Navratri 2022: योग्य ठिकाणी आपल्या उग्र रूपाचे दर्शन घडवावेच लागते, हे शिकवणारी देवी कालरात्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 07:00 AM2022-10-02T07:00:00+5:302022-10-02T07:00:06+5:30
Navratri 2022: आज अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे" दुर्गाष्टमी" किंवा "महाअष्टमी" चा मंगलमय दिवस! श्री नवरात्र उत्सवातील आठवी माळ पण आपल्या या लेखमालेतील व विद्यमान नवरात्रातील सातवा दिवस. आज आपण भगवती च्या " कालरात्री " या श्री विग्रहाचे अक्षर पूजन करणार आहोत.
>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )
भगवतीच्या विविध श्रीविग्रहांचे दर्शन घेत असताना आपणास हे जाणवले असेल, की ही भगवती मातृ स्वरुपा, क्षमा रूपा, शक्ती रूपा, शांती रूपा, अशा मानवी जीवनातल्या विविध भावभावनांना साकार व तृप्त करणाऱ्या ऊर्जेची साक्षात सगुण मूर्ती आहे. मनुष्य जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करणारी ती ज्ञानदा सरस्वती आहे, अविद्येचा नाश करणारी ती विद्यादानी शारदा आहे, मनुष्याच्या जीवनात वैभव, संपत्ती, आयुरारोग्य देणारी ती महालक्ष्मी आहे, त्याच्या शरीराच्या
पोषणासाठी स्तन्य, अन्न व विविध रस देणारी ही माता अन्नपूर्णा आहे, त्याच्या जीवनात त्याच्यावर येणाऱ्या विविध संकटांचा नाश करून वात्सल्य भावाने संरक्षण करणारी ती महाकाली चंडी पण आहे. श्री मार्कंडेय महामुनींच्या असीम कृपेने दुर्गासप्तशती, देवी भागवत, मार्कंडेय पुराण या ग्रंथाच्या आधारे तिच्या विविध अवतारांचे आपण दर्शन घेत आहोत.अशा या विविध रंगाने, रूपाने, क्षमतेने, सामर्थ्याने,माधुर्याने, गुणांनी पराक्रमानी युक्त आणि सिद्ध असलेल्या या महामाया भगवतीचे आज आपण "कालरात्री" या स्वरुपात दर्शन घेणार आहोत.
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्टी कर्णिकाकर्णि तैलाभ्यक्तशरीरिणी।
वामपादोल्ल सल्लोह लता कण्टक भूषणा ।।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥
काल रात्री :-- भक्तवत्सल कल्याणकारी भगवती दुर्गेने कालरात्री या श्रीविग्रहात आविर्भुत होउन रक्तबीज या राक्षसाचा वध केला आहे. ही वर्णाने कृष्ण म्हणजे काळी असल्यामुळे तिला "कालरात्री" असे एक नाव मिळाले. ती अंधारा इतकी काळी असून अतिशय भयानक रूप तिने धारण केलेले आहे. केस विखुरलेले असुन मुक्तकेशा असलेल्या कालरात्री ने गळ्यात लखलखणाऱ्या नरमुंडांची माळा धारण केलेली आहे. ही स्वतः काल रात्री असली तरी ती अंध:काराचा नाश करणारी आहे. काल भया पासून म्हणजे मरण भयापासून साधकांचे संरक्षण करणारी आहे. ही त्रिनेत्र असून तिचे नेत्र ब्रम्हांडासमान गोल आकाराचे आहेत. तिच्या श्वासातून अग्निज्वाला बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर ती गर्दभ वाहिनी,असून ती चतुर्हस्त म्हणजे चार भुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूच्या वरच्या हाताने ती भक्ताला अभय प्रदान करते आहे, तर खालील हाताने ती भक्ताने केलेल्या उपासनेवर प्रसन्न होऊन वर प्रदान करीत आहे. डाव्या बाजूच्या वरच्या हातात लोहाचे तीव्र व सुतीक्ष्ण धार असलेले परशु सारखे एक खङ्ग धारण केले आहे. ही भयंकर दिसत असली तरी शुभ फलदायी असून ती सर्व सिद्धी प्रदाती आहे. तिच्या केवळ स्मरणानेच दानव,दैत्य, राक्षस,भूत, प्रेत, साधकां पासून दूर जातात. हिच्या उपासनेतून ग्रहबाधा सुद्धा नष्ट होते. त्याच प्रमाणे हिच्या उपासकास अग्नी, जल, जंतू ,शत्रू व रात्रीभय राहत नाही. हिचा भक्त सर्वार्थाने भयरहित व निर्भय होतो. सहस्त्रारचक्रामध्ये या भगवतीचे स्थान असून भगवतीच्या कालीमाता, महाकाली, भद्रकाली, भैरवी, रुद्राणी, चामुंडा, चंडी व दुर्गा या विनाशकारी विग्रहां पैकीच "कालरात्री" हे एक रुप मानले जाते.हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही साधकाच्या मनातील नकारात्मक विचार व ऊर्जेचा सहजगत्या विनाश करते. सर्वभक्षी काळाचीही ही काळ असल्यामुळेही हिला "कालरात्री" हे नाव पडले आहे.
