Navratri 2022: राष्ट्रसामर्थ्य जागृत ठेवायचे असेल तर ब्रह्मचारीणीच्या तपाच्या आदर्श ठेवायला हवा; कसा ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:50 AM2022-09-27T11:50:14+5:302022-09-27T11:51:08+5:30

Navratri 2022: तपाने तेज येते, आत्मशक्ती जागृत करण्यासाठी डोळ्यासमोर आदर्शही तसाच हवा, म्हणून देवीच्या या रूपाचे अवलोकन करूया!

Navratri 2022: If we want to keep the national power awake, we must keep the ideal of brahmacharini; See how! | Navratri 2022: राष्ट्रसामर्थ्य जागृत ठेवायचे असेल तर ब्रह्मचारीणीच्या तपाच्या आदर्श ठेवायला हवा; कसा ते बघा!

Navratri 2022: राष्ट्रसामर्थ्य जागृत ठेवायचे असेल तर ब्रह्मचारीणीच्या तपाच्या आदर्श ठेवायला हवा; कसा ते बघा!

googlenewsNext

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज अश्विन शुद्ध द्वितीया! भगवती श्री जगन्मातेच्या नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस किंवा दुसरी माळ!  श्री दुर्गा सप्तशती ग्रंथात सांगितलेल्या नवदुर्गां पैकी आज भगवतीचे "ब्रह्मचारिणी" या श्री विग्रहात आपण पूजन करणार आहोत.

ब्रह्मचारिणी : --  सज्जन हो आज भगवतीच्या "ब्रह्मचारिणी " या श्रीविग्रहाचे आपण दर्शन घेणार आहोत. भगवतीच्या जागरणाचा, शक्ती संपादनाचा आजचा हा दुसरा दिवस. भगवतीची या रूपात पूजा करताना मनुष्याने आजन्म विद्यार्थी राहिले पाहिजे याची सतत जाणीव करून देणारे हे ब्रह्मचारिणी स्वरूप आहे. ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी ज्ञान अथांग व अनंत आहे. जो ज्ञानोपासक आहे त्याला जगामध्ये काहीही अशक्य नाही . म्हणून तर कविवर्य कुसुमाग्रज म्हणाले.....
अनंत आमुची ध्येय्यसक्ती   
अनंत आमुची आशा
किनारा तुला पामराला ।। 

साधकाच्या जीवनात आशंकेचा /अज्ञानाचा अंध:कार निर्माण होणे हीच सगळ्यात मोठि समस्या असते. हा आशंकेचा किंवा अज्ञानाचा अंध:कार दूर करतात त्यांनाच तर सद्गुरु म्हणतात ना......!  

शंकया भक्षितं सर्वं त्रैलोक्यं स चराचरं ।
सा शंका येन भक्षिता: तस्मै श्री गुरवे नमः ।।

अशी श्री गुरूंची प्रशस्ती श्री गुरु गीतेत केलेली आहे. ब्रह्मचारिणी रूपात भगवती आपणास सततच्या ज्ञानलालसेचीच प्रेरणा देत आहे.

ब्रह्म म्हणजे साधकाचे ध्येय...... 
चारिणी म्हणजे आचारिणी....... ( आचार करणारी )
सतत आपल्या ध्येयाचे आचरण करतो तो ब्रह्मचारी .....! 

अशी साधी सरळ व अतिशय सुंदर व्याख्या आचार्य विनोबाजींनी सुद्धा ब्रह्मचारी या शब्दाची केलेली आहे. म्हणून ब्रह्मचारी किंवा ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ असा आहे," की गुरुगृही राहुन आपल्या इच्छित ध्येय्य प्राप्तीसाठी अनंत कष्ट करणाऱ्या साधकास ब्रह्मचारी किंवा " ब्रह्मचारिणी " असे म्हणतात. अशा प्रकारची ज्ञानसाधना व तप:साधना केल्यास त्या साधकास धन,वैभव, समृद्धी प्राप्त होईल हे वेगळे सांगावयास नको. ब्रह्मचारिणीचे हे दिव्य रूप साधकाला प्रेम, समर्पण भाव व अपारशक्तीची जाणीव करून देणारे आहे. जो सतत जागृत असतो व आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत राहतो त्यालाच साधक म्हणावे.    " जीन जागीँया तीन पाइयाँ " असे संत सांगतात. महान वैराग्य मूर्ती, संत श्रेष्ठ तुकोबाराय सुद्धा साधकाला सूचना देताना म्हणतात.......

तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश ।
नित्य नवा दिवस जागृतीचा ।।

हा नित्य नवा जागृतीचा दिवस अनुभवण्यासाठी साधकाला प्रति क्षण सजग व आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून आचरण करावे लागते. असा सतत आचार करणाऱ्या साधकाच्या जीवनात तो  " जाणिवेचा /जागृतीचा " क्षण आल्याशिवाय राहत नाही असा साधकांचा व सिद्धांचा अनुभव आहे. योगी अरविंद यांनी या ध्येयप्राप्तीच्या अलौकिक क्षणाला " Moment of realization " असे म्हटले आहे. म्हणून तर समर्थ रामदास म्हणतात, " साधकासी सूचना उपासना उपासना! " या उपासनेच्या माध्यमातूनच साधकाच्या जीवनामध्ये सिद्धीचा महन्मंगल " उषःकाल " होत असतो. म्हणून विद्यार्थी जीवनातील सतत ज्ञान मिळवण्याची पिपासा हीच आजच्या सर्व प्रकारच्या भौतिक व अध्यात्मिक सुखांची जननी आहे असे म्हणता येईल.   

अभिवादन शिलस्य नित्यं वृद्धोपि सेविना ।
चत्वारि वर्धते तस्य आयु: विद्या: यशो बलम् ।।

जो अभिवादनशील म्हणजे नम्र आहे व वृद्ध म्हणजे ज्ञानवृद्ध ,-- आपल्यापेक्षा अधिकाराने, ज्ञानाने व अनुभवाने संपन्न -- असलेल्यांच्या चरणांशी बसून नम्रतेने ज्ञानग्रहण करण्याची इच्छा ठेवतो अशा साधकाच्या जीवनामध्ये आयुष्य,विद्या, यश आणि बल या चार गोष्टी सतत वाढत राहतात असे आपल्या पूर्व सुरींचे सांगणे आहे.

Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

ब्रह्मचारिणी या रूपात पूर्वजन्मीच्या शिवपत्नी असलेल्या भगवतीने कठोर तपाचरण केले. तिचे हे तपाचरण अधिक शुद्ध ,जगत्कल्याणकारी व ध्येयाप्रती समर्पित व्हावे यासाठी देवर्षी नारदांनी तिला उपदेश केल्याचा उल्लेखही पुराणांमधून आपणास बघावयास मिळतो. शिवप्राप्तीसाठी तिने घोर तपश्चर्या केली म्हणून ती  "तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी"  होय. साधकाने या ब्रह्मचारिणी ची उपासना केल्यानंतर साधकाच्या दैनिक व्यवहारातून तप,त्याग, वैराग्य, सदाचार, संयम व नम्रता या गुणांची अभिवृद्धी झाल्याचे आपल्या लक्षात येते. या ब्रह्मचारिणी रूपात येण्यासाठी शिवकन्येने जी घोर तपश्चर्य केली त्यात तिने अनेक वर्ष "शय्यासन" म्हणजे जमिनीवरती झोपणे, नंतर फळं, फुलं ,नैसर्गिक शाक (भाजी ) खाऊन तप केल्याचा उल्लेख येतो. पुढे पुढे तर तिने झाडांची पानं सुद्धा खाणे सोडल्यामुळे तिला "अपर्णा " हे नामाभिधान प्राप्त झाले. तिच्या या कठोर ध्येयासक्ती पुढे व तपश्चर्ये पुढे नियतीला व निसर्गालाही झुकावे लागले. तत्कालिन सर्व देवता गण, सिद्ध,महात्मे, ऋषी मुनी, संत महात्मे तिच्यापुढे प्रकट झाले व त्यांनी तिला हे घोर तप त्यागण्यास सांगितले सांगितले. म्हणाले........ हे ब्रह्मचारिणी तुझ्या या घोर तपाची आता तू सांगता कर. तुझे आराध्य असलेले भगवान शिव तुला लवकरच प्राप्त होतील अशी शुभेच्छा व आशीर्वाद आम्ही सारे तुला देत आहोत. मग ब्रह्मचारिणीने आपले तप तिथे थांबविले. कठीण संघर्षात सुद्धा शांतचित्ताने, दृढ वृत्तीने व विचलित न होता ध्येयाच्या दिशेने कसा प्रवास करावा याचे उत्तम उदाहरण या ब्रह्मचारिणी रूपातुन भगवतीने साधकांच्या समोर प्रस्तुत केलेले आहे. 

या ब्रह्मचारिणीचा ध्यानमंत्र पुढीलप्रमाणे आहे.....
दधाना करपद्माभ्यां अक्षमाला कमंडलूम् ।
देवी प्रसिदतु मयी ब्रह्मचारिण्य नुत्तमा ।।

या भगवतीच्या उजव्या हाती अक्षमाला आणि डाव्या हाती कमंडलु आहे. अशा जपमाला व कमांडलू धारण केलेल्या हे भगवती ब्रह्मचारिणी तू आम्हावर प्रसन्न होऊन आम्हास ध्येयसिद्धीचा मार्ग दाखव अशी आपण तिच्याकडे प्रार्थना करू या.  खरे तर निसर्गाने सगळ्यांनाच "अक्षमाला " दिलेली आहे . अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यांची माला...!  आपले डोळे सतत फिरत असतात. पण आपण बघतो किती व निरीक्षण करतो किती याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येइल की आपण नुसतेच बघत असतो निरीक्षण किंवा नोंद करत नसतो. साधकाला सतत निरीक्षण केले पाहिजे व त्याच्या नोंदी ठेवल्या पाहिजे हा याचा अर्थ आहे.

माला तो करमे फिरे जीभ फिरे मुख माई ।
मनवा दस दिशा फिरे यह तो सुमिरण नाही ।।

असं संतश्रेष्ठ कबीर जी म्हणाले.  माळ ही तपश्चर्येचे प्रतीक आहे आणि कमांडलू हे कमीत कमी गरजांमध्ये जीवन आनंदात घालविण्याच्या साधनेचे प्रतीक आहे. म्हणून साधकाने व्यावहारीक लाभा कडे व ऐश आरामाकडे दुर्लक्ष करून साधक वृत्तीत राहून ज्ञान प्राप्ती करावी, हाच संदेश या ब्रह्मचारिणी रूपातून भगवतीने आम्हाला दिलेला आहे. 

 "  ओम देवी ब्रह्मचारिण्यै नमः " ।। हा या भगवतीचा बीज मंत्र आहे. अशी ही ज्ञान साधकांची स्फूर्तीदात्री भगवती ब्रह्मचारिणी तुम्हां आम्हां सर्वांवर कृपा करून सुप्रसन्न होवो हीच तिचे चरणी प्रार्थना.....! भारतीय अध्यात्म शास्त्राने मानवाला शंभर वर्षे पर्यंत चतुर्विध पुरुषार्थात्मक म्हणजेच (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ) जीवन पद्धतीत जगण्यास सांगितले आहे. किमान शंभर वर्ष जगायचे तेही कुणाहि समोर लाचार आणि दीन न होता, म्हणून आमच्या ऋग्वेदा ने 
शतं जीव शरदो वर्धमान: 
शतं हेमंतान् शतं उ वसंतान् ।
शतं इंद्रो अग्नी: सविता बृहस्पती:
शतायुषा हविषेमं पुनर्दु: ।।

अर्थ:-  अग्नी, चंद्र, सूर्य हे सर्व आमच्या स्तुतीने प्रसन्न होऊन आम्हास शंभर वर्ष आयुष्य देवोत. सतत वाढत्या यशाने युक्त अशा शंभर शरद,शंभर हेमंत आणि शंभर वसंत रुतूंपर्यंत आरोग्यसंपन्न जीवन आम्हास लाभो. " अदिन: जीवेत शरद शतं " अशीच जगन्नियंता कडे मागणी केली आहे. या चतुर्विध पुरुषार्थात्मक जीवन पद्धतीला अधिक सक्षम, लोकोपयोगी व व्यावहारिक बनवण्यासाठी शतकीय मानवी जीवनाचे चार भाग भारतीय अध्यात्मशास्त्र ने सांगितले आहेत. ज्यास आपण "आश्रम" असे म्हणतो. ते क्रमश: असे.........        
१) ब्रह्मचर्याश्रम     २)गृहस्थाश्रम  ३)वानप्रस्थाश्रम   ४)संन्यासाश्रम 
पैकी ब्रह्मचर्याश्रम म्हणजे साधकाने काया, वाचा, मनाने ब्रह्मचर्याचे पालन करणे. या ब्रह्मचर्याश्रमा मध्ये साधकाने तन बल, मनबल, आत्मबल, मंत्र बल आणि तंत्र बल  या पांच प्रकारच्या बलांची उपासना करणे अपेक्षित आहे.

ब्रह्मचर्याश्रम हा संपूर्ण शतक महोत्सवी,यशस्वी,तेजस्वी व अदीन( स्वाभिमानी व पौरुष पूर्ण )  मानवी जीवनाचा पाया असल्यामुळे या आश्रमात साधकाने शारीरिक, मानसिक, आत्मिक, मांत्रिक व तांत्रिक, बल संपादन, संगोपन व साठवण करणे अपेक्षित आहे. या आश्रमामध्ये मिळवलेले शक्ती, क्षमता, चैतन्य, ज्ञान, ऊर्जा, माधुर्य, तेजस्विता हे पुढील आश्रम यशस्वी करण्यासाठी व अर्थातच समाज व राष्ट्र जीवन समृद्ध करण्यासाठी वापरावयाचे असते. अशा प्रकारच्या शक्तीची उपासना करण्यासाठी शक्तीकेंद्र ध्यानात येणे व त्या शक्ती केंद्रापाशी असलेल्या शक्तीची उपासना व संपादन करणे ही त्याची पहिली पायरी ठरते.
आदिशक्ती परांबा भगवती ही साक्षात  "शक्ती स्वरूपा " असल्यामुळे साधकाने अपेक्षित शक्तीच्या प्राप्तीसाठी तिची आराधना करणे हे ओघानेच आले. तिच्या जवळून अशा प्रकारच्या विविध शक्ती प्राप्त करून आपल्या संकल्पित कार्यसिद्धीच्या मार्गात विघ्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या शत्रूंचा व बाधांचा नाश करून कार्य सिद्धीस नेणे हे साधकाचे अंतिम ध्येय असते.

भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेतल्यास वेळोवेळी विविध महापुरुषांनी आदिशक्ती भगवती कडे त्यांच्या कार्यसिद्धीसाठी अपेक्षित असलेल्या शक्तीची मागणी केल्याचे आपल्या लक्षात येईल. अगदी अद्वैत सिद्धांताचा दिंडीम पिटणाऱ्या पूज्य प्रभुपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सुद्धा

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर:प्राण वल्लभे ।
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षांदेही च पार्वती ।। 

अशी मागणी भगवती स्वरूपातल्या पार्वती मातेकडे केल्याचे  त्यांच्या चरित्रात आपणास पहावयास मिळते. अशा प्रकारच्या स्वार्थनिरपेक्ष व जगत कल्याणा ची कामना करणाऱ्या शक्तीची प्रसाद रुपात भगवती कडे मागणी करणे हे सर्वार्थाने योग्यच ठरते. गोदा तट नीवासी शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी आदिशक्ती जगदंबे कडे मागणे मागितले. भगवती कडे त्यांनी मागितलेले हे मागणे संत साहित्यात जोगवा म्हणून सुप्रसिद्ध आहे. जोगवा यात मूळ शब्द " योग " असा आहे, योग म्हणजे मीलन. म्हणजे  जीवाचे शिवाशी मीलन, भक्ताचे भगवतीशी मीलन, उपासकांचे शक्तीशी मिलन होईल अशी प्रार्थना!  तथापि श्रीनाथ माऊलींनी आपल्या व्यक्तिगत कल्याणा पेक्षाही समष्टीगत मोक्षाला अधिक महत्त्व दिले व आदिशक्ती जगन्मातेचे दार ठोठावले व आर्त स्वरात तिला साद घातली दार उघड बये दार उघड........संत श्रेष्ठ एकनाथांनी मागितलेले ते सुप्रसिद्ध मागणे असे........

नमो निर्गुण निराकार । मूळ आदिमाया तू साकार । 
घेऊनी दहा अवतार । करिसी दुष्टांचा संहार ।।
बये दार उघड बये दार उघड ।।
कलीचा प्रथम चरण । दैवते राहिली लपून ।
तिर्थे सांडीलि महिमान । अठरा वर्ण एक झाले।
म्लेंछे गांजले देवभक्तां । महिमा उच्छेदिला सर्वथा ।   
न चले जपतप तत्वता । एकरूप सर्व झाले ।।
बये दार उघड बये दार उघड
नमो आदिमाया भगवती । अनादि सिध्दमूळ प्रकृति ॥
महालक्ष्मी त्रीजगती । बये दार उघड, बये दार उघड ॥१॥
हरिहर तुझे ध्यान करिती । चंद्रसूर्य कानी तळपती ।
गगनी ते तारांगणे रुळती । तेवी भांगी भरिले मोती ॥
बये दार उघड बये दार उघड ॥२॥
नवखंड पृथ्वी तुझी चोळी । सप्तपाताळी पाऊले गेली ॥
एकवीस स्वर्ग मुगूटी झळाळी । बये दार उघड ॥३॥
जगदंबा प्रसन्न झाली । भक्‍तिकवाडे उघडली। 
शंख चंद्राकित शोभली। रुपसुंदरा सावळी ।।
कोटीचंद्र सूर्य प्रभा वेल्हाळी । एका जनार्दनी माऊली ।
करी कृपेची साउली । भक्‍त जनाकारणे संपूर्ण झाली ।।
बये दार उघड, बये दार उघड ॥४॥

आपल्या व्यक्तिगत उपासनेचे बळ श्रीनाथांनी महाराष्ट्र धर्म संरक्षणासाठी भगवती कडून मागून घेतले आणि त्यांनी लोककल्याणार्थ केलेल्या या प्रार्थनेचा जगन्मातेने स्वीकार केला. व त्यांना अपेक्षित असलेली महाराष्ट्र भाग्य भवानी अखंड वज्र चुडे मंडित, सकल सौभाग्य संपन्न श्री जिजाबाई साहेबांनी  शहाजी राजांच्या व्यक्तिगत संसारात व महाराष्ट्राच्या राजकीय प्रपंचात  " महाराष्ट्र भाग्य भवानी " म्हणून पदन्यास केला. कदाचित या घटनेच्या मंगल नांदीचंच वर्णन श्रीनाथ बाबांनी "अनादि निर्गुण प्रगटली भवानी " या आपल्या लोक प्रसिद्ध अप्रतिम जोगव्यात  केले असावे असे मला वाटते. राष्ट्रगुरु समर्थ रामदासांनी सुद्धा  राम वरदायिनी,चंड मुंड भंडासुरमर्दिनी, आदिशक्ती, तुळजाभवानी मातेकडे " तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासि देखता "  असे मागणे मागितल्याचा उल्लेख आपणास बघावयास मिळतो. 

राष्ट्र माता जिजाऊसाहेबांनी सुद्धा " अस्मानी व सुलतानी चा नाश करणारा व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे स्वप्न साकार करणारा एक तेजस्वी पुत्र माझ्या पोटी येऊ दे " असे शिवनेरीच्या शिवाईस साकडे घातल्याचा कागदोपत्री उल्लेख मिळतो. महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर, बाबासाहेब पुरंदरे यांच्या  " जाणता राजा " या महानाट्यामध्ये सुद्धा महाराणी जिजाई साहेब  भगवतीस मागणे मागताना म्हणतात.......

दे अंबिके, दे चण्डिके, दे शारदे, वरदान दे ।
मज अस्त्र दे, मज शस्त्र दे ,मज ज्ञान दे ,मज त्राण दे ।    
ऊन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे ।
निर्दालण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे ।
दे चण्डिके वरदान दे ,दे शारदे वरदान दे ।।

शिवराय कवी भूषणही आपल्या एका कवितेत शिवाजी महाराजांना विजय मिळावा यासाठी भवानीदेवी कडे पार्थना करतात.

जयति जयति जय आदिसकति जय काली कपद्दनी । 
जय जय मधुकैटभ छलनी देवी जय महिषहि मर्दनि । 
जय चमुंड जय चंड चंडमुंडासुर खंडनि । 
जय सुरक्त जय रक्तबीज बिड्डाल विहंडनि । 
जय जय निसुंभ शुंभ हलनि भूषन जयश भननि । 
सरजा समत्त्थ शिवराज कहि देहि विजय जय जगजनिनि ॥

अर्थात.......हे विजयिनी आदिशक्ती, कालिका भवानी, तुझा विजय असो. तू मधु आणि कैटभ या दैत्यांना छळणारी तसेच महिषासुराचा वध करणारी आहेस. हे चामुंडे, तू चंड आणि मुंड यांसारख्या पाखंडी दैत्यांचा नाश करणारी आहेस. तूच सुरक्त, रक्तबीज आणि बिडालास मारले आहेस. तुझा विजय असो. भूषणजी म्हणतात कि, तू निशुंभ आणि शुंभ दैत्यांचा नाश करणारी आहेस. तूच सरस्वतीचे रूप तसेच जय-जय शब्द म्हणणारी आहेस. हे जगन्माता, जगज्जननी सिंहासमान असणाऱ्या शक्तिशाली शिवाजी राजाला विजय प्रदान कर. तुझा विजय असो.

आज शक्ती जागरण उत्सवाच्या या दुसऱ्या माळेला आपण भगवती श्री ब्रह्मचारिणी मातेकडे देव, देश व धर्माचे संरक्षण करणारा आत्मबल संपन्न व पार्थ पराक्रमी समाज निर्माण करण्याची प्रेरणा असलेला राष्ट्र समर्पित निष्कलंक राष्ट्रनायक " नरेंद् " आम्हास वारंवार लाभो अशी भगवतिकडे प्रार्थना करूया व म्हणू या......आई राजा उदो उदो, बोला सदानंदीचा येळकोट.....आई राजा उदो उदो.......उदयोस्तु जगदंब उदयोस्तु........!

अक्षर योगी संपर्क : 94 222 84 666 /  79 72 0 0 28 70

Web Title: Navratri 2022: If we want to keep the national power awake, we must keep the ideal of brahmacharini; See how!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.