Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:35 PM2022-09-24T16:35:36+5:302022-09-24T16:36:30+5:30

Navratri 2022: नवरात्रीत विविध पद्धतीने देवीचा जागर केला जातो, त्यापैकी काही प्रचलित पद्धतींची तोंडओळख करून घेऊया.

Navratri 2022: Ashwin Mass is starting, let's know the different methods of Durga Puja! | Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

googlenewsNext

शिवपत्नी पार्वती म्हणजेच आदिशक्ती कालिमाता-भवानी-अंबा-जगदंबा-महालक्ष्मी हिची जी अनेक रूपे आहीत त्यामध्येच एक दुर्गेचे रूप आहे. घटस्थापना हा तिचा उत्सव आहे, सण आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे नवरात्र असते. यंदा २६ सप्टेंबरपासून आश्विन मास सुरू होत आहे आणि त्याच्या पहिल्या दिवसापासून अर्थात प्रतिपदेपासून नवरात्रीचा उत्सवही सुरू होत आहे. 

मातीची एक वेदी करतात. त्यावर घट स्थापन करून त्याभोवती धान्य पेरतात. घटावरील पात्रामध्ये दुर्गेची मूर्ती ठेवतात. तिचवर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा सोडतात. नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवतात. सप्तशतीचा पाठ म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी रोज एका कुमारिकेला जेवावयास बोलवतात किंवा काही ठिकाणी सवाष्णीला जेवायला बोलवतात. घटस्थापना हा एक कुळधर्मच आहे. 

महिषघ्नी महामाये चामुण्डे मुण्डमालिनी
द्रव्यआरोग्य विजयं देहि देवि नमोऽस्तुते।

महिषासुराला मारणाऱ्या महामाया, चामुंडा आणि गळ्यात मुंडक्यांची माळा धारण करणाऱ्या देवी, मी तुला वंदन करतो. तू मला धन, आरोग्य आणि विजयश्री दे' असा मंत्र घटपूजेच्या वेळी म्हणण्यात येतो. 

दुर्गापूजेचा हा उत्सव बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. भारतातील सर्व राज्यातही तो कमी जास्त प्रमाणात साजरा होत असतो. 
रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते.

काहींच्याकडे घटस्थापनेसाठी मातीची वेदी केली जाते. घरच्या देवीचीही नऊ दिवस षोडशोपचारे पूजा केली जाते. काही जण घटस्थापना करून रोज एक एक माळ घटावर बांधतात. नवरात्रात काही ठिकाणी पशूबळी देण्यात येतो. 

या नऊ दिवसांत विशेषत: अष्टमीला काही घरांमध्ये जोगवा मागण्याचा कुळाचार आहे. देवीच्या नावाने इतरांच्या घरी जाऊन कोरड्या धान्याची भिक्षा मागतात व त्या धान्याचे भोजन नैवेद्य समजून घेतात, यालाच जोगवा म्हणतात. 

जोगव्याची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. पैकी एकनाथ महाराजांनी लिहिलेला जोगवा आजही एक सूरात घरोघरी गायला जातो...

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । 
मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । 
द्वैत सारुनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । 
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।
करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । 
दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । 
अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी जाले मी नि:संग । 
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

चला तर, आपणही आई जगदंबेचा जोगवा मागायला सज्ज होऊया...!

Web Title: Navratri 2022: Ashwin Mass is starting, let's know the different methods of Durga Puja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.