भारतीय चिंतनानुसार " देह म्हणजेच मी" हे सर्वात घोर अज्ञान आहे. "मी देह नसुन मी देही आहे" याची जाणीव यावी म्हणून तर हा जागरणाचा अट्टाहास.....!
ऐक ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पहावे आपणासी आपण । या नांव ज्ञान ।।
असे समर्थ सुद्धा आपणास सांगतात. या अज्ञानाचा नाश करण्यासाठी साधकाने सतत सत्कर्म रत राहिले पाहिजे अशी भारतीय शास्त्रांची अपेक्षा आहे. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये विश्वात्मक भगवंताच्या चरणी मागणे मागताना दुरितांचे तिमिर जावो यावरच न थांबता साधकां कडून " तया सत्कर्मी रती वाढो" अशा सत्कर्म साधनेची अपेक्षा व्यक्त केली आहे. मुळात " कर्मे ईषु भजावा" असा माउलींचा आग्रहच आहे.
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा ।
पूजा केलिया होय अपारा । तोषा लागी ।।
असे कर्मातून भगवंत प्राप्ती चे रहस्य माऊलींनी तिसर्या अध्यायात सांगून ठेवले आहेच. तथापि कर्मास भक्तीचा ओलावा व ज्ञानाची दृष्टी असणे आवश्यक आहे, कारण ज्ञानानेच माणसाला अमरत्व प्राप्त होते " न हि ज्ञानेन सदृशं पवित्रंइहविद्यते " असे भगवान गोपाल कृष्णांचेही सांगणे आहेच. "ज्ञानाद् एव तु कैवल्यं" असे आचार्य ही सांगतातच.
साधकाच्या तमोगुणांचा नाश रजोगुणाच्या साधनेने, रजोगुणाचा नाश सत्वगुणाच्या साधनेने व सत्त्वगुणांच्या साधनेतून निर्माण होणाऱ्या दोषांचा नाश भगवद् अनुग्रहातून किंवा सद्गुरूंच्या कृपेने होतो. भगवती कालरात्री या विग्रहातून साधकाची अज्ञान समाप्ती करविते व ज्ञान संप्राप्ती ची महारात्री त्याच्या जीवनात आणते. वस्तुतः " देह विनाशी व देही अविनाशी "अशी आपली मान्यता आहे म्हणूनच तर जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणाले.....
देह हे काळाचे धन कुबेराचे ।
येथे मनुष्याचे काय आहे.....?
म्हणूनच मनुष्याचे शरीर संपलं तरी मनुष्य सत्कर्माच्या द्वारे जीवित राहतो.
सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजिला ज्यांनी ।
अनंत त्यांची जीवन यात्रा कधी न सरे मरणांनी ।।
अशाप्रकारे सत्कर्माचरणरत राहून जी कीर्ती प्राप्त होते ती देह संपला तरी शाश्वत राहते.
