Navratri 2022: आपण देवीचाच अंश आहोत याची जाणीव करून देणारी अष्टमीची महागौरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 04:35 PM2022-10-03T16:35:16+5:302022-10-03T16:35:39+5:30

Navratri 2022: देवी महागौरीच्या ठायी असलेल्या दहा विद्या आणि दहा रुद्रावतार यांचा परिचय करून घेऊ!

Navratri 2022: Mahagauri of Ashtami makes us realize that we are a part of Goddess! | Navratri 2022: आपण देवीचाच अंश आहोत याची जाणीव करून देणारी अष्टमीची महागौरी!

Navratri 2022: आपण देवीचाच अंश आहोत याची जाणीव करून देणारी अष्टमीची महागौरी!

googlenewsNext

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज अश्विन शुद्ध अष्टमी, म्हणजे नवरात्रातली आठवी माळ! आज नवरात्रातील  "महाअष्टमी "असल्याने आपण भगवतीच्या "महागौरी" या आठव्या श्रीविग्रहाचे अक्षर पूजन व चिंतन करणार आहोत.

श्वेते व्रुषे समारुढा श्वेतांबर धरा शुची:।
महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोद दा।।

मार्कंडेय पुराणानुसार कैलासात निवास करणारी वृषभावर आरूढ असलेली, सर्व ग्रहांवर सत्ता असलेली, चार हात असलेली, पैकी उजव्या वरच्या हाती त्रिशूल, खालच्या हाताने भक्तांना अभय, डाव्या बाजूच्या वरचा हात भक्तांना वर देण्यासाठी, आणि खालच्या हाती डमरू धारण केलेला आहे. श्वेत वस्त्र परिधान केलेल्या  भगवतीचा गौरवर्ण शंख, चंद्र व कुंदाच्या कळी सारखा उज्वलगौर असल्याने हिला "महागौरी" असे म्हटले आहे. हिचे स्वरूप अष्ट वर्षीय कुमारिकेचे आहे, "अष्ट वर्षा भवेत गौरी" असे म्हटलेच आहे. हिने सर्व पांढरी वस्त्र परिधान केलेली असून हिची आभूषणेही पांढर्या वर्णाची आहेत.अतिशय प्रशांत मुद्रा असलेली ही भगवती पार्वतीचे एक स्वरूप आहे. भगवान शिवांना पति रुपात प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने ऊग्र तपश्चर्या केली. या उग्र तपश्चर्येने तिचे शरीर काळे पडले. भगवान शिव तिला प्रसन्न झाले, त्यांनी तिला पुण्यसलिला त्रिलोक पावनी गंगे मध्ये स्नान घातले. गंगेत स्नान केल्याने ही विद्युत समान तेज:पुंज कांतीयुक्त झाली. अतिशय तेजस्वी श्वेत वर्ण तिला प्राप्त झाल्यामुळेही तिला "महागौरी" असे नामाभिधान पडले. ही अतिशय करुणामयी व स्नेहमयी शांत आणि मृदुल स्वभावाची आहे. सर्व ऋषींनी एकत्र येऊन हिची प्रार्थना केली...

सर्व मंगल मांगल्यै शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

एका कथेनुसार देवी उमा, भगवान शंकरांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपात मग्न होत्या. त्याच वेळी भुकेने व्याकूळ झालेला एक सिंह तिथे आला. भगवतीचे स्वरूप बघीतल्यानंतर तो तिच्या समाधी भंगाची वाट बघत तिथेच थांबला. बराच वेळ माता भगवती व तो सिंह हे दोघेही अशाच पद्धतीने तेथे बसल्यामुळे, तो सिंह भुकेने अशक्त झाला. समाधी संपल्यानंतर उमेने त्याच्याकडे बघितल्यावर तिलाही सगळे वर्तमान कळले.तिने त्याच्यावर कृपा करून त्या सिंहासही आपले वाहन म्हणून स्वीकारले. म्हणून काही ठिकाणी बैलाबरोबर ही सिंह वहिनी सुध्दा आहे असेही वर्णन मिळते. या महा गौरीचे पूजन, वंदन, स्मरण आणि आराधना हे भक्तांसाठी सर्व कल्याणकारी आहे. हिच्या उपासनेतून साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात, साधकाचे सर्व कष्ट दूर करण्याचे सामर्थ्य हिच्या कृपा कटाक्षात आहे. हिच्या पूजनाने सर्व नवदुर्गाही प्रसन्न होतात. मानवी मनाला सत् प्रवृत्तीकडे प्रेरित करून असत् चा नाश करण्याचे शाश्वत कार्य ही महागौरी करीत असते. नवदुर्गा व दशमहाविद्या हे हिचे स्वरूप असून हिच्याच अंशाने त्या उत्पन्न झालेल्या आहेत. अशा या भगवती महागौरीस रातराणीची फुले विशेष प्रिय आहेत.

