Navratri 2023: नवरात्रीत रोज सायंकाळी सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणा आणि त्याची ताकद अनुभवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:02 AM2023-10-16T10:02:37+5:302023-10-16T10:03:54+5:30
Navratri Mahotsav 2023:मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते आणि वातावरण निर्मितीची ताकद असते, ते म्हटल्याने होणारे फायदेही जाणून घ्या!
नवरात्रीत भक्तीचा जागर करण्यासाठी आपण सगळेच सज्ज झालो आहोत. या प्रचंड नकारात्मक वातावरणात गरज आहे, सकारात्मकतेची पेरणी करण्याची. येत्या नऊ दिवसांत नऊ प्रकारच्या धान्याबरोबर नऊ सकारात्मक विचारांचीदेखील आपण रुजवण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संकल्पला परिपूर्णता येण्यासाठी आणि विश्वावर आलेले संकट दूर होण्यासाठी 'सप्तशती'मधील सिद्धमंत्रांचा नक्कीच उपयोग होईल.
सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो. म्हणून तर, सहस्रावर्तन असो किंवा सहस्रजप, हे संकल्प सिद्धीस जावेत, म्हणून भाविक संघटित होऊन प्रार्थना करतात. आपणही नवरात्रीच्या निमित्ताने एकत्रितरित्या या सिद्धमंत्रांचा अवलंब करू आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या आदि शक्तीला हे वैश्विक संकट दूर करण्याची प्रार्थना करू.
सप्तशती या प्रासादिक ग्रंथात ७०० मंत्ररूप श्लोक आहेत. या ग्रंथात श्रीमदभगवतीच्या कृपेचा महिमा वर्णन केला आहे. तसेच अनेक गूढ साधना रहस्यांचाही यात समावेश आहे, असे म्हणतात. या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पारायणाने भक्त मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंत्रांचे उच्चार वातावरणनिर्मिती करतात. ज्याप्रमाणे संगीत सभेत तानपुरा, तबला, बासरी, हार्मोनिअम या वाद्यवादनाने सभेची पार्श्वभूमी तयार होते आणि त्यात गायकाच्या सुरेल रचनांची भर पडते, त्याप्रमाणे भगवन्नाम घेत असताना स्तोत्रपठण तसेच मंत्रोच्चारण यामुळे योग्य परिणाम साधला जातो. जीभेला चांगले वळण लागते. सकारात्मकता वाढते,म्हणून मंत्रांचे नित्यपठण करायचे असते. आपणही पुढील मंत्रांचे पठण करूया.
इत्थं यदा यदा बाधा, दानवोत्था भविष्यति,
तदा तदावतिर्यादं करिष्याम्यरिसंक्षयम् ।।
ऐं ऱ्हीम क्लीं शत्रुभ्यो न भयं तस्य,
दस्थुतो वा न राजत:
न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्संभविष्यति।।
ऐं ऱ्हीम क्लीं दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परम्
रक्षोभूतशिाचानां पठनादेव नाशनम् ।।
ऐं ऱ्हीम क्लीं मम प्रभावास्हिंहाद्या दस्यवो वैरिणस्तथा,
दूरादेव पलायन्ते स्मरनश्चरितं मम् ।।
दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके,
मम सिद्धीमसिद्ध वा स्वप्ने सर्व प्रदर्शय।।
या मंत्रजपांचे नित्यपारायण करावे.हे मंत्रोच्चार कठीण वाटत असले, तरी ते योग्य परिणाम साधतात. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करता, येत्या नवरात्रीत रोज स्नान करून, शुचिर्भुत होऊन, आसनस्थ होऊन उपरोक्त मंत्रपठण करावे. देवीला आपली इप्सित मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि केवळ आपलेच नाही, तर सर्वांचे भले कर, रक्षण कर आणि सर्वांना संकटमुक्त कर, असे मागणे मागावे. जगदंबsss उदयोस्तु!