मुरतसे कीरत बडी बिन पंख उड जाये ।
मुरत तो जाती रहे किरत कबहु न जाय ।।
भारतीय दर्शन शास्त्रानुसार अज्ञान आणि कुसंस्कार हे माणसाचे दोन मोठे अभिजात दोष किंवा शत्रू आहेत. जे माणसाच्या रक्तात व बीजात म्हणजेच वीर्याच्या माध्यमातून संचार करित साधकावर आपला दुष्पगडा जमवीत असतात. साधनेच्या तपाग्निने या रक्तबीजाचा नाश करणे हे कालरात्रीच्या उपासनेचे गमक आहे. व अभ्यासातून या प्रकारची तीव्र साधना व दिव्यतप साधकाला करणे सहज शक्य आहे.
करत करत अभ्यास के जडमती होत सुजान ।।
असा संत श्रेष्ठ तुलसीदासांनी सुद्धा निर्वाळा दिला आहे. संत श्रेष्ठ तुकोबाराय हे साधकासाठी साधनेच्या अभ्यासाचे एक अतिशय उत्तुंग व आदर्श उदाहरण आहे. तुकोबारायांनी प्रचंड अभ्यास करून व साधना करून त्यांना अपेक्षित असलेले साध्य सिद्ध केले होते. म्हणूनच तुकोबाराय स्वानुभवातून म्हणाले........
असाध्य ते साध्य करिता सायास ।
कारण अभ्यास तुका म्हणे ।।
या कालरात्रीच्या कृपेने अशा प्रकारचा साधना अभ्यास साधकाला साध्य होतो. कालरात्री ही रूपाने भयंकर असली तरी वृत्तीने अभयंकर व स्वभावाने शुभंकर आहे. ती सर्व शुभ कार्य व शुभ फलाचे आश्रयस्थान आहे. साधकाने केवळ शरणागत होऊन तिच्या चरणी विनम्र भावाने......
प्रसन्नवदने उघडी नयने नवलप्रभा उजळु दे ।
काजळ काळ्या तमपुतळ्यांना तेजोमय होऊ दे ।
अखंड चालो प्रकाश जागर ध्यानी मनी स्वप्नी ।
तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी ।।
अशी प्रार्थना करणे आवश्यक असते. जसा अणुऊर्जेचा स्फोट हा भयंकर व विनाशकारी असतो पण नियोजनपूर्वक त्याचा केलेला वापर हा शुभंकर असतो. तसेच काल रात्रीच्या ऊर्जेचे हे रहस्य आहे. ज्याप्रमाणे एखाद्या रोगाच्या विषाणूतूनच त्या रोगाच्या प्रतिबंधाचा ची लस तयार केली जाते,तसेच सांकेतिक पद्धतीने किंवा रूपकातून साधकाच्या सप्तचक्रांकित सूप्त ऊर्जेच्या प्रकटीकरणाची ही कथा कालरात्री च्या आविर्भावातुन मांडण्यात आलेली आहे.
संपूर्ण ब्रम्हांड ऊर्जेने परिपूर्ण आहे. The whole universe is fully charged & run by energy.....! आधुनिक विज्ञानाने या ऊर्जेलाच "कॉस्मिक एनर्जी " असे म्हटले आहे. आपण साधना करीत असलेल्या भगवती ची कुदृष्टी होऊ नये व शक्ती बाधित किंवा करप्ट होऊ नये म्हणून सांकेतिक पद्धतीने तिचा वर्ण काळा दाखविला आहे. काळ्या रंगाने भगवतीची कुदृष्टी सूचित केली आहे. समाजातील शंकेखोर मानसिकता किंवा कुत्सित मनोवृत्ती शक्तीच्या साधनेतून व जागरणातूनच बदलता येईल. हे कार्य ईश्वरी कृपा करत असते. परंतु ईश्वर अगम्य व दुर्लभ असल्याने तो संत कृपेशिवाय साध्य होऊ शकत नाही. पण संत कृपा मिळवावी कशी? संत भेटी कुठे होईल.........?
पत्थर के तुकडे हर जगह है हीरे कही मिलते नही।
नीम नाले मे भी है चंदन के तरु कही मिलते नही ।
टोली सियारो की मिले मृगराज दल मिलते नही।
बदनीयत हर घर दिल मे है साधू कही मिलते नही ।।
असा आपला बहुतेकांचा अनुभवही आहेच.
"संतांचे संगती मनोमार्ग गती
आकळावा श्रीपती येणे पंथे "
असा भगवंत प्राप्तीचा सुलभ राजपथ ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचे अभंगातून आपणास दाखवून दिलेला आहेच.