★ श्रीदशमहाविद्या :--श्रीमद् देवी भागवत व श्रीमद्भागवत पुराणानुसार शिव व शक्ती यांच्या पासूनच त्या दशमहाविद्या निर्माण झाल्या.दक्ष प्रजापतीने सुरु केलेल्या यज्ञात आपणही जावे म्हणून सतीने शिवांकडे आग्रह धरला, शिवांची इच्छा नसताना सुद्धा सती शिवा सह त्या यज्ञात आले. दक्षाने शिवांचा अपमान केला, तो अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी मारून आपला अवतार संपवला. तिचे हे उग्र रूप बघून भगवान शिव तातडीने यज्ञमंडप सोडून बाहेर निघाले आपल्या पतीला अडवण्यासाठी या सतीने वेगवेगळी रूपे घेऊन प्रत्येक दिशेला उपस्थित होऊन शिवांना अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व दहा रूपांनाच "दशमहाविद्या" असे म्हणतात. खरे म्हणजे "एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति "या न्यायाने एकाच सत्याकडे विविध पद्धतीने बघण्याच्या या विशिष्ट विद्या आहेत असेच म्हणावे लागेल.

★ दशमहारुद्रावतार : --  दशमहाविद्यांच्या बरोबरच दर्शमहा रुद्रावतारही निर्माण झाले असेही ग्रंथात वर्णन आहे. तंत्र मंत्र व सिद्धी प्राप्तीच्या संबंधित साधनेमध्ये या दशमहाविद्या व दशमहा रुद्रावतार यांचा मोठा प्रभाव व जवळचा संबंध असल्याचे लक्षात येते. ब्रम्हांडास ऊर्जा प्रदान करण्याची व देवी-देवतांना शक्ती प्रदान करण्याची यात क्षमता आहे. शिव सुद्धा या दशमहाविद्या नामक शक्ती विना शवरूप होतात अशी मान्यता आहे. शिव व शक्ती या विषयी शास्त्र ग्रंथ आणि पुराणात खूपच चर्चा आलेली आहे. या दशमहाविद्या व दशमहा रुद्रावतार या विषयी आपण काही थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
या दशमहाविद्या व दशमहा रुद्रावतार क्रमशः पुढील प्रमाणे आहेत.......

१)महा कालिका :-- परब्रह्माचे परम रुप असलेली ही दशमहाविद्या पैकी प्रथम महाविद्या महाकालिका आहे. ही काल भक्षक असल्याने तिला महाकालिका असे म्हटले आहे. ही तीन नेत्रा असुन भूत, वर्तमान व भविष्याचे प्रातिनिधिक स्वरूपात अवलोकन करणारी आहे. तिने केस मोकळे सोडले असून तिने गळ्यामध्ये नरमुंड माला धारण केलेल्या आहेत. ही चतुर्भुज म्हणजे चार हातांची असून तिचे दोन्ही हात रिक्त असून एका हातात तलवार आणि एका हातात कापलेले दानवांचे मस्तक आहे. 

★ श्री महांकालेश्वर :-- दशमहारुद्र अवतारातील हे प्रथम रुद्र आहेत. हे शाम वर्ण म्हणजे काळसर निळे असून हे काळांचे ही काल असल्यामुळे यांना "महांकाल" असे म्हटलेले आहे. यांची अवतार किंवा अल्हादिनी शक्ती महाविद्या महाकाली असून, उज्जैनी तीर्थात गढकालिका उपखंडात या महाकालीके चे शक्तीपीठ आहे. या महाकालीकेचे मुळ शक्ती पीठ पश्चिम बंगालातील कलकत्ता येथे आहे.

२) तारा:--  दशमहा विज्ञां पैकी तारा हे द्वितीय रूप होय. ही साधकांची मार्गदर्शक व रक्षक अशी शक्ती आहे. हिच्या उपासनेने साधकांना मोक्षप्राप्ती होते. सूर्यास सुध्दा ऊर्जा देण्याइतकी ही ऊर्जावान असून ती निळ्या रंगाची असून तिनेही आपले केस मोकळे सोडले आहेत. ही तीन डोळ्यांची असून, तिने आपल्या गळ्यामध्ये साप धारण केलेला आहे. कमरेला व्याघ्रचर्म परिधान केलेले आहे. ही चतुर्भूज म्हणजे चार हातांची असून, एका हातात कमळ, एका हातात कृपाण, एका हातात कवटी व एका हातामध्ये कात्री आहे. हिने आपला डावा पाय भगवान शिवां च्या शवावर ठेवला आहे असेही काही ठिकाणी वर्णन आहे. या तारा नामक दशमहाविद्ये चे महारुद्र म्हणून श्री तारकेश्वर यांचा उल्लेख आहे.

