Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:38 PM2022-09-26T17:38:06+5:302022-09-26T17:39:20+5:30

Navratri 2022: हिंदू संस्कृतीमध्ये अष्टभुजा,शस्त्र सज्ज स्त्री शक्तीच प्रतीक आहे,पूजनीय आहे. हिंदूंच्या सर्व देवता कटुंब वत्सल आहेत. हे दर्शवणारी देवी शैलपुत्री!

Navratri 2022: A nine-day column on how to perceive the Goddess in her various forms; starts today! | Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

Next

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात म्हणजेच "घटस्थापनेचा दिवस". आजपासून दहा दिवस आपण श्री भगवतीची यथासांग पूजा करून तिच्या विविध रूपांची व चरित्र प्रादुर्भावाची उजळणी, अभ्यास व चर्चा करणार आहोत. 

तसे  पाहिल्यास वर्षभरात आपण एकूण चार वेळा नवरात्रोत्सव साजरा करीत असतो. वासंतिक / चैत्र नवरात्र,  माघी नवरात्र, शाकंभरी नवरात्र व शारदीय नवरात्र. तथापि प्रामुख्याने आपल्या ध्यानात वासंतिक व शारदीय हे दोन्ही नवरात्र राहतात, त्यातही शारदीय नवरात्र हा "भक्ती व शक्ती जागरणाचा" विशेष उत्सव असल्यामुळे तो आपणास अधिक भावतो.

भगवतीच्या विविध चरित्र प्रादुर्भावाची माहिती देणारे व शक्ति  उपासकास त्या साधनेत मार्गदर्शन करणारे "श्रीमद् देवी भागवत" व "श्री दुर्गा सप्तशती" हे दोन ग्रंथ शक्ती उपासकांमध्ये विशेष पूजनीय व सर्वमान्य आहेत. श्री मार्कंडेय ऋषींनी सांगितलेल्या  श्री.दुर्गा सप्तषतीतिल या दिव्य चरित्राचे श्रद्धापूर्वक पठण, मनन, चिंतन,उपासना व त्यातील सूत्रांचे गमक ध्यानी घेऊन आचरण करण्याचा प्रयत्न केल्यास या नवरात्रीनंतर येणारी प्रत्येक रात्र ही कोजागिरी पुनवेचा आनंद देणारी होऊ शकते. 

शैलपुत्री :--  शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस म्हणजेच " घटस्थापनेचे " दिवशी म्हणजेच " अश्विन शुद्ध प्रतिपदेस " भगवतीचे पूजन " शैलपुत्री " या रूपात केले जाते. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या, शीला म्हणजे दगड, पुत्री म्हणजे कन्या.....!

दगडाची म्हणजेच पर्वताची म्हणजेच पर्वत राजाची कन्या म्हणून " पार्वती " म्हणून " शैलपुत्री " असे तिचे नामाभीधान आहे. नवदुर्गांच्या पूजनामध्ये शैलपुत्रीच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. ही हिमालय कन्या असून ती पर्वतासमान दृढनिश्चयी व जिंकण्यास कठीण ( गमनाय दुष्कर: इति दुर्गा: ) अशी आहे. ही पर्वताची कन्या असल्यामुळे हिला " पार्वती " असेही म्हणतात.

भगवतीच्या या श्रीविग्रहाच्या उपासनेतून साधकाच्या " मुलाधार चक्राची " जागृती होते व साधकास सर्व प्रकारचे व्यावहारिक सुख व आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होतात. म्हणून शैलपुत्री ही प्रथम वंदनीय आहे. या शैलपुत्रीचा अंमल हा दूषित चंद्रावर असतो. म्हणजेच चंद्र शुद्ध करण्याचे कार्य या श्रीविग्रहाच्या उपासनेतून होते. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. "चंद्रमा मनसो जात:" असे सूत्रच आहे. जोपर्यंत साधकाचे मन चंचल दूषित व अस्थिर आहे तोपर्यंत तो सर्व सुखापासून वंचित व इच्छित सिद्धी पासून दूर राहील हे वेगळे सांगावयास नको. म्हणून तर संत म्हणतात " मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण". या मनाच्याच सर्व व्यापारांमुळे मानवी जीवनामध्ये मोठ्या उलथापालथी होत असतात. म्हणूनच "मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो: " असे म्हटले आहे. कुंडलीतील दूषित चंद्र शुद्ध करण्याच्या उपासनेसाठी शैलपुत्रीचे ध्यान अनिवार्य आहे. अशा प्रकारे चंद्रशुद्धी म्हणजेच मनशुद्धी झाल्यानंतर साधकास सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही. या भगवतीला " हेमवती" व "पार्वती" या अन्य नावांनी सुद्धा ओळखले जाते.

