Navratri 2024: शुक्रवार आणि महानवमीच्या संयोगावर करा कन्या पूजन; लक्ष्मी, कुबेर, वाराही मातेची होईल कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:08 PM2024-10-10T13:08:14+5:302024-10-10T13:09:49+5:30
Navratri 2024: ११ ऑक्टोबर रोजी महानवमी आणि शुक्रवार आहे, या संयोगावर केलेले कन्यापूजन अनेक पटींनी लाभदायक ठरते.
नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम, हवन, नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. कुंकुमारचनाचा सोहळा केला जातो. सामूहिक श्रीसूक्त पठण केले जाते. तसेच त्यादिवशी कुमारिका पूजन (Navratri Kanya Pujan 2024) केले जाते. कारण नवरात्रीच्या नवमीला देवी बालिकेच्या रूपाने येते आणि पूजेचा स्वीकार करते. तिचे रूप म्हणून या तिथीला कन्यापूजन केले जाते.
नवरात्रीचा नववा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. याला महानवमी असेही म्हणतात. नवरात्री महानवमीला बारा वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना पूजेसाठी बोलावले जाते. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये कन्येची पूजा केल्याने देवी दुर्गा लवकर प्रसन्न होते. कारण कुमारिकांना देवीचे रूप मानले जाते. दुर्गेच्या अवतारांचे एक प्रतीक कन्या रूपात आहे. दुर्गामातेने तिच्या सर्जनशील शक्तीचे प्रतीक असलेल्या कलसुराचा वध करण्यासाठी एका लहान मुलीचे रूप घेतले. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांत विशेषतः पंचमी, अष्टमी किंवा नवमी या तिथीला कुमारिकांना घरी आमंत्रण देऊन त्यांची पूजा केली जाते. या पूजेत देवीस्वरूप असलेल्या मुलींचे प्रथम पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. त्यांना गजरा किंवा फुल देऊन स्वागत केले जाते. त्यानंतर मुलींना आवडेल अशी भेटवस्तू देऊन सत्कार केला जातो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जातात.
कुमारिकेचीच पूजा का?
देवी भागवतात म्हटले आहे, की दोन ते दहा वर्षांच्या मुलींना अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलवावे. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या मुलीला कल्याणी, पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी, सहा वर्षाच्या मुलीला कालिका, आठ वर्षांच्या मुलीला शांभवी, नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. बालरूपात आपण देव पाहतो. म्हणून कुमारिकांना पूजेचा मान दिला जाता़े कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुषय, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशिर्वादाने घरात सुख, समृद्धी, शांती येते.
दहा वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलावतो. तान्ह्या बाळापासून दहा वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित काय मिळते तेही जाणून घेऊ.
>> दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.
>> तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
>> चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
>> पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.
>> सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
>> सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
>> आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
>> नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
>> दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
महानवमीला लक्ष्मीची पूजा करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे दिव्य विधी केले जातात, त्यापैकी एक षोडश लक्ष्मी कन्या पूजा आहे. या विधीमध्ये लक्ष्मीच्या १६ रूपांची पूजा केली जाते. 'षोडशा' म्हणजे संस्कृतमध्ये १६ आणि या विशिष्ट पूजेद्वारे १६ शक्तिशाली देवी-रूपांकडून १६ प्रकारचे आशीर्वाद मिळू शकतात. या १६ देवींसोबतच भगवान गणेश, भगवान कुबेर, माता वाराही, ,माता दुर्गा आणि श्यामला देवी यांची पूजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो.
कन्या पूजा, ज्याला कंजक पूजा देखील म्हणतात, सामान्यतः नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी केली जाते. या पूजेत 21 मुली दिवे लावतात आणि 21 देवांचा आशीर्वाद घेतात. यावर्षी महानवमी शुक्रवारी येत आहे, त्यामुळे या पूजेचे महत्त्व अधिकच वाढले आहे, कारण शुक्रवार हा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. असे मानले जाते की महानवमी आणि शुक्रवारी षोडश कन्येची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. या पूजेसह चंडी हवन केल्यास ही पूजा अनेक पटींनी फलदायी होऊ शकते. असे म्हटले जाते की चंडी हवन केल्याने सर्व नकारात्मक शक्तींपासून संरक्षणाचा आशीर्वाद मिळतो.