★ तारकेश्वर: -- दशमहा रुद्रावतारां पैकी हे द्वितीय महा रुद्रावतार आहेत. तारेचा ईश्वर म्हणून तारकेश्वर ....! ताऱ्यासारख्या निळसर पिवळ्या रंगाची यांची कांती असून यांची आल्हादिनी शक्ती महाविद्या शक्ती तारादेवी ही आहे. या महाविद्या तारा देवीचे तारापीठ पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यात द्वारका नदीच्या किनारी महा स्मशानात आहे असे सांगितले जाते.

३) त्रिपुरसुंदरी :--  दशमहाविद्या पैकी त्रिपुरसुंदरी हे महाविद्या चे तृतीय रूप आहे. ती त्रिलोक सुंदरी असल्यामुळे तिला "त्रिपुरसुंदरी" असे नाव पडले आहे . याचबरोबर हिला षोडशी आणि ललिता या नावांनीही ओळखले जाते. शिवाय काही ठिकाणी हिचा उल्लेख "तांत्रिक पार्वती" असाही आहे. हिलाच "मोक्ष मुक्ता" असेही म्हटलेले आहे.मणीद्विपा मध्ये राहणाऱ्या दश महाविद्यातिल ही प्रमुख महाविद्या आहे. ही त्रिनेत्रा असून तिचे डोळे विलक्षण शांत असे आहेत. लाल गुलाबी वस्त्र हिने परिधान केले असून ती चतुर्भुजा म्हणजेच चार हातांची आहे. तिच्या एका हातात बकरा, एका हातात फांस, एका हातात धनुष्य,आणि एका हातात तीर आहे. काही ठिकाणी ही सिंहासनाधिष्ठित असल्याचेही वर्णन आहे.

★ षोडशेश्वर :-- दशमहा रुद्रावतारातील हा चौथा रुद्रावतार .सोळा कलांनी युक्त असल्यामुळे व या अवताराची महाविद्या श्री षोडशी असल्यामुळे या रुद्रावतारास षोडशेश्वर रुद्रावतार असे म्हणतात.

४) भुवनेश्वरी :-- दशमहाविद्यां पैकी ही चतुर्थ क्रमांकाची महाविद्या आहे. भुवनाची ईश्वरी म्हणुन हिचे नाव भुवनेश्वरी असे झाले. विश्व माता म्हणजेच जगजननी रूपा असे हिचे स्वरूप आहे. म्हणून तिला भुवनेश्वरी असे म्हटले आहे. संपूर्ण ब्रह्मांडच जणू हिचे शरीर असल्यामुळे ती अखिल भुवनेश्वरी आहे. ही त्रिनेत्रा म्हणजे तीन डोळे असलेली असून, तिने लाल पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. ही चतुर्भुज म्हणजे चार हातांची असून हिचे दोन हात मोकळे म्हणजे रिक्त आहेत आणि दोन्ही  हातात फांस किंवा फंदा तिने धारण केलेला आहे.

★ भुवनेश्वर :-- दशमहा रुद्रावतारांपैकी भुवनेश्वर हा चतुर्थ रुद्रावतार आहे. काही ठिकाणी यास "बाल भुवनेश" असेही म्हटलेले आहे. अतिशय शितल स्वरूप असलेले हे भुवनेश्वर श्वेतवर्णीय असून यांची अल्हादिनी शक्ती बाला भुवनेश्वरी म्हणजेच महाविद्या श्री भुवनेश्वरी आहे. या महाविद्या श्री भुवनेश्वरी चे मुळ शक्ती पीठ उत्तराखंडामध्ये आपणास बघावयास मिळते.

