Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 05:29 PM2022-09-24T17:29:35+5:302022-09-24T17:29:57+5:30

Navaratri 2022: घटस्थापना करायची आहे पण त्याची विधीवत माहिती नाही म्हणून अडून राहू नका, वाचा अथ पासून इति पर्यंत सविस्तर माहिती. 

Navratri 2022 : Scientific information on how to do Ghatasthapana and how to make it complete! | Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

googlenewsNext

आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होते. यंदा २६ सप्टेंबर रोजी नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते, परंतु शास्त्रशुद्ध पद्धत माहित नसते. चला तर जाणून घेऊया घटस्थापनेचा आणि नवरात्री उत्थापनाचा शास्त्रशुद्ध विधी!

घटस्थापना विधी : 

घट बसतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा. अभिषेक करावा नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान ताम्हन ठेवावे. त्यात देवीचा टाक ठेवावा. 

Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

हळद-कुंकू गंध, फुल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरावेत. असे दोन तीन वेळा करावे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करावी. 

यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडुच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत, तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी. 

शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथीवाचन करावे.

नवरात्र उत्थापन  विधी : 

रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते.

नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी. नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी. टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा. धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी. 

जेवणाचा नैवेद्य दाखवून, पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी. पुरणाचे दिवे नऊ, पाच, सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा. सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी, मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा. पुरणाची आरती करावी.

Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या!

कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे. दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे. 

जगदंब उदयोस्तु...!

Web Title: Navratri 2022 : Scientific information on how to do Ghatasthapana and how to make it complete!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.