श्रीमद् भागवतातील कथेनुसार एकदा प्रजापती दक्ष राजाने फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञामध्ये दक्ष प्रजापतीने सर्व देवतांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले व त्यांना त्यांचा त्यांचा देय भाग किंवा हविर्भागही अर्पण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही बातमी सतीला लागल्यानंतर तिलाही आपण आपल्या माहेरी जाऊन या यज्ञात सहभागी व्हावे असे वाटू लागले. तिने भगवान शंकरांकडे या यज्ञात जाण्यासाठी हट्ट धरला. तथापि भगवान शंकरांनी तेथे जाण्यास नकार दिला. हवे असल्यास तू जा असे भगवान शंकरांनी सांगितले. भगवान शंकरांची नाराजी असतानाही भगवती सती या यज्ञात आली. तिच्या अपेक्षेनुसार या यज्ञात तिचे स्वागत तर झाले नाहीच पण तिचा जागोजागी अपमान व उपेक्षा होऊ लागली. शिवाय तिच्या पती देवांबद्दल म्हणजे भगवान शंकरांबद्दल तेथे अनुदार उद्गार निघू लागले. पती निंदा सहन न झाल्यामुळे सतीने योगाग्नि प्रकट करून त्यात स्वतःस जाळून घेतले.( पुढील काळात मोगलांच्या न्रुशंस आक्रमणामुळे व स्त्री सौंदर्याच्या क्रूर भक्षक वृत्तीमुळे हिंदूंमध्ये निर्माण झालेली  "सती प्रथा" व सतीने या यज्ञात स्वतःस जाळून घेण्याचा काहीही संबंध नाही, याची नोंद घ्यावी ) ही घटना भगवान शंकरांना कळल्यानंतर भगवान शंकर कृध्द झाले व त्यांनी आपल्या पार्शदांच्या मार्फत दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. भगवान शंकरांना पुन्हा  प्राप्त करण्यासाठी हीच सती पुढील जन्मात  " शैलपुत्री हिमराज कन्या पार्वती " म्हणून जन्मास आली व तिने जीवाचे परम कल्याण करणाऱ्या भगवान चंद्रमौलेश्वर शिवांची प्राप्ती करून घेतली अशी श्रीमद्भागवतामध्ये कथा आहे . प्रत्येक साधकांनी आपले अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी मन स्थिर ,शुद्ध करून साधना केल्यास " जीवाचे शिवाशी " मिलन झाल्याशिवाय राहत नाही असा सुंदर बोध या कथेतून आपणास होतो.

ध्यानमंत्र : वंदे वांछित लाभाय चंद्रार्ध कृतशेखराम ।
       वृषारुढां शुलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।। 

अर्थ : --   श्री परंबा भगवती शैल पुत्री या श्रीविग्रहामध्ये वृषभावर अरुण झाली असून तिने आपल्या डाव्या हातात त्रिशूल व उजव्या हाती कमलपुष्प धारण केले आहे तिने मस्तकी अर्थचंद्र धारण केलेला असून ती साधकाला सर्व अपेक्षित लाभ व जीवनातील सर्वोच्च यश प्राप्त करून देणारी अशी आहे.  "ह्रीं शिवाय नमः " हा या भगवतीचा ध्यान मंत्र आहे.