५)भैरवी :-- दशमहाविद्यां पैकी भैरवाचे स्त्री रूप असलेली, उग्र भयंकर स्वरूप असलेली, ही पाचव्या क्रमांकाची दशमहाविद्या आहे. हिचा रंग ज्वालामुखी सारखा तप्त लाल असून हिने आपले केस मोकळे सोडलेले आहेत. हिला अतिशय उग्र असे तीन डोळे असून तिच्या मस्तकावर अर्धचंद्र विराजित आहे. हिने लाल वस्त्र परिधान केले असून,कवड्याची माळा सुद्धा परिधान केलेली आहे. हि चतुर्भुजा म्हणजेच चार हातांची असून हिचे दोन हात रिक्त असून, एका हातात ग्रंथ व दुसऱ्या हातात माला असे हिचे स्वरूप आहे. या महाविद्या भैरवीचे महा रुद्रावतार म्हणून श्री भैरवनाथ रुद्रावतार यास पूजले जाते.

★ भैरवनाथ :--  महारुद्रावतारांपैकी पाचवा रुद्रावतार म्हणून भैरवनाथ रुद्रावतारांकडे पाहिले जाते. भैरवनाथ हे तामसिक देव असून यांचे एकूण 52 श्री विग्रह आपणास बघावयास मिळतात. हे दशदिशांचे रक्षक असून यांची अल्हादिनी शक्ती महाविद्या भैरवी  आहे.काही ठिकाणी हिलाच त्रिपुर भैरवी किंवा गिरीजा भैरवी असेही म्हणतात. उज्जैन जवळ क्षिप्रानदी काठी भैरव पर्वतावर हिचे मूळपीठ आपणास बघावयास मिळते.

६)छिंन्नमस्ता :-- दशमहाविद्यां पैकी छिंन्नमस्ता हे सहावे स्वरूप आहे. ही मस्तकविहिन असल्यामुळे हिला छिंन्नमस्ता असे म्हटलेले आहे. तिचे स्वरूप अतिशय उग्र आणि भयानक असून ते लाल रंगाचे आहे. तिने आपले केस विस्कळीत व पिंजारलेले ठेवले असून , हिला दोन हात आहेत. एका हातात तलवार व दुसऱ्या हातात स्वतःचेच कापलेले शीर तिने धारण केलेले आहे. हिला तीन उग्र डोळे असून ते अतिशय जळजळीत असे आहेत. हिने कवट्यांची माला परिधान केली असून ही रती काम देवाच्या पाठीवर स्वार झाली आहे असे वर्णन आहे. या छिंन्नमस्ता दशमहाविद्या चे महारुद्र अवतार म्हणून श्री दमोदरश्वर यांचे पूजन केले जाते.

★ दमोदेश्वर :-- दशमहा रुद्रावतार यांपैकी सहावा रुद्रावतार म्हणून श्री दमोदेश्वर यांचा उल्लेख येतो. यांची आल्हादिनी शक्ती श्री छिंन्नमस्ता असून प्रख्यात दामोदर -भैरवी नदीच्या संगमावर आहे हे शक्तीपीठ आहे.यालाच माता चिंतपूर्णी मंदिर असेही म्हणतात. दामोदर हे शिवस्वरूप असून भैरवी ही शक्ती स्वरूपात ओळखली जाते.

७) धूमावती :-- दशमहाविद्यां पैकी धूमावती ही आठव्या क्रमांकाची महाविद्या आहे. धुम्रमय, धुरातून प्रकटणारी, धुरकट रंग असलेली, असे तिचे स्वरूप असल्यामुळे हिला धुमावती असे म्हणतात. हिची त्वचा अतिशय सुरकुतलेलली असून ,तोंड ओढलेले आहे. काही दात पडलेले असून हिचे केस लांब व विस्कळित असे आहेत. तिच्या मुखावर अतिशय भयानक भाव आहेत. त्यात क्रोध, दुःख, भय, थकवा, बेचैनी, हपापलेपणा व अतृप्तीचे संमिश्रण आपणास बघावयास मिळते. हिने विधवे प्रमाणे श्वेत वस्त्र परिधान केलेले आहे. घोडा नसलेला रथ हे हिचे वाहन आहे. हिच्या रथाच्या शीर्षस्थानी कावळा बसलेला आहे. थरथरणार्या दोन पैकी एका हाताने ती वरदान देते आहे, ज्ञान देते आहे, आणि तिच्या दुसरा हातात पीडा दायक परडी तिने धारण केलेली आहे. या धूमावती मातेचे महा रुद्रेश्वर म्हणून धुमेश्वर भगवान यांना पूजले जाते.

★ धूमेश्वर :-- दशमहा रुद्रावतार यांपैकी धूमेश्वर हा सातवा रुद्रावतार आहे. यांचा वर्ण धूम्रवर्ण म्हणजे धूसर असून स्वरूपही तसेच आहे. दशमहाविद्यां पैकी धूमावती माता यांची आल्हादिनी शक्ती आहे. यांचे संपूर्ण भारतात एक मात्र मंदिर मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ श्री पितांबरी पिठाच्या प्रांगणात आपणास बघावयास मिळते.

