Navratri 2022: स्कंदमाता मोक्षदायिनी म्हणून का ओळखली जाते? तिची उपासना कोणत्याप्रकारे करावी? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:28 PM2022-09-30T12:28:26+5:302022-09-30T12:28:44+5:30

Navratri 2022: एकाग्रचित्त पवित्र अंतकरणाने देवीची उपासना केल्यास ही साधकास भवसागर पार करविते व मोक्ष पदापर्यंत पोहोचविते.,अशी मान्यता आहे. 

Navratri 2022: Why is Skandamata known as Mokshadayini? How should she be worshipped? read... | Navratri 2022: स्कंदमाता मोक्षदायिनी म्हणून का ओळखली जाते? तिची उपासना कोणत्याप्रकारे करावी? वाचा... 

Navratri 2022: स्कंदमाता मोक्षदायिनी म्हणून का ओळखली जाते? तिची उपासना कोणत्याप्रकारे करावी? वाचा... 

Next

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज अश्विन शुद्ध पंचमी... तिलाच आपण ललिता पंचमी म्हणतो. आज भगवती स्कंद मातेचे आवाहन, पूजनाचा दिवस!  आज नवरात्राची पाचवी माळ आहे. आज आपण भगवती च्या " स्कंदमाता " या श्री विग्रहाचे चिंतन व अक्षरपूजा करणार आहोत.

भगवतीचे स्कन्दमाता हे नाव " मातृत्व सूचक " असून मांगल्य वर्धकही आहे. भगवतीच्या या श्री विग्रहाच्या अविर्भावाची एक सुंदर कथा श्री देवी भागवत श्री  स्कंदपुराणात आपणास बघावयास मिळते. सती अवतारामध्ये भगवान शंकरापासून  दूरावलेल्या व पुढे पर्वतराज हिमालय कन्या म्हणून जन्मास आलेल्या भगवती जगन्माता पार्वती व आदिनाथ भगवान चंद्रमौलेश्वर शंकर यांचे ज्येष्ठ अपत्य म्हणजे भगवान कार्तिकेय.......म्हणजेच भगवान स्कंद....! या स्कंदाची माता म्हणून भगवतीच्या या श्री  विग्रहास  " स्कंदमाता " असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. या विग्रहात देखील भगवती स्कंदमातेचे वाहन सिंह असून, ती चतुर्भुज म्हणजे चार हात असलेली आहे. तिच्या दोन्ही हातात कमलपुष्प असुन एक हात वर प्रदान करणारा आणि एका हातामध्ये शर म्हणजे बाण तिने धारण केला आहे. एका हाताने तिने आपल्या मांडीवर बाल स्कंदाला सुद्धा घेतले आहे. अशा या स्कंद मातेचे ध्यान केल्यास साधकास निश्चित पणाने मोक्षप्राप्ती होते म्हणून हिला "मोक्ष प्रदायीनी" असेही  म्हणतात. ती कमळात बसलेली असल्यामुळे तिला पद्मासना असे हि नामाभिधान प्राप्त झालेले आहे. सर्व कामना पूर्ती करून देणारी अशी हिची उपासना आहे. हिच्या उपासने बरोबरच साधकाला बालस्कंदाच्या उपासनेचा आनंद आणि पुण्यही प्राप्त होते. एकाग्रचित्त पवित्र अंतकरणाने हिची उपासना केल्यास ही साधकास भवसागर पार करविते व मोक्ष पदापर्यंत पोहोचविते.,अशी मान्यता आहे.

आदिनाथ भगवान शिव हे परमात्मा श्रीरामचंद्रांच्या ध्यानात व समाधीमध्ये नित्य लीन असल्यामुळे, त्यांना पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी पर्वतराज हिमालय कन्या पार्वती ने कठोर उपासना केली. या उपासनेमध्ये ती अपर्णा सुद्धा झाली. एकीकडे तिचे हे कठोर तप सुरु होते  तर दुसरीकडे सर्व देवदेवता व देवर्षी नारद यांनी संगनमताने एक योजना आखली. या योजनेनुसार आदिनाथ सिद्ध योगेश्वर श्री भगवान शंकराची समाधी भंग करून त्यांचा भगवती पार्वतीशी विवाह करावयाचा. यासाठी रति व कामदेव यांची मदत घेण्यात आली. कामदेवाच्या चेष्ठां मुळे भगवान शंकरांची समाधी भंग पावली. त्यांनी क्रुद्ध होत कामदेवाला भस्म करून टाकले. यामुळे त्यांना "मदनारी" असे विशेष नामाभिधान प्राप्त झाले. पुढे भगवान शिव व आदी माता पार्वती यांचा परिणय सोहळा पार पडला. पण अशा प्रकारचा परिणय सोहळा घडवून आणण्याचे कारण काय घडले? 