एकदा ब्रिटिश शिक्षण तज्ञ लॉर्ड मेकॉले केरळ मध्ये प्रवासाला गेला.तिथे तो एक  भगवान विष्णू मंदिरात गेला.भगवान विष्णूची शंख चक्र गदा पद्म धारी चतुर्भुज मूर्ती पाहून त्याची धारणा झाली हिंदू जीवन पद्धती पुरुष प्रधान आहे. पुढे तो थोड्या अंतरावर असलेल्या देवीच्या मंदिरात गेला.तिथे तर त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.त्यांनी पाहिलं ती मूर्ती स्त्री देवतेची होती,इतकंच नाही तर विष्णूला चारच हात होते,तर त्या मूर्तीला आठ हात होते,ते आठही हात शस्त्र सज्ज होते,देवी सिंहावर आरूढ होती.आणि तिच्या पायाखाली तिने राक्षसाला मारून टाकलेलं होतं. आणि त्यांनी निरीक्षण नोंदवलं.हिंदू जीवन पद्धती हि मातृसत्ताक जीवन पद्धती आहे.स्त्री आणि पुरुष हे कुटुंबाचा आधारभूत घटक आहेत.आणि पर्यायाने सुदृढ समाज व्यवस्थेचा मजबूत पाया म्हणजे  स्त्री आणि  पुरुष यांच्या समान अधिकारांनी युक्त असलेलं कुटुंब.भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री नुसती पूजनियच नाही तर शासनकर्ती देखील आहे.म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये अष्टभुजा,शस्त्र सज्ज स्त्री शक्तीच प्रतीक आहे,पूजनीय आहे. हिंदूंच्या सर्व देवता कटुंब वत्सल आहेत.

प्राचीन भारताच्या इतिहासात संन्यस्त व्यक्ती पूजनियच आहेत पण कुटुंबवत्सल प्रतिकांना, महापुरुषांना देवत्व प्राप्त झालं आहे.आपला राम एकटा नसतो सीताराम असतो,कृष्ण देखील एकटा नसतो राधा कृष्ण असतो,जोडा लक्ष्मी नारायणाचा असतो,विठोबा रखुमाई सोबतच असतो.इतकंच काय एकट्या सदाशिवाला नमन न करता सांब सदाशिव म्हणतो म्हणजे स अंब म्हणजे अंबे सहित असलेल्या शिवाला नमन करतो, "भवं भवानी सहीतं नमामी."

भारतीय अध्यात्म शास्त्राने भगवतीचे दर्शन सगळीकडेच घेतलेले आहे म्हणूनच "या देवी सर्वभूतेषु" अशी सुरुवात करून ऋषी-मुनी तिला शक्ती, माता, वृत्ती, क्षुधा,क्षमा, निद्रा,छाया, अशा विविध रूपांमध्ये बघतात व तिच्या दर्शन सुखाचा आनंद घेतात.

अश्विन पौर्णिमेच्या पूर्ण विकसित चंद्रासारखं तेजस्वी, अमृत वर्षी व जगत कल्याणाची कामना असणारे शुद्ध, सात्विक व पूर्ण विकसित मनच खऱ्या अर्थाने जागरणाची पौर्णिमा साजरी करू शकते. या दिवशी नियती अशा साधकांना प्रश्न विचारत असते " को जागर्ती ? " (कोण जागे आहे?)  नियतीने आपल्यापुढे निर्माण केलेल्या या प्रश्नाचे आत्मविश्वास पूर्ण व पौरुष संपन्न   "वयं राष्ट्रे जाग्रयाम पुरोहित:" (आम्ही राष्ट्र संरक्षण करणारे पुरोहित म्हणजे योध्दे जागते आहोत,) असे उत्तर शक्ती उपासका कडून अपेक्षित असते.

आज पासून त्याच शक्तीच्या जागरणाचं,पूजनाच नवरात्र सुरू झालं आहे.श्रवण,कीर्तन,विष्णू स्मरण,पाद सेवन,अर्चन, वंदन,दास्य,सख्य आणि आत्मनिवेदन भक्तीने ओतप्रोत भारलेल्या नवरात्री नंतर येणारी दशमी ही विजयाचीच दशमी असते ही आपल्या पूर्वजानी आपल्या श्रद्धेने सिद्ध केलेली आहेच.

"मातृ रूपेंण संस्थितां" असलेली शक्ती आपणा सर्वावर सुप्रसन्न राहो हिच मंगल मय शुभकभारतीय अध्यात्म शास्त्राने भगवतीचे दर्शन सगळीकडेच घेतलेले आहे म्हणूनच "या देवी सर्वभूतेषु" अशी सुरुवात करून ऋषी-मुनी तिला शक्ती, माता, वृत्ती, क्षुधा,क्षमा, निद्रा,छाया, अशा विविध रूपांमध्ये बघतात व तिच्या दर्शन सुखाचा आनंद घेतात.

