नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:25 AM2024-10-02T10:25:44+5:302024-10-02T10:26:56+5:30
Navratri 2024 Swami Samarth Annapurna Swarup Katha: गुरुवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण, पूजन करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या...
Navratri 2024 Swami Samarth Annapurna Swarup Katha: स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. समस्या, अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल, तर स्वामींना मनापासून हाक मारली, तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामींनी भक्तांसाठी अन्नपूर्णा देवीचे स्वरुप धारण केले. अन्नपूर्णा स्वरुपात केवळ दर्शन दिले नाही, तर भाविकांना खाऊही घातले, अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक मठ असून, या मठात स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात पूजन केले जाते. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरुपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. ०३ ऑक्टोबर २०२४ पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. गुरुवारी नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी स्वामींचे विशेष पूजन, नामस्मरण करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण आणि शक्य असेल तर विशेष पूजन केल्यास केवळ स्वामींचा नाही, तर देवी अन्नपूर्णेचाही शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जाते. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाच्या कथेविषयी जाणून घेऊया...
स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत
स्वामीकृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात, वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा, अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत, हेच स्पष्ट होते. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांनुसार, घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले, अशी एक कथा सांगतात.
खुद्द स्वामी आले म्हटल्यावर फलाहार दिला, पाणी दिले
कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींनी फलाहार ग्रहण केला. स्वामी सर्वांना म्हणाले की, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की, तेथे कोणीतरी जेवण देईल.
स्वामींचा शब्द आणि सेवेकरी आम्रवृक्षाजवळ गेले
श्रीपादभटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की, आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल, असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे.
प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले
वृद्ध सुवासिनीने केलेला स्वयंपाक श्रीपादभटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपादभट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपादभटांनी त्या सुवासिनी महिलेस स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपादभटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्या लोकांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
|| श्री स्वामी समर्थ ||