Navratri 2024: देवीच्या पूजेत श्रीरामांनी अर्पण केला होता आपला एक डोळा? काय आहे ती कथा? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:23 PM2024-10-04T15:23:33+5:302024-10-04T15:24:57+5:30

Navratri 2024: नवरात्रीच्या काळात शक्तीउपासनेसाठी श्रीरामांनी सप्तशतीचे वाचन केले होते हे आपण जाणतो, पण देवीच्या पूजेतील 'हा' प्रसंग जाणून घ्या!

Navratri 2024: Did Shri Ram offer one of his eyes to worship the goddess? What is the story? Read on! | Navratri 2024: देवीच्या पूजेत श्रीरामांनी अर्पण केला होता आपला एक डोळा? काय आहे ती कथा? वाचा!

Navratri 2024: देवीच्या पूजेत श्रीरामांनी अर्पण केला होता आपला एक डोळा? काय आहे ती कथा? वाचा!

रावणाशी युद्ध करायचं तर शारीरिक, मानसिक तयारी पूर्ण हवी. यासाठी शारीरिक तयारी पूर्ण झाली. शस्त्रांची जुळवाजुळव झाली. सैन्य सज्ज झाले. आता ऐन वेळेवर मनाची चलबिचल होऊ नये म्हणून श्रीरामांनी नवरात्रीच्या काळात शक्ती उपासनेस सुरुवात केली. देवीचे अधिष्ठान मांडून तिची पूजा केली. उपासना म्हणून देवी सप्तशती हा प्रासादिक ग्रंथ वाचायला घेतला आणि देवीचा नामजप वगैरे झाल्यावर देवीला आवडणाऱ्या १०८ कमळ पुष्पांना अर्पण करण्याचा संकल्प केला. 

श्रीरामांनी सलग नऊ दिवस तहान भूक विसरून देवीची उपासना केली. देवी अर्थात शक्ती! युद्धात विजय व्हावा आणि सर्व सज्जनांना दुर्जनांच्या तावडीतून मुक्ती मिळावी म्हणून श्रीराम देवीची आराधना करत होते. देहभान विसरून गेले होते. त्यांना आठवण होती ती फक्त संकल्पपूर्तीची! त्यांनी पूजेत एक एक करून कमळ वाहायला घेतले. देवी श्रीरामांच्या पूजेने तृप्त झाली. पण आशीर्वाद देण्याआधी तिने श्रीरामांची परीक्षा बघायची असे ठरवले. 

जवळपास १०७ कमळ वाहून झाल्यावर १०८ वे कमळ अर्पण करणार या विचारात श्रीरामांनी फुलं ठेवलेल्या थाळीत कमळाची चाचपणी केली पण कमळ संपले होते. एका कमळासाठी आपली पूजा अपूर्ण राहणार याचे रामांना वाईट वाटले. त्यांनी थोडा विचार केला, मग त्यांच्या लक्षात आले ते त्यांचे बालपण!

श्रीरामाच्या आईला अर्थात कौसल्या मातेला श्रीरामांचा सहवास फार काळ लाभला नाही, की मुलाचा सुखाचा संसारही पाहता आला नाही. त्याच्या वाट्याला अपार दुःख येऊनही, ते सहन करण्याची ताकद कौसल्या मातेने श्रीरामांच्या डोळ्यात पाहिली होती. ती पाहून आपल्या मुलाला त्या राजीव नेत्र असे संबोधत असत. 

राजीव अर्थात कमळ! श्रीरामांचे डोळे कमळासारखे होते. हे विशेषण आठवता क्षणी श्रीरामांनी आपला एक डोळा अर्पण करायचा ठरवला. धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण आकर्ण ओढला. देवीच्या पूजेच्या दिशेने रामांनी तो बाण सोडला. जेणेकरून बाणासकट डोळा देवीच्या चरणी अर्पण करता येईल. 

ते पाहता क्षणी देवी प्रगट झाली आणि तिने श्रीरामांना थांबवलं. त्यांनी काही मागण्याआधीच विजयश्री मिळेल असा आशीर्वाद दिला. आणि तो आशीर्वाद फळला. ९ दिवस रावणाशी युद्ध झालं आणि दसऱ्याच्या दिवशी श्रीराम आणि संपूर्ण वानरसेनेने शक्तीच्या जोरावर रावणासारख्या बलाढ्य शक्तीचा नायनाट केला.  

Web Title: Navratri 2024: Did Shri Ram offer one of his eyes to worship the goddess? What is the story? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.