शक्ती जागरणाच्या या अनुष्ठानात नऊ दिवस कठोर साधना करून साधक मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रा पर्यंत येऊन पोहोचतो. भगवती परांबा जगत्धात्री ची परम सत्ता या चक्रात सुप्त रूपात असते. हिलाच "मूळ ऊर्जा" किंवा "आदिमाया" असेही म्हटले आहे. ही आदिम ऊर्जा,उद्दाम ऊर्जा न होऊ देता तिच्या असीम स्पंदनातून जीव "शिव स्वरूपाची" अनुभूती घेतो. अशा शिवत्वाला पोचलेला तो जीव "शिवभावे जीव सेवा" करत "आता उरलो उपकारापुरता" या विश्व कल्याणाच्या भावनेतून या अखंड उर्जाशक्तीच्या स्पंदनांचा वापर जगत् कल्याणासाठी व समजोद्धारासाठी करीत असतो.
गर्दभ वाहन रहस्य :-- आतापर्यंत आपण भगवतीची जी रुपं बघितली ती सगळीच सिंह वाहिनी होती. परंतु कालरात्री हे रूप मात्र खरवाहिनी म्हणजे "गर्दभारुढ" असे रूप आहे. असे का? या गर्दभ वाहनाचा काही विशेष संकेत आहे का? याचा थोडा विचार करूया.
साधकाच्या शक्ती जागरणातून होणाऱ्या ऊर्जा विस्फोटामुळे साधकाच्या सर्वप्रकारच्या वृत्ती अ-निवार होतात, या अ-निवार वृत्ती किंवा मनोवासना ताब्यात ठेवणे सिंहावर स्वारी करण्याइतकेच महाकर्मकठीण कार्य असते. पण या कालरात्री रूपात ती आदिम ऊर्जाशक्ती साधकाच्या मूलाधारा पासून प्रवास करत सहस्त्रार चक्रात स्थिर होते. ती सहस्त्रार चक्रात स्थिर झाली की वृत्ती किंवा मनोव्यापार किंवा मनोविकार सांभाळणे, ताब्यात ठेवणे, गाढवावर सवारी करण्याइतके सुलभ होते .या अवस्थेतिल साधकास "ऋषिकेश साधक असे म्हणतात. अन्यथा साधना काळात निर्माण झालेल्या विविध विक्षेपां मुळे साधक एक तर मनोवृत्तीच्या आहारी जाऊन पथभ्रष्ट तरी होतो नाहीतर साधना पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेल्या सिद्धी तून अहंकाराने बिघडतो तरी.
साधकांचे मायबाप श्री ज्ञानेश्वर माऊलींनी हा धोका किती स्पष्ट शब्दात मांडला आहे बघा......
या विषया वाचून काही । आणिक सर्वथा नाही ।
ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ।।
नवल अहंकाराची गोठी ।
विशेषे नलगे अज्ञाना पाठी।
सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी।।
प्रचंड कार्यक्षमता तरीही आज्ञाधारकपणा हा गाढवाचा सगळ्यात मोठा सदगुण आहे. म्हणतात ना एकदा चुकतो तो गाढव वारंवार चुकतो तो माणूस....! म्हणून भगवतीने गाढव वाहन स्वीकारले आहे. आरंभी सृष्टी रुपा, पालन कालात स्थिती रूपा, कल्पांत काली संहार रूपा, असलेली ही भगवती सत्व, रज,व तम उत्पन्न करणारी असूनही ती या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. म्हणूनच तिला महामाया,भयंकरा, अभंयकरा, कालरात्री, महारात्री, मोहरात्री, श्री, ईश्वरी, ह्री व बोध स्वरूपा बुद्धी अशी विविध नामाभीधाने आहेत.
