Navratri 2024: कायमस्वरूपी लक्ष्मीकृपा राहावी म्हणून दिवसाच्या सुरूवातीला करा 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:59 PM2024-10-08T15:59:47+5:302024-10-08T16:02:27+5:30
Navratri 2024: देवीची उपासना केवळ नऊ दिवसच का? तर आयुष्यभर करता येईल त्यासाठी दिलेला उपाय सुरू करा!
सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे सगळेच जण देवीची उपासना करत आहेत. मात्र ही उपासना केवळ नऊ दिवस नाही तर कायमस्वरूपी केली तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहील. त्यासाठी दिवसाच्या सुरुवातीला करा दिलेला उपाय!
पाच इंचाचा मोबाईल हातात आल्यापासून सहा फुटाचा मनुष्य बिघडला. आपल्या चांगल्या सवयी विसरला आणि स्वत:चे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान करून घेऊ लागला. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाइलरूपी जग हातात घेण्याआधी हा श्लोक म्हणा, ज्यामुळे लक्ष्मी कृपा सदैव राहील.
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।
हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे.
उपरोक्त श्लोक नीट समजून घेतला, तर आपल्या लक्षात येईल, की लक्ष्मी, विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे, ही मानवाच्या हातातली, म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे. म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे जरूरी आहे. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा, चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली, की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे आहे.
मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. परंतु, लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे, हे त्याला उमगत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच तो आठव करून दिला आहे. 'तूज आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी।' आपल्या हातात सर्वस्व सामावले आहे. सगळा पुरुषार्थ आपल्या हातांमध्ये आहे. हाच हात कोणावर उगारला, तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो, मात्र चांगल्या कामासाठी हातभार लावला, तर पुरुषार्थ वाढतो.
एखादा रिकामा मनुष्य 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' अशी अपेक्षा करत असेल, तर तो आयुष्यभर रिकामाच राहील. त्याला कोणीही किंमत देणार नाही. भगवंत तरी आणखी काय काय देणार? दोन हात, दोन पाय, ज्ञानेंद्रिय, कमेंद्रिय, बुद्धी, मन असे परिपूर्ण पॅकेज मिळूनही मनुष्य रडत राहतो. भगवंताने मला काय दिले? हिच जाणीव होण्यासाठी `प्रभाते करदर्शनम्'
'उद्योगाचे घरी, लक्ष्मी पाणी भरी' असे म्हटले जाते. एका जागी बसून, दुसऱ्यांच्या सुखाशी, यशाशी तुलना करून आपल्याला यश मिळत नाही. मिळते ती फक्त निराशा. ईशकृपेने सिद्धी अवश्य मिळते. परंतु, त्यासाठी प्रयत्नांची शर्थ मनुष्यालाच करावी लागते.
लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयशय आहे, तिथे ती घटीकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली, की व्यक्ती रसातळाला जाते. हीच बाब `गृहलक्ष्मी'च्या बाबतीतही म्हटली जाते. ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही, त्या घरात शांतता, सुख, समृद्धी नांदत नाही.
हातात प्रचंड शक्ती आहे. `हिम्मते मर्दा तो मददे खुदा' असे म्हणतात. संकटाशी `दोन हात' करायचे, की पळ काढायचा, हे मनुष्याच्या `हाती' आहे. ही जाणीव होण्यासाठी, `प्रभाते करदर्शनम्'
देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि चैतन्यमूर्ती गोविंद सर्वांना प्रसन्न होवो, म्हणून या क्षणापासून म्हणा, 'कराग्रे वसते लक्ष्मी....!'