Navratri 2021: उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:36 AM2021-10-08T07:36:05+5:302021-10-08T07:36:58+5:30
Navratri Special: चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे.
दुसरी माळ - कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजे भारतातील ५१ शक्तिपीठ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता. यज्ञकुंडात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे ठिकाण. कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूर
दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या २५०००००
मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना
आदिलशाही आक्रमणांच्या काळात मूर्तीला इजा पोहोचू नये म्हणून पूजाऱ्यांनी देवीची मूर्ती अज्ञातवासात ठेवली होती. हा कालावधी संपल्यानंतर २६ सप्टेंबर १७१५ मध्ये तिची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेला यंदा ३०५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग
देवीच्या एका उजव्या हातात म्हाळूंग हे बीजफळ आहे. दुसऱ्या हातात खाली टेकवलेली गदा आहे. एका डाव्या हातात ढाल, तर दुसऱ्या हातात पानपात्र आहे. शिवशक्ती स्वरुपिणी असल्याने देवीच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग व त्याभोवतीने साडेतीन वेटोळ्यांचा नाग आहे. म्हणूनच मूळ मूर्तीवर किरीट नाही. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे. पुरातत्त्व खात्याच्या अंदाजानुसार ही मूर्ती दीड हजार वर्षांपूर्वीची आहे. गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे.
अंबाबाईचा नवरात्रोत्सव
श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव देशभरात प्रसिद्ध असून, या काळात २५ लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात देवीची वेगवेगळ्या स्त्री देवतेच्या रूपातील पूजा हे खास वैशिष्ट्य आहे. रोज रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी निघते. ललिता पंचमीला त्र्यंबोली टेकडीवर त्र्यंबोली देवीची भेट व कोहळा भेदनाचा विधी होतो. अष्टमीला अंबाबाई सजवलेल्या वाहनातून नगरवासीयांच्या भेटीला निघते. रात्री बारानंतर मंदिरात परत येते. मध्यरात्रीनंतर अष्टमीचा होम होतो. विजयादशमीला देवीची पालखी दसरा चौकात येते. येथे छत्रपतींच्या उपस्थितीत शाही दसरा सोहळा होतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी ई-पासची सुविधा करण्यात आली आहे. ज्यांना ई-पासने दर्शन घेता येणे शक्य नाही त्यांना मुखदर्शनाचीदेखील सोय केली आहे. तरी भाविकांनी नवरात्रौत्सवात प्रशासनाला सहकार्य करावे. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी