Navratri 2022 : 'या' नऊ दिवसांत देवीकडे नेमके काय मागितले तर ती निश्चितपणे देते, जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:04 AM2022-09-26T11:04:00+5:302022-09-26T11:04:24+5:30

Navratri 2022: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ. देवीची करुणा भाकण्याबरोबर आणखी कोणते वरदान तिच्याकडे या नऊ दिवसांत मागायला हवे, ते वाचा. 

Navratri 2022 : Let's find out what exactly is asked from the Goddess during 'these' nine days! | Navratri 2022 : 'या' नऊ दिवसांत देवीकडे नेमके काय मागितले तर ती निश्चितपणे देते, जाणून घेऊ!

Navratri 2022 : 'या' नऊ दिवसांत देवीकडे नेमके काय मागितले तर ती निश्चितपणे देते, जाणून घेऊ!

googlenewsNext

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्त्व टिकून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते. जगात तपश्चर्येला यश मिळते. ही गोष्ट सत्याच्या उपासकांनी विसरता कामा नये. तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत मूल्ये देखील विजयी झाली आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची अंधुक कल्पना देते. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार किंवा संस्कृती यांची कोणी पूजा करत नाही. 

आश्विन महिन्यात येणाऱ्या या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वत:च्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच देवांना व मनुष्यांना 'त्राहि माम्' करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व दैवी लोक भयग्रस्त झाले होते. 

Navratri 2022 : नवरात्रीत उपास केला नाहीत तरी 'ही' १० पथ्ये अवश्य पाळा!

धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णु, महेश यांची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवीशक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून ती सांभाळली, तिचे पूजन केली. तिला स्वत:च्या दिव्य आयुधांनी मंडित केली. या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवाला अभय दिले. ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा!

या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा. आजही महिषासुर प्रत्येकाच्या हृदयात स्वत:चे स्थान जमवून बसला आहे आणि आत असलेल्या दैवी वृत्तीना गुदमरवून सोडले आहे. या महिषासुराच्या मायेला ओळखले पाहिजे. तिच्या आसुरी जुलमापासून मुक्त होण्यासाठी आवश्यकता आहे दैवी शक्तीच्या आराधनेची. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस, तेच नवरात्रीचे दिवस!

आपली चुकीची समजूत आहे, असूर म्हणजे मोठ्या दाताचे, मोठ्या नखांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस! खरे पाहता असुर म्हणजे 'असुषु रमन्ते इति असुर:' प्राणातच रममाण होणारे, भोगातच रममाण होणारे! तसेच महिष म्हणजे रेडा. त्या दृष्टीने पाहता रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर. रेडा नेहमी स्वत:चेच सुख पाहतो. समाजात ही रेड्याची वृत्ती पसरत चालली आहे. परिणामत: संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहित व भावशून्य बनला आहे. समाजात आज व्यक्तिवाद व स्वार्थैकपरायणता अमर्याद बनून महिषासुर रूपात नाचत आहे. या महिषासुराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आईजवळ सामथ्र्य मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्राचे दिवस!

आपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिले आहे. महाभारताचे पानन् पान बलोपासना व शौर्यपूजा यांनी भरलेले आहे. व्यास, भीष्म व कृष्ण यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, पौरुष व पराक्रम यांनी भरलेली आहेत. महर्षी व्यासांनी पांडवांना शक्ती उपासनेचे महत्त्व समजावले आहे. त्यांनी पांडवांना उपदेश केला की, तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर हात जोडून, बसून चालणार नाही. शक्तीची उपासना करावी लागेल. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी व्यासांनी स्वर्गात जाण्याची सूचना केली होती. 

अनादि कालापासून आसुरीवृत्ती सद्विचार, दैवी विचारावर मात करत आलेली आहे आणि दैवी विचार अडचणीत येताच देवांनी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे. सामर्थ्य मागितले आहे आणि आसुरीवृत्तीचा पराभव केला आहे. केवळ सद्विचार आहेत तेवढे पुरत नाहीत. त्यांचे रक्षण होणेदेखील आवश्यक आहे. आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. 

आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे. `संघे शक्ति: कलौ युगे' ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांची  संघटना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संघटनेत प्रामुख्याने जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच आपल्यात शक्ती प्रगट होईल हे सुचवण्यासाठी नवरात्राच्या दिवसात गरबा किंवा रास यांच्या रूपात देवीच्या भोवती फिरायचे असते. देवीच्या सभोवती फिरता फिरता सांगितले पाहिजे की, `माते, तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे. आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार येतो, आमची महिषवृत्ती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात, त्यांना तू खाऊन टाक.'

Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या!

आई जगदंबेची आपली ही उपासना नवरात्रात सुरू होते. पण ती केवळ नऊ दिवसांपुरती सीमित राहू नये, हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायची शक्ती प्रदान करील. 

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. आईच्या पूजेचे दिवस. 'खा, प्या, मजा करा' अशा आसुरी विचारश्रेणीवर विजय मिळवण्याचा दिवस. संघशक्तीचे महत्त्व व भक्तीची महत्ता समजवण्याचे दिवस. तसेच तपश्चर्येचा महिमा व एकता यांचे महत्त्व समजवणारे दिवस. या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भरून टाका!

जगदंब उदयोऽस्तु!

Web Title: Navratri 2022 : Let's find out what exactly is asked from the Goddess during 'these' nine days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.