वज्रांग नामक दैत्य व त्याची पत्नी तारा यांच्या पोटी जन्माला आलेल्या अतिशय बलशाली व पराक्रमी पुत्राचे नाव तारकासूर असे होते. भगवान ब्रह्मदेवांची उग्र उपासना व तप करून त्याने त्यांस प्रसन्न करून घेतले व त्यांचे कडून दोन वर मिळविले. 
१) माझ्याहून अधिक बलवान त्रिखंडात कुणीही असता कामा नये.
२)भगवान शंकरांच्या शुक्रातुन (बिंदु वंशातुन )जन्मलेल्या व्यक्तीकडूनच माझा वध व्हावा. अन्य कुणाकडून ही नाही.
असा वर मागण्याचे कारण म्हणजे या वेळेपर्यंत भगवान शिव एकटेच होते व अविवाहित होते आणि ते कायम समाधीत निमग्न असत. शिव कायम समाधीत लीन असल्यामुळे आता आपण अमर झालो या कल्पनेनेच तारकासुर माजला व त्याने जगाला त्राही भगवान करून सोडले. या तारकासुराच्या वधासाठी भगवान शंकरांचा पार्वतीशी परिणय करण्यात आला. या शिवशक्ती संयोगातून भगवान कार्तिकेय म्हणजेच भगवान स्कंद यांचा भगवतीचे पोटी जन्म झाला.  म्हणून भगवतीला " स्कन्दमाता "हे नामाभिधान या वेळेपासून प्राप्त झाले. पुढे हेच कार्तिकेय देवतांच्या सैन्याचे सेनापती बनले व त्यांचे तारकासुराशी भीषण युद्ध झाले,या युद्धामध्ये तारकासुराचा त्यांनी वध केला.

स्कंद :--  भगवती जगन्माता पार्वती व आदिनाथ भगवान शिव यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री स्कंद......बालपणापासून कृतिकांनी त्याचे संगोपन केले म्हणून त्यांचे नाव "कार्तिकेय" असे झाले. याशिवाय त्यांना दक्षिणेत " मुरगन " या नावानेही ओळखले जाते. श्री शिव पुराणानुसार कार्तिकेय हे ब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांना "कुमार" असेही म्हणतात. तर स्कंद व ब्रह्मवैवर्त पुराणानुसार ते विवाहित असून त्यांना दोन पत्नी आहेत एकीचे नाव देवसेना व दुसरीचे नाव वल्ली असे आहे. या कार्तिकेयांनी पुढे आपल्या अतुल पराक्रमाने तारकासुराचा भीषण रणसंग्रामात वध केल्यामुळे त्यांना " शक्ती "या नावानेही ओळखले जाते.
राक्षस :-  राक्षस हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर अक्राळविक्राळ शरीर, बेढब आकार,बिभत्स रुप, अमानवी कृत्य, कपाळाला शिंग अशा प्रकारची आकृती उभी राहते. पण पुराणांमध्ये राक्षसांचे जे वर्णन केले आहे ते याहून अगदीच भिन्न आहे. राक्षस ही एक प्रजाती होती. सामान्यपणे राक्षस, दानव, दैत्य आणि असुर हे शब्द आपण एकाच अर्थाचे म्हणून वापरतो. परंतु मूलतः त्यात बरेच अंतर आहे. तथापि हा विषय अतिशय गुंतागुंतीचा असल्यामुळे आपण त्यात  आता शिरणार नाही. मग राक्षस कोणाला म्हणायचे? तर त्याची एक व्याख्या अशी दिली आहे की जो विधान म्हणजे घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मानत नाही व जो मैत्री, स्नेह, एकनिष्ठा यावर विश्वास ठेवत नाही तो राक्षस....! काही ठिकाणी धर्मविरोधी कार्य करणारा तो राक्षस, अशीही एक व्याख्या आढळते. तथापि पूर्वी  देवांचे भांडारी असलेल्या कुबेरांनी आपल्या धनसंपदेचे कोषरक्षक म्हणून यांची नेमणूक केली होती, असाही उल्लेख आढळतो.

