्य देते. ही शक्तीचालिनी लाल रंगाचे प्रतिक चार पाकळ्यांच्या कमळाच्या प्रतिकात आहे. जी शौर्य, वीरतेचे प्रतीक आहे. ही शक्ती आपल्याला रक्षण कसे करायचे हे सांगते. हीचा ग्रह चंद्र, जो मनाचा कारक आहे, त्यामुळे मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी हिची साधना करावी.
या देवीचे बीजमंत्र अगदी सोपे आहेत-
ऊँ देवी शैलपुत्रै नम:
ऊँ ऐं ऱ्हीम क्लीं चामुण्डाय विच्चै
ऊँ शैलपुत्री दैव्यै नम:
मनुष्याची ध्येय व आकांक्षा उच्च असतात. त्याच्यासाठी मार्ग सुद्धा उच्च लागतो. कोणताही पर्वत चढणे सोपे नाही. अनेक संकटे, काटेकुटे यांना तोंड द्यावे लागते. तसेच ध्येय गाठणे सोपे नाही. त्यासाठी मार्ग दाखवायला ही शक्ती सहाय्य करते. पण मार्गक्रमण मात्र आपल्यालाच करायचे आहे. ध्येय गाठले की मात्र थकवा, शिणवटा दूर होतो व धन्यता वाटते. ती ही पहाड चढण्याची शक्ती, तनामनात व्यापून उरते. त्यामुळे आपण अचल ध्येयाबद्दलचा आत्मविश्वास, निर्भयता, कोणत्याही विपरित परिस्थितीवर मात करून अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी जी दिशा महत्त्वाची, महत्वाकांक्षा महत्त्वाची हेच ते जीवनाचे संरक्षित कवच म्हणजे शैलपुत्री शक्ती!
Navratri 2021 : पहिली माळ : स्वाभिमानी, तपस्विनी, व्रतस्थ अशा शैलपुत्रीची कहाणी!
शैलपुत्री या शक्तीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ आहे. पाषाणाचे तुकडे झाल्यावर त्याची माती होऊन पाणी मिसळले की चिखल होतो पण त्यातूनच कमळ उगवते, तसेच आपल्यामधील विकारांचा नाश झाला की आपणही कमळासारखे शुद्ध, स्वच्छ, आनंदी होतो. जर हे विकार नष्ट होत नसतील, तर त्रिशुळाचा वापर करायचा, म्हणजे त्रिगुण वापरून नंतर गुणातीत व्हायचे. आपल्याला त्रिशुळ वापरून त्यांचा नाश करायला ही शक्ती सहाय्य करते.