Navratri 2021 : दाही दिशांमध्ये व्यापून राहिलेली ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कुष्मांडा देवीची करा उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 04:29 PM2021-10-09T16:29:37+5:302021-10-09T16:30:00+5:30
Navratri 2021 : जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्माण्डाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे.
>> आचार्या विदुला शेंडे
या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता,
नम:स्तस्यै नम:स्तस्यै नम:स्तस्यै नमो नम:।
आश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात. कुष्मांड म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा. ज्यांच्यामधे निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्माण्डाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम + अण्डज म्हणजेच कुसुमासारख्या, फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती.
जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली, सृजनाची `एकोऽहम बहुर्यामी' ब्रह्मांड निर्माण करण्याची! तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्माण्डाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे.
या देवीच्या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दहा दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा. दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. कितीही संकटे आली तरी डगमगू नका. पश्चिम दिशा सांगते मागील चूकातून शहाणा हो. मागील सुंदर आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभव. उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने हे व धु्रव ताऱ्यासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढळ राहू दे. दक्षिण दिशेकडून वेळेचे, काळाचे महत्व जाण. उपदिशांकडून दोन गोष्टींमधले समत्व शीक. संसाधने जोडताना वेळेचे भान ठेव. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत व अधर अर्थात खालची दिशा सांगते तुला आसमंत गाठायचा आहे मग घे भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातील समाजासाठी होऊ देत.
अशी ही विश्वशक्ती `वूâष्माण्डा' हीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तुंची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्यांच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे.
ही देवी अष्टभूजा आहे. तिच्या हातात कमंडलू, धनुष्य बाण, कमळ, अमृतकलश, चंद्र, गदा आणि कमंडलू, माला आहे. अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मिनाक्षीदेवी असेही म्हणतात. हिच्या हातातील जपमाला साधकाला सर्व सिद्धी व निधी देतात. हिचे वाहन सिंह आहे.
ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी आहे, त्यांनी या शक्तीची उपासना करावी. आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे. जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्विकृती, किर्ती, सामर्थ्य , आरोग्य प्राप्त होते. हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दु:खं दूर होऊन संसाररूपी भवसागर तरुन जाण्याची शक्ती देते. तसेच आध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो.
या देवीची आराधना पुढील श्लोक म्हणून करतात.
सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तेपद्माभ्यो कुष्माण्डा शुभदास्तुमे।
या दैवी शक्तीने जागृत झालेल्या प्रेमाने अनुवंâपेने साधकामधील राग, द्वेष इ. फळून जातो. जरी आधीच्या पिढीकडून रागीट स्वभाव आला, तरी तो स्वभाव वितळून जातो, असे ऋषी वेदांतामध्ये सांगतात. तमस आणि राक्षसी वृत्ती नष्ट होते. वाईट, अमंगल, अविचार निघून जातात. ही फक्त प्रेम आणि करुणा देते. हीची प्रार्थना करूयात-
दुर्गविनाशिनी त्वंहि दारिद्र्यादि विनाशिनी
जगन्माता जगत् कर्ती जगदाधार रुपिणीम।
चराचरेश्वरी कुष्माण्डे प्रणमाम्यहम
त्रैलोक्यसुंदरी त्वं हि दु:ख, शोक, निवारिणीम,
परम आनंदमयी कुष्माण्ड प्रणमाम्यहम।