रक्तबीज :-- मार्कंडेय पुराणातील कथेनुसार रक्तबीज हा पूर्वजन्मी रंभासुर नावाचा दैत्य होता.( कालच्या महिषासुराचा बाप) हा स्वतः उग्र तपश्चर्येस
बसला असता याच्या तपाने भयभित होउन इंद्राने कपटाने त्याचा वध केला. त्या जन्मातील आपली अपूर्ण तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी तो पुढच्या जन्मात रक्तबीज म्हणून जन्मला. त्याने पुन्हा ब्रह्मदेवाची घोर तपस्या केली. भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने ब्रह्म देवांकडून अमरत्वाचा वर मागितला. अर्थातच भगवंतांनी अमरत्व नाकारले. मग त्याने देव-देवता, दानव, गंधर्व, यक्ष, पिशाच्चे, राक्षस, पशु-पक्षी, मनुष्य यांच्यापासून अभय मागितले व माझ्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून माझा पुनर्जन्म व्हावा असा वर मागून घेतला. या वरप्रभावाने तो उन्मत्त व अनियंत्रित झाला व त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली.
ब्रम्हा-विष्णू-महेश व सर्व देवदेवतांना त्याने अनेकदा संग्रामात हरविले. याच्या पारीपत्त्याचा उपाय मिळविण्यासाठी सर्व देवदेवता एकत्र येऊन त्यांनी आदिशक्ती ची प्रार्थना केली. आदिशक्ती त्यांच्या या प्रार्थनेने प्रसन्न झाली व तिने " मी रक्तबीज वध करण्यासाठी विचित्र अवतार धारण करीन " असे वचन दिले. ज्या ठिकाणी सर्व देवदेवतांनी भगवतीची प्रार्थना केली ते स्थान आजही देवभूमी उत्तराखंड प्रांतात रुद्रप्रयाग च्या जवळ सरस्वती नदीच्या किनारी "कालीमठ" किंवा " कालीतीर्थ" नावाने प्रसिद्ध आहे. आजही या ठिकाणी सरस्वती नदीच्या प्रवाहात एक लाल शीला दाखविली जाते जिला "रक्तबीज शीला" असे म्हटले जाते.
भगवंताच्या वराने उन्मत्त झालेला रक्तबीज सर्वांना त्रास देऊ लागला. मग सर्व देवतांच्या योजनेनुसार नारदांनी त्याला भडकवले,म्हणाले "अरे भगवान शंकर तुला मुळीच भीत नाहीत, तू त्यांना त्राहिमाम् कर ,यातच तुझे खरे पौरूष आहे". झाले .....आता रक्तबीजाने नवीनच युक्ती केली. तो भगवान शंकरांना त्रास देण्यासाठी कैलासावर पार्वतीच्या रूपात जाऊन पोहोचला. भगवान शंकरांनी अंतर्ज्ञानाने त्याला ओळखले व क्रुद्ध होऊन त्याला शाप दिला की तू पार्वती रूपात येऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास, पार्वतीच्या कडूनच आता तुझा वध होईल. हे ऐकल्यावर रक्तबीजाने आपल्या अन्य राक्षस मित्रांच्या सह पार्वतीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पार्वतीने धारण केलेल्या काल रात्रीच्या उग्र रूपाच्या तेजाने राक्षस भस्म झाले. आता पार्वतीने विकराल रूप धारण केले. तिने या रक्तबीजाच्या रक्तातूनच जन्मलेल्या चंड मुंड यांचा वध केला. नंतर रक्तबीजाच्या रक्ताचा एकही थेंब जमीनीवर पडु न देता वरचेवर प्राशन करून त्याचाही वध केला. रक्तबीज वधा नंतर तिने शुंभ-निशुंभ यांचाही वध केला आणि संपूर्ण विश्वाला त्यांच्या जाचातून मुक्त केले.
भगवतीच्या चंडी रूप असलेल्या या कालरात्रीस आपण सर्व मिळून नतमस्तक होऊन प्रार्थना करूया.......
कुंडलिनी तू श्री जगदंबा शक्तिरूप शोभा ।
शिवशंभूच्या हृदयामधली प्राणज्योत अंबा ।
चैतन्याच्या चक्रवर्तीची तु समूर्त सम्राज्ञी ।
तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी ।।
तिने पुनश्च आमच्या ह्रदयात संचरुन देव, देश, धर्म आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या सध्याच्या उन्मत्त राक्षसांचा संहार करण्याची दिव्य स्फूर्ती व ऊर्जा आमच्यातून प्रकट करावी अशी प्रार्थना करून तिचा जय जय कार करुया.. जगदंब उदयोस्तु.......
अक्षर योगी संपर्क : 94 222 84 666 / 79 72 0 0 28 70