राक्षस हा शब्द अन्य ठिकाणीही आपणास बघावयास मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार देव, मानव व राक्षस असे तीन गण आहेत. पंचांगातील पंचांगांपैकी (तिथी,वार, नक्षत्र, योग आणी करण ) एका योगाचे नावही राक्षस असे आहे.  शिवाय मुहूर्तातील तिसाव्या मुहूर्ताला राक्षस मुहुर्त ही संज्ञा आहे. एकूण संवत्सरांपैकी एकोणपन्नासावा संवत्सर हा "राक्षस नाम संवत्सर" असतो. सुप्रसिद्ध नंद राजाचा कूटनीतीज्ञ अमात्य तोही राक्षस या नावानेच प्रसिद्ध होता. पण मग राक्षस म्हणजे नेमके काय तर त्यावर असे म्हटले गेले आहे की.....
साक्षरा: विपरिता श्चेत भवती राक्षस:एव केवलम...... 
आता राक्षस शब्दच बघाना , राक्षसा: हा शब्द उलट्या बाजूने वाचला तर शब्द येतो साक्षरा: , येथे असे सुचवायचे आहे की साक्षर ( सुशिक्षित व सभ्य ? ) माणसे बुद्धीचा वापर देशविघातक कार्य व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी करू लागतात तेव्हा त्यांना राक्षस म्हणावे  तथापि अजून थोडा तपशीलवार विचार करूया......

अदिती पासून जन्माला आले ते देव....
दितीपासून जन्माला आले ते दैत्य.....
दनु पासून जन्माला आले ते दानव......
सुरसे पासून जन्माला आले ते राक्षस.....

अशी सर्वसाधारण त्यांची वर्गवारी करता येऊ शकते. पण या सर्वांचा पिता सप्तर्षी पैकी एक महान ऋषी" श्री.कष्यप " हे होत असा स्पष्ट उल्लेख मिळतो. याच कश्यपां पासून कश्यपमिर व या कश्यपमिर पासूनच काश्मीर निर्माण झाले अशी मान्यता आहे. म्हणजेच कश्मीर ची निर्मिती करणारे चे मूळ कश्यप ऋषी होते.त्यांचेच हे चारही पुत्र आहेत असे आपल्या लक्षात येते. याशिवाय रक्ष धर्माचे आचरण करणारे जे ते राक्षस अशीही एक व्याख्या सांगण्यात आलेली आहे. प्रजापती ब्रह्मदेवाने सुरुवातीस यांना प्राणिमात्रांच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती. जे प्राणिमात्रांचे रक्षण करतात जे रक्षक आहेत ते राक्षस असाही एक अर्थ यातून ध्वनित होतो. पण हे राक्षस पौराणिक धारावाहिक किंवा सिरीयलमधून आपण पाहतो तसे नसून ते अतिशय विज्ञाननिष्ठ, प्रगतिशील, पराक्रमी, सौंदर्यसंपन्न,कलाकार, गुणी,प्रयत्न वादी असे होते. यापैकी सुमाली, माल्यवान, शुक्राचार्य, गयासुर, मयासुर, मयदानव, रावण, कुंभकर्ण, महान दानी राजा बलि, भक्त प्रल्हाद,पतिव्रता मंदोदरी, सुलोचना, वृंदा, त्रिजटा, लंकिनी इत्यादी राक्षस व राक्षसी भारतीय पुराण इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत

भारतीय अध्यात्म शास्त्राने भगवंताचे प्रथम सगुण दर्शन सर्वप्रथम मातृ रूपातच घेतले आहे. आपल्या धर्माच्या सुप्रसिद्ध आठ आज्ञां पैकी......
मातृदेवो भव....! (आई देव होवो)
पितृ देवो भव.....! (वडिल देव होवो)
आचार्य देवो भव.....! (आचार्य देव होवो)
अतिथी देवो भव.....! (अतिथी देव होवो)
सत्यं वद.....! (नेहमी सत्य बोल)
धर्मं चर.....! ( धर्माचे आचरण कर)
स्वाध्यायान्मा प्रमदा:.....! (अभ्यासात चुकु नकोस)
श्रद्धया देयम.....! ( श्रध्देने दान कर)

पहिली आज्ञा "मातृदेवो भव....! अशीच आहे.भारतीय अध्यात्म शास्त्राने नारी कडे / स्त्री कडे नेहमी मातृ सूचक भावातूनच बघितले आहे. म्हणून आमच्याकडे स्त्री ही क्षण काळाची स्त्री असून अनंत काळाची माता मानली गेली आहे.  या मातेची महती गातांना पूज्य प्रभुपाद श्रीमद् आद्य शंकराचार्य म्हणतात......

"कुपुत्रो जायते क्वचिद्पी कुमाता न भवति कदा"
 आई म्हणून कोणी आईस हाक मारी
 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ।।

हे शब्द आजही आमच्या काळजात घर करुन आहेत. भारतीय संस्कृतीची काही जगा वेगळी वैशिष्ट्ये आहेत. जसे की, इच्छित संततीप्राप्ती, इच्छामरण, अक्षूण्ण गुरु-शिष्य परंपरा,संन्यास  धर्म परंपरा, सह कुटुंब पध्दती इत्यादी. यापैकी इच्छित संततीप्राप्ती हा तर  भारतीय स्त्री चा अनादिकालापासून अनुभव सिध्द अधिकार व प्रचिती चा विषय आहे. भारतीय सांस्कृतिक इतिहासात एखाद्या आईने विषिष्ठ गुण व तेजाने युक्त संतती ची कामना केली व तिला तसे संतान झाल्याची शेकडो उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. उदाहरणार्थ  देवकी व भगवान गोपाल कृष्ण :-- साक्षात नारायणाने माझ्या उदरी जन्माला यावे असा देवकीने ध्यास घेतला तर प्रभू चतुर्भुज रूपात तिच्यापुढे अवतीर्ण झाले. भगवती आर्यम्मा व पूज्य प्रभुपाद शंकराचार्य : ---अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध मताचे खंडन करून सनातन धर्माचा धर्माची पताका त्रिखंडात फडकणारा विजयी धर्ममार्तंड सुपुत्र मला व्हावा असा आर्यम्मेने संकल्प केला व भगवान शंकरांच्या कृपेने तिला आचार्य शंकर पुत्र रूपात प्राप्त झाले. राष्ट्रमाता जिजाबाई व श्री शिवराय :-- यावनी सत्तेच्या विच्छेद करून देव, देश, धर्माचे राज्य स्थापन करणारा व स्त्रीला आई समजून स्वराज्य निर्मिती करणारा चंडप्रतापी पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा असे डोहाळे आऊसाहेबास लागले त्यांच्या पोटी छत्रपती शिवराय जन्माला आले. म्हणूनच शिवबांनी अगदी बालवयातच स्त्रीशी अतिप्रसंग करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केल्याचा इतिहासात आपण अभिमानास्पद उल्लेख वाचतो. कल्याणच्या सुभेदाराची सून समोर आली असता व तत्कालिन पद्धतीत तिला बटिक बनवण्याची मुभा असताना सुद्धा.......
अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती ।
आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ।। 