या नऊ दिवसात केलेल्या भक्ती, ज्ञान, शक्ती,वैराग्याच्या जागरणातूनच समाजातील व मनातीलहि अहंकारी, आतताई, दुर्वर्तनी, स्त्री सौंदर्य भक्षक, चंड,मुंड, महिषासुर, रक्तबीज, अशा सारख्या व ज्ञानसंपन्न वेदविद्या विभूषित तरीही दुष्प्रवृत्त दशानन रावणाचा वध करणारी आणि सर्व प्रकारच्या असुरी वृत्तींचे निर्दालन करण्याची प्रेरणा देणारी विजयादशमी येत असते. 

भगवतीच्या या नवरूपातून कोमल, सुकुमार, बाल्य संगोपनाचे सृजनशिल मात्रुत्व, संघर्षपूर्ण जीवन जगण्याची जिद्द, आनंदमय जीवन जगण्याची कलासक्त वृत्ती, प्रतिकूलतेवर मात करण्याची संघर्ष प्रवणशीलता, स्वीकृत ध्येयासाठी सर्व प्रकारचे कष्ट सहन करण्याची तितिक्षा, आतताई व अत्याचारी नृषंस प्रवृत्तीला अट्टाहास करून संपवण्याची पराक्रमी/ विजिगिषु वृत्ती, प्राप्त करण्याची ही प्रतिवार्षिक रिचार्ज स्कीमच आहे. प्रतिवर्षी अशाप्रकारे मनाचा रिचार्ज मारून एका नवनवोन्मेषाने नव्या आनंददायी जीवनाला सामोरं जाण्याचा  नवरात्रोत्सव  म्हणजे एक रिफ्रेशर कोर्सच जणु......!

अशा प्रकारचा नवनवोन्मेष संपन्न आनंद लुटण्यासाठी भगवतीच्या विविध रूपांचे दर्शन घेण्याची दृष्टी मात्र प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. चराचरात तिला बघणे म्हणजेच तिच्या चराचरातील, समाज जीवनातील विविध रूपांचा योग्य आदर, सन्मान व पूजन करण्याची  क्षमता अंगी  निर्माण  करणे होय. तिच्या विविध रूपातील अशा दर्शनाची आस मनी ठेवून तिला प्रार्थुया....... 

उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी
तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी।।
शांत शारदा कला कामिनी तूच विश्वमोहिनी 
त्रिशूल धारी रणचंडी तू महिषासुर मर्दिनी 
मोहक दाहक अनंत रुपे तुझीच संजीवनी 
तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी।। 

तिचे असे सर्वस्पर्शी दर्शन घेण्यासाठी आपणास भक्तही व्हावे लागेल, ज्ञानी ही व्हावे लागेल व सिद्धही व्हावे लागेल. चला तर मग या वर्षी आपण अशा प्रकारे भगवतीच्या जागरणाचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करूया. 

                    अंबे उमे कालीके आदिशक्ती ।
                    जगत् कारिणी विश्वकल्याण मूर्ती।
                    प्रचंड प्रवाही तुझी दिव्य शक्ती।
                   तुला वर्णिण्या दे मला दिव्य स्फूर्ती।।

आपला हा देहरूपी घट या दहा दिवसात भगवती च्या पायी मांडून, स्थिर करून ज्ञान, भक्ती, वैराग्य, सामर्थ्य, श्री, सौंदर्य, शक्ती यांची उपासना करण्याचा प्रयत्न करुया. या वर्षी अशा प्रकारची संतप्रणित, अध्यात्म शुद्ध , घटस्थापना करण्याची व त्यातून नवजागरण करण्याची आम्हा सर्वांना सद्बुद्धी  व क्षमता प्राप्त होवो ही भगवतीचे चरणी प्रार्थना........

संपर्क :  94 222 84 666 / 79 72 00 28 70           

Web Title: Navratri 2022: A nine-day column on how to perceive the Goddess in her various forms; starts today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.