८) बगलामुखी :-- दशमहाविद्यां पैकी बगलामुखी हे महाविद्या चे आठवे रूप आहे. ही शत्रु नाश करणारी असून ही तीन नेत्र असलेली आहे. हिचे अतिशय चमकदार हिरवट काळ्या रंगाचे घनदाट केस असून हिने पिवळे वस्त्र व पिवळे अलंकार धारण केलेले आहेत.  हीला दोन हात असून तिच्या एका हातामध्ये गदा असून दुसर्‍या हातात मदनासुर नावाच्या राक्षसाचे मुंडके जिभेला धरुन तिने ठेवलेले आहे. सारस पक्षी हे हिचे वाहन आहे. या बगलामुखी महाविद्ये चे रुद्रावतार म्हणून श्री बगलेश्वर महादेवांचे पूजन केले जाते.

★ बगलेश्वर :-- दशमहा रुद्रां पैकी हा आठवा रुद्रावतार असुन, यांचे स्वरूप पिवळ्या रंगाचे असून महाविद्या शक्ती बगलामुखी ही यांची आल्हादिनी शक्ती आहे. यांचे मुख्य पीठ हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्यामध्ये आहे.

९) मातंगी :-- दशमहाविद्यां पैकी मातंगी हे  नववे स्वरूप आहे .  पाचु सारख्या हिरव्या रंगाची,आकर्षक मोकळे काळेभोर केस, तीन शांत डोळे, चेहऱ्यावर विलक्षण शांती, नाजूक शरीर, भरपूर दागिने परिधान केलेले, लाल वस्त्र परिधान केलेले, सिंहासनी आरूढ झालेली, चार हातांची, एका हातात तलवार, एका हातात कवटी, एका हातात वीणा आणि एक हात वर मुद्रेचा असा आहे. या मातंगी महाविद्येचे महारुद्र अवतार म्हणून मतंगेश्वर यांचे पूजन केले जाते.

★  मतंगेश्वर  :-- दशमहा रुद्रावतारांपैकी मतंगेश्वर हा नववा रुद्रावतार आहे. यांचा रंग पाचू सारखा हिरवा असून, महादेवी शक्ती मातंगी ही यांची आल्हादिनी शक्ती आहे. "उच्छिष्ट चंडालिनी"या रुपात सुद्धा तिची पूजा केली जाते. हिचे एक मात्र मंदिर मध्य प्रदेशातील झाबुआ शहरामध्ये आहे. ही ब्राह्मणांची कुलदेवी असल्याचे सांगितले जाते.

१०) कमला :-- दशमहाविद्यां पैकी कमला ही दहाव्या क्रमांकाची महाविद्या आहे. भरगच्च  घनदाट काळे केस, तीन तेजस्वी शांत डोळे, चेहऱ्यावर पुरेपूर औदार्य, सोनेरी वस्त्र व दागिन्यांनी ही सालंकृत झालेली आहे. कमल फुलांचे हारे तिने परिधान केले असून ही पूर्ण विकसित कमलावर विराजमान झालेली आहे .दोन्ही हातामध्ये तिने कमळ घेतले असून एक हात अभय मुद्रेचा व दुसरा हात तिचा वर मुद्रेचा आहे. या कमला महा शक्तीचे महा रुद्रेश्वर म्हणून कमलेश्वर महादेव यांची पूजन केले जाते.

★ कमलेश्वर:-- दशमहारुद्र अवतारांपैकी हे दहावे रुद्र असुन यांचे स्वरूप पूर्ण विकसित अष्टदल कमलाप्रमाणे आहे. 64 कलांनी युक्त असे याचे स्वरूप आहे. यांची अल्हादिनी महाविद्या म्हणून कमला कार्यरत असते.

भगवतीच्या या दशमहाविद्या स्वरूपाला व दशमहा रुद्रावतारांना समजून घेतल्यानंतर आपणही याच भगवतीचे अंश असल्याची प्रखर जाणीव अंतरी ठेवून तिने केलेले असुर निखंदनाचे कार्य अल्पांशाने का होईना करण्यासाठी आपण सिद्ध होऊया. व श्रद्धेने तिचा जय जय कार करु या व म्हणू या.......उदयोस्तु जगदंबे उदयोस्तु ...

अक्षर योगी संपर्क : 94 222 84 666 /  79 72 0 0 28 70

Web Title: Navratri 2022: Mahagauri of Ashtami makes us realize that we are a part of Goddess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.