असा मातृत्वा विषयी गौरवोद्गार काढणारे शिवबा आमच्या हृदयात कायमस्वरूपी पूजनीय होतात. माता भुवनेश्वरी व विवेकानंद :-- आत्म विस्म्रुत झालेल्या व स्व धर्माचरण व स्वाभिमान विसरलेल्या माझ्या देशातील देशबांधवांना केवळ आणि केवळ सनातन हिंदु परंपरेचे पाईक म्हणून स्थान मिळवून देणारा व जागृती करणारा, भगवान गोपाल कृष्णां सारखा धर्म रथाचे सारथ्य करणारा पराक्रमी पुत्र माझ्या पोटी यावा असे भुवनेश्वरी मातेस वाटले. तिच्या पोटी विश्वबन्धु स्वामी विवेकानंद जन्माला आले. संध्याकाळच्या वेळेस बंद खोलीतील मंद मंद प्रकाशात यौवनाने रसरसलेल्या सुंदर पाश्चात्त्य तरुणीच्या.....
      "मला अगदी तुमच्या सारख्याच पुत्राची आई होण्याची इच्छा आहे "
          या मागणीला तिच्या पायावर डोकं ठेवून......
      " आई मीही तुझाच पुत्र नाही का? "
असा प्रतिप्रश्न करणारा विश्वविजयी विवेकानंद या मात्रुत्व सूचक व स्कंदमाता संस्कृतीतूनच जन्माला येतो. आज आपल्या समाजात व एकूणच जगात विषय लोलुलुता व भोग वादामुळे स्त्री कडे आधुनिकतेच्या  नावाखाली एक विकाऊ आणि भोगवस्तू म्हणून बघीतले जाते. अगदी कोवळ्या बालिके पासून जख्खड वृद्ध स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचल्यानंतर मन विषण्ण होते. स्त्रीत्वाचा आदर करणारा, स्त्रीत्वाचा सन्मान करणारा व त्या स्त्रीला सन्मानाचे स्थान देऊन मातृवत् पूजन करणारा सुपुत्र जन्माला येणं ही आज काळाची गरज नाही का? आपण कधी यावर विचार पूर्वक आचरण करणार आहोत? 
 स्कंदमातेच्या या दिव्य चरित्रातुन आम्ही हे शिकणार नसु तर या खोट्या उपासने चा देखावा कशाला?  संस्कृतीच्या संरक्षणासाठी आसुरी संस्कृतीशी संघर्ष करून एक नवा धर्म प्रस्थापित करणारा स्कंद, शक्तिसंपन्न कुमार कार्तिकेय, माझ्या पोटी यावा किंवा जो आलाय त्यावर असे संस्कार व्हावे असे आमच्या माता-भगिनींना का बरे वाटत नसावे? ही फक्त माता भगिनींचिच जबाबदारी आहे का?आपण सगळेच या अवनती ला जबाबदार नाही का?

माता भगिनींच्या स्त्रीसुलभ नटणे मुरडणे व शृंगार करण्याचा जन्मसिद्ध अधिकार मान्य करूनही, भगवतीने धारण केलेल्या विविध रंगांच्या वस्त्रांची स्पर्धा करण्यापेक्षा, भगवतीने धारण केलेल्या विविध शस्त्रांचा ,आयुधांचा व शास्त्रांचा अभ्यास करून त्यानुसार एक दिव्य तेजस्वी जीवन घडवण्याची / जगण्याची जिद्द आम्ही का बरे विसरलो आहोत? परस्त्रीकडे मातृ सुलभ नजरेने बघणारा सुपुत्र जन्माला येण्याची सर्वार्थाने क्षमता केवळ आणि केवळ एका आईचिच असली तरी ते आमचे सामाजिक दायित्व नाही का?   

भगवतीच्या " स्कंदमाता " या श्री विग्रहाचं पूजन करताना मी माझ्या मुलावर मातृत्वाचे पूजन करणारे संस्कार करिनच असा पण आज माता-भगिनींनी करावयास  काय हरकत आहे?.  या प्रकारे मातृत्व पूजक व्रताचा वसा व मात्रु सुलभ भावनेचा सन्मान करणाऱ्या संस्कारांचा ठसा हृदयावर अंकित असलेल्या पराक्रमी व चरित्र संपन्न मातांची व सुपुत्रांची आज आपल्या राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे. अशा प्रकारचे मातृत्व पूजक पराक्रमी सुपुत्र आमच्या देशात जन्माला यावे अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करून जगन्माता स्वरूप असलेल्या स्कंदमातेला प्रणाम करू या व म्हणू या......
सिंहासना गता नित्यं पद्माश्रित कर द्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ।।
उदयोस्तु जगदंब उदयोस्तु..........

अक्षर योगी :  94 222 84 666 /  79 72 00 28 70

Web Title: Navratri 2022: Why is Skandamata known as Mokshadayini? How should she